वैशाली सामंत

एकदा ओ. पी. नय्यरजी यांनी दोन शोज करण्यासाठी मला बोलवलं. हे माझं भाग्यच! रिहर्सल झाली. मग म्हणाले, “बैठो इधर!” माझी तर बोबडीच वळली होती. ते म्हणाले, “आवाज अच्छा है तुम्हारा! अरे शरमाती क्यूं हो? खुलकर गाओ!” आणि त्यांनी माझ्या गाण्याची ओळ स्वतः गाऊन दाखवली. “ऐसी बात ना करो हंसी जादूगर!…” काय सांगू तुम्हाला? काय नजाकत! काय तो नखरा! एखाद्या तरुण प्रेमिकेला शोभेल असा लाडिक प्रेमभरा स्वर! ते गायले आणि त्या गाण्याला जणू परिसस्पर्श झाला. आणि म्हणतात ना पटकन डोक्यांत दिवे पेटले, येस! गाना ऐसा होना चाहिये! त्यांनी शिकवलेली त्यांच्या आवाजातली नखरेल नजाकत आयुष्यभर पुरली.

त्या क्षणी कळलं, प्रत्येक संगीतकाराची शैली महत्त्वाची! कारण संगीतकार ते गाणं त्याच्या प्रतिभेतून साकार करत असतो. गाण्याइतकंच महत्त्व आहे ते गाण्यातल्या एक्स्प्रेशन्सना! लावणी, प्रेमगीत, अंगाई गीत, अथवा देशभक्तीपर गीत. गाण्याचा प्रकार कोणताही असो, त्यात एक्सप्रेशन्स कशी आणायला हवीत ते मला ओ. पी. नय्यरजींच्या या शिकवणुकीतून अचूक कळलं!
आणखी वाचा : ‘गोविंदा’च्या सातव्या थरावरून ‘माझं बाळ’ कोसळलं तेव्हा…

पण ते खूप नंतर. त्या आधी दोन मेन्टॉर मला भेटले ज्यांनी उमेदवारीच्या काळात माझ्यातला कलाकार ओळखून, माझी पॅशन (Passion) ओळखून मला पार्श्वगायनाचे योग्य ते धडे दिले, ते दोन संगीतकार म्हणजे, श्रीरंग आरस आणि नंदू होनप! ‘ऐका दाजिबा’ या गाण्यानं मला एका रात्रीत स्टार केलं, असं लोकांना वाटतं. पण ते तसं नाहीये! त्याआधी जवळजवळ सात वर्षें माझी इंडस्ट्रीत मेहनत सुरू होती, ती या दोन संगीतकारांमुळे.

एकीकडे पंडित मनोहर चिमोटेंकडे माझं शास्त्रीय संगीताचं शिक्षण चालू होतं. पण गळा गाता असला, सूर पक्के असले, तरी पार्श्वगायनात माइकवर गाणं हे खूप वेगळं तंत्र आहे याची स्पष्ट जाणीव मला या दोघांमुळे झाली. १९९७ ते १९९९ चा तो काळ होता रिमिक्स गाण्यांचा! आधी रिलीज झालेली प्रस्थापित गायकांची लोकप्रिय गाणी परत नव्या गायकांनी गाण्याचा! या प्रक्रियेतून गेलं, की नवोदित गायकाचा गळा आणि डोकं दोन्ही तयार होतं. गाणं नुसतं गळ्याने गायक गात नाही. गाणं आधी डोक्याने गायलं जातं मग गळ्याने! डोकं आणि गळा जेव्हा insink होतात, तेव्हाच चांगलं गाणं तयार होतं.

त्या काळात माझं नाव नसताना श्रीरंगजींनी माझ्यावर विश्वास टाकून वेगवेगळी ‘कव्हर व्हर्जन्स’ माझ्याकडून गाऊन घेतली. त्यामुळे त्या उमेदवारीच्या काळात गाण्याची नेमकी प्रक्रिया मला छान समजून घेता आली. अहो, ज्या मुलीने तोवर गाण्याचा स्टुडिओ कधी बघितला नव्हता की जिची पार्श्वगायनाच्या क्षेत्राशी साधी तोंडओळखही नव्हती, अशा माझ्यासारख्या नवख्या मुलीला ‘कव्हर व्हर्जन्स’ च्या निमित्ताने स्टुडिओत जायला मिळणं, तिथे तासन् तास बसून इतरांची गाणी ऐकता येणं हेच किती मोठं शिक्षण होतं खरंतर! तरीही ही इंडस्ट्री खूप चॅलेंजिंग आहे. इथे आपली स्वतःची गाणी येतील की नाही, कधी येतील हा टप्पा क्रॉस करणं खूप अवघड असतं. तो टप्पा पार करणं मला शक्य झालं. कारण श्रीरंग आरस यांनी माझ्याकडून ‘कव्हर व्हर्जन्स’सह खूप गैर फिल्मी गाणी गाऊन घेतली. ‘माठाला गेला तडा’ यासारख्या अनेक पारंपरिक गवळणी गाऊन घेतल्या. हा प्रकार गावखेड्यांत खूप चालतो हे तेव्हा मला कळलं. त्यातून महाराष्ट्राच्या कोणत्या भागात कोणत्या प्रकारची गाणी लोकप्रिय आहेत, कोणत्या भागात भाषेचा कोणता लहेजा वापरला जातो, तिथले स्थानिक कलाकार कोण आहेत, ते कसे गातात हा सगळा लोकसंगीताचा अभ्यास मला त्यामुळे करता आला. नंदू होनप यांनी याच काळात दत्तगुरूंची बरीच गाणी माझ्याकडून गाऊन घेतली. भक्ती संगीताच्या एका वेगळ्या जॉनरशी त्यांनी माझी ओळख करून दिली. सुरुवातीला स्टेज शोज करत गावोगावी फिरायचं असं माझ्या मनातच नव्हतं. पण संगीताचा हा सगळा वेगवेगळ्या प्रकारचा अभ्यास प्रत्येक गायकासाठी किती गरजेचा आहे हे या दोघांमुळे मला कळलं!

आणखी वाचा : विवाहपूर्व मार्गदर्शन : बॉयफ्रेंडचा नवरा होतो तेव्हा…

सुरुवातीच्या काळात त्या लेव्हलचं गाणं गाता येण्यासाठी तेवढा वेळ आपल्यासाठी देणारी व्यक्ती लागते. मला खूप वाटतं, मी आशाबाईंचं हे गाणं गावं. पण पुनर्गायन करताना माझ्या गळ्यांतून उमटणाऱ्या स्वरांमध्ये ती एक्सप्रेशन्स नेमकी कशी आली पाहिजेत, हे शिकून घेण्यासाठी श्रीरंगजी आणि नंदूजी यांनी तेवढा वेळ मला दिला. हे सगळे धडे गिरवत असताना त्या नवथर काळात आपण शिकत असतो. घडत असतो. आपल्या हातून नकळत चुकाही होत असतात. पण श्रीरंगजी आणि नंदूजी या माझ्या दोन्ही मेन्टॉर्सनी मला गाण्याइतकंच वागण्यातसुद्धा पक्कं व्यावसायिक बनवलं.

एकदा काय झालं, जुहू इथल्या एका स्टुडिओत मी गाणं रेकॉर्ड करायला गेले. श्रीरंगजींनी मला तासभर नुसतं बसवून ठेवलं. आत कोणाचंही रेकॉर्डिंग चालू नव्हतं तरीही! मी कंटाळले. वैतागले. मग तासाभराने ते माझ्याजवळ आले. म्हणाले, ‘‘दुसऱ्याला वाट बघायला लावलं की कसं होतं कळलं? स्टुडिओत वेळेचं बंधन असतं. कोणाचे पैसे, कोणाच्या अपेक्षा लागलेल्या असतात. इथे टिकायचं तर तुला वेळेची शिस्त पाळावीच लागेल! पार्श्वगायन हे करिअर गंभीरपणे घ्यायचं असेल तर गाण्याबरोबर इतरही गोष्टींचं भान ठेवायला हवं तुला!” कानाला खडा! पुन्हा उशिरा जाणं नाही!

मेन्टॉर असा असतो. तो नुसता संधी देत नाही. त्या संधीचं सोनं कसं करायचं तेसुद्धा शिकवतो!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

madhuri.m.tamhane@gmail.com