सासू होणं, हा बहुतांशी बाईच्या आयुष्यात येणारा एक टप्पा असतो. तो आनंददायी असतोच, मात्र अनेकदा काळजी वाढवणाराही असू शकतो. आपलं सुनेशी पटेल का? आपलं नातं कसं असेल? आपला मुलगा आपल्यापासून दूर जाणार नाही ना? असे अनेक विचार तिचं दडपण वाढवू शकतात. काय करायला हवं अशा वेळी?
आणखी वाचा : जातिभेदाविरोधात अमेरिकेत लढा देणाऱ्या क्षमा सावंत आहेत तरी कोण?
“कालिंदी, अगं झाली का लग्नाची तयारी? आता फक्त १० दिवस बाकी राहिले आहेत. तुझ्या घरातील हे पहिले कार्य. आता तुला विहिणबाई म्हणून मिरवायचं आहे, त्यामुळं सगळ्या कामांकडे तुला लक्ष देता येणार नाही. मानपान,देण्याघेण्याच्या सगळ्या वस्तू एका बॅगमध्ये भरून ठेवल्या आहेस ना?”
“हो ताई, सगळी तयारी झाली आहे, बॅग भरून त्याला लेबलही लावली आहेत. कार्यालयात गेल्यावर काही गोंधळ व्हायला नको, पण खूप टेन्शन आलंय गं.”
“सगळी तयारी झाली म्हणतेस, मग आता कसलं टेन्शन?”
आणखी वाचा : चॉइस तर आपलाच : मुलांच्या मनात शिरायचं कसं?
“ताई, लग्नाच्या तयारीचं टेन्शन नाही गं. मला वेगळंच टेन्शन आलंय. ताई,अगं माझ्या सागरचं लग्न झाल्यावर नवीन सून घरात येणार, ती घरात कशी वागेल? माझं तिचं पटेल का? ती परदेशात शिक्षण घेऊन येथे आली आहे आणि सागर येथेच शिकलेला. त्याने आपला देश सोडून जायचं नाही असं ठरवलं आहे, मग या दोघांचं जमेल का? एकदा परदेशात राहिलं की ती मुलं पुन्हा भारतात राहत नाहीत असं मी ऐकलंय. सागर माझा एकुलता एक मुलगा आहे. त्याला वाढवण्यासाठी मी माझं करिअर सुद्धा सोडून दिलं. त्याची शाळा, त्याचे क्लास, त्याच्या ऍक्टिव्हिटी यामध्येच मी गुंतून राहिले, पण आता लग्न झाल्यावर तो माझ्यापासून दूर जाणार नाही ना, याचंही भय वाटतं आहे मला. कधी कधी इतके विचार माझ्या मनात येतात की मला झोपच लागत नाही.”
आणखी वाचा : आरोग्यासाठी घातक औद्योगिक क्षेत्रात महिला कामगार सर्वाधिक! सर्वेक्षणात लक्षात आली धक्कादायक बाब
कालिंदी तिची व्यथा मोठ्या बहिणीला सांगत होती. मुलाचं लग्न होणार हा आनंद असला तरी पुढं कसं होणार या विचारांनी ती सैरभैर झाली होती. त्याचं कारणही तसंच होतं. तिच्या जिममधील मैत्रिणीने तिला सांगितलं, “तुझी सून तुझ्या मुलाला परदेशात नेणारच. इतके दिवस अमेरिकेत राहिलेली मुलगी आता भारतात राहणं अवघड आहे, तुझ्या मनाची तयारी करून ठेव.” तिच्या शाळेतील वर्गमैत्रीण भेटली तेव्हा म्हणाली, “फार लक्ष घालू नकोस बाई घरात, हल्लीच्या मुलींना काहीही सांगितलेले आवडत नाही. एवढ्या तेवढ्या गोष्टींवरून वाद वाढवतात आणि सासू अशी वागली,तशी वागली अशा तक्रारी घेऊन पोलीस चौकी पर्यंत जातात. माझ्या सुनेनं असंच भांडण वाढवलं आणि मला कोर्टच्या चकरा घालायला लावल्या, शेवटी मुलगा तिला घेऊन वेगळं रहायला लागला तेव्हा शांत झाली, आता तो मला भेटायला आला तरी तिला ते आवडत नाही. लग्न झाल्यानंतर मुलं आपली राहात नाहीत हेच खरे. कालिंदीच्या मैत्रिणींनी तिला सजग करण्याचा प्रयत्न केला होता, त्यांचे अनुभव सांगितले होते. त्यामुळं आपल्या मुलाचा संसार नीट होणार का? सून घर टिकवणारी असेल की घर मोडणारी? ती आपल्या नातेवाईकांमध्ये रमेल की सतत माहेरचं गाठेल? या आणि अशा विचारांनी तिला दडपण आलं होतं. मंजिरीताईने तिच्या मनातील गोंधळ ओळखला. ही उगाचच ओव्हर थिंकिंग करते आहे. आता तिचं बौद्धिक घ्यायलाच हवं असं तिनं ठरवलं.
आणखी वाचा : ‘ती’ची यशोगाथा : डाऊन सिंड्रोम व्याधीग्रस्त महिलेने नकार पचवून उभारला स्वतंत्र यशस्वी व्यवसाय!
“कालिंदी, अगं, किती पुढचा विचार करशील? त्या विचारांमुळे तुला या लग्नाचा आनंद तरी घेता येतोय का? किती स्वप्न रंगवली होतीस मुलाच्या लग्नाची? मी असं करणार, मी तसं करणार. तो उत्साह गेला कुठं तुझा? चारचौघींचे अनुभव लक्षात घेऊन स्वतःच्या घरातही असंच होईल, असा विचार तू का करतेस? आपल्या वागण्यावर सगळं असतं अगं. तुझ्या संस्कारांवर विश्वास ठेव. तू कोणतीही अढी मनात न ठेवता नवीन सुनेचे स्वागत कर, नकारात्मक विचार मनात आणू नकोस. ‘परदेशात गेलेली मुलं भारतात राहतच नाहीत,’ ‘सून एकत्र कुटुंबात राहण्यास नकारच देते’, ‘लग्न झाल्यानंतर मुलं बदलतात, आईला विसरतात’, असं लेबलिंग करणं बंद कर. हाताची सर्व बोटं सारखी नसतात तसे सर्वांचे अनुभवही सारखे नसतात. तू केवळ पॉझिटिव्हच नाही, तर रॅशनल विचार कर. जो प्रसंग येईल त्यातून चांगलं काय आणि कसं होईल ते बघायचं. कालिंदी,एक सांगते तुला,घर आणि घरपण अबाधित ठेवायचं असेल तर तू स्वतःला बदलायला हवं. अतिरिक्त विचार कमी करायचे आणि Accept, Adjust आणि Avoid हे तीन शब्द लक्षात ठेवायचे. फार विचार केला, की मनस्थिती बिघडते आणि शरीर आजाराचं माहेरघर बनायला सुरवात होते.”
मंजिरीताईने अनुभवाचे बोल कालिंदीला सांगितले. तिच्या बोलण्यामुळे कालिंदीच्या मनातील गोंधळ बराचसा कमी झाला. तिचं मन हलकं झालं. पुढचं काय होईल त्याचा आज विचार न करता लग्न एन्जॉय करायचं असं तिनं ठरवलं आणि मेहंदी आणि संगीत मध्ये काय ठेवायचं, पार्लर मध्ये कधी जायचं याच्या नियोजनात ती मग्न झाली.
smitajoshi606@gmail.com
लेखिका कुटुंब न्यायालयात समुपदेशक आहेत.