अनुज त्याच्या बाबांसोबत आला होता. त्याला खरंतर बाहेर जाऊन खेळायचे होते, पण त्याच्या बाबांनी त्याचा हात पकडून ठेवला होता आणि ते त्याला बाहेर सोडत नव्हते.
“अनु, तुला सांगितलं ना, गडबड करायची नाही. इथं शांत बसायचं आणि तुला जे विचारतील ते सांगायचं. तुला आईला भेटायचं नाही ना? मग तुला कोणीही जबरदस्तीने भेटायला लावणार नाही. तुला जे सांगायचं आहे ते त्या मॅडमना सांग.”
“हो बाबा, मी सांगेन त्यांना. पण तुम्ही मला पार्कमध्ये नेणार आहात ना? आणि आज आपलं आईस्क्रीमचं ठरलं आहे ते पण तुम्ही देणार आहात ना?”
“हो अनु, ठरल्याप्रमाणे आपण सर्व करणार आहोत, पण तू शांत रहा.”
बाबांनी आश्वासन दिल्यावर अनुज थोड्यावेळ शांत राहिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा : लोक काय म्हणतील या भीतीने माझ्या सासूने मला…

जुई आणि आनंदचा घटस्फोट झाल्यानंतर अनुजचा ताबा आनंदकडेच होता. आठवड्यातून एकदा, रविवारी तो आईला भेटण्यासाठी जात होता. घटस्फोट झाल्यानंतर काही दिवस हे सुरळीत चालू होतं, परंतु सहा महिन्यानंतर आनंदने दुसरं लग्न केलं आणि अनुजसाठी नवी आई घरात आली. त्याच कालावधीत जुईला ४ महिन्यांसाठी ऑस्ट्रेलियाला जावं लागलं, त्यामुळं तो आईला भेटू शकला नाही आणि बाबाने घरी नवी आई आणली म्हणून तो तिच्यासोबत रमला. आनंदची दुसरी बायको अश्विनी अनुजसाठी सर्व काही करत होती. प्रेमानं त्याची काळजीही घेत होती. एकदा त्याला जुईची खूप आठवण आली आणि तो हट्ट करू लागला, तेव्हा बाबांनी त्याला सांगितलं,“जुई तुला सोडून गेली आहे, आता अश्विनी हीच तुझी आई आहे.”

आणखी वाचा : यशोगाथा : ‘सिंगल मदर’ आईच माझी हिरो! संध्या रंगनाथच्या ट्विटनंतर क्रीडाप्रेमीही झाले भावूक!

सहा वर्षांच्या अनुजने तेच लक्षात ठेवलं होतं. जुई भारतात परतल्यानंतर ती अनुजला भेटण्याचा प्रयत्न करत होती, पण भेट घेण्यास तो नकार देत होता. त्याची भेटण्याची इच्छा नाही असं सांगून आनंदही जुईची आणि अनुजची भेट टाळत होता. शेवटी जुईने न्यायालयात मुलाच्या भेटीची मागणी करायला अर्ज दाखल केला आणि न्यायालयीन आदेशानुसार तो आज अनुजला समुपदेशकांकडे घेऊन आला होता. अनुजला समुपदेशकांच्या कक्षात आणल्यानंतर अनुज सारखं एकच वाक्य बोलत होता, “मला कोणालाही भेटायचं नाही, मला लवकर घरी जाऊ द्या.” समुपदेशकांनी त्याच्या बाबांना बाहेर थांबवून केवळ अनुजशी बोलण्याचं ठरवलं.

आणखी वाचा : चॉइस तर आपलाच : मुलं अभ्यास टाळतात? 

समुपदेशक वेगळ्याच विषयावर अनुजशी गप्पा मारीत होत्या. त्याच्या शाळेतील मित्र,त्याच्या आवडी निवडी,त्याचे कॉम्प्युटर गेम्स इत्यादी वेगवेगळ्या विषयांवर तो मोकळेपणाने त्यांच्याशी बोलत होता. मात्र मध्येच त्याला काहीतरी आठवलं म्हणून तो म्हणाला, “मावशी, मी एक प्रश्न विचारू का तुला?” “हो अनुज, विचार ना तुला काय विचारायचे ते.”
“मावशी, अगं, माझे सगळे फ्रेंड्स आहेत ना, त्या सगळ्यांना एकच आई आहे, मग मला दोन आई कशा?” सहा वर्षाच्या अनुजला काय उत्तर द्यावं याचा संभ्रम समुपदेशकांनाही पडला,तरी त्याच्या वयाचा विचार करून त्या म्हणाल्या, “अनुज, तुला कृष्णाची गोष्ट माहिती आहे का रे?” “हो मावशी, आमच्या टिचरने शाळेत दहीहंडीच्या दिवशी सांगितली होती.” अनुजने उत्तर दिलं आणि वसुदेवांनं त्याला टोपलीत घालून कसं यशोदेकडं पोहोचतं केलं, ती कृष्णाची जन्मकथाही त्यानं थोडक्यात सांगितली. तेव्हा समुपदेशकांनी त्याला विचारलं, “ अनुज आता तू सांग, कृष्णाच्या आईचं नाव काय?”
“ मावशी, अगं तुला एवढंही माहिती नाही? कृष्णाला जन्म देणारी देवकी माता आणि त्याला वाढवणारी यशोदा माता.” तो निरागसपणे बोलला.
“अरे हो खरंच की, म्हणजे कृष्णाला दोन आई होत्या, एक देवकी आणि दुसरी यशोदा.”.
समुपदेशकांच्या या बोलण्यावर अनुज एक मिनिटं थांबला, काहीतरी सापडल्यासारखं तो म्हणाला,
“मावशी, खरंच की, म्हणजे मी कृष्णासारखा ग्रेट आहे, मलाही दोन आई -एक जुई आणि एक अश्विनी.”
त्याला आपल्या चेहऱ्यावरील आनंद लपवता आला नाही. आता समुपदेशकांनी मुद्द्यावर येऊन त्याच्याशी चर्चा करण्यास सुरुवात केली, “काय रे अनुज, जेव्हा देवकीमातेकडून कृष्णाला यशोदामातेकडे आणलं त्यानंतर तो केव्हाच देवकी मातेला भेटला नाही का?”
“अगं, भेटला ना. त्यानं कंस मामाशी युध्द केलं आणि तुरुंगातून देवकी मातेला सोडवलं. मला सगळी गोष्ट माहिती आहे.” त्यानं भराभर सगळी गोष्ट सांगायला सुरुवात केली.

आणखी वाचा : नातेसंबंध: आईवडील लग्नासाठी मागे लागले आहेत?

आता मात्र समुपदेशकांनी त्याला थेट विचारलं, “कृष्ण जसा आपल्या देवकी मातेला भेटला, तसा तू तुझ्या जुई आईला भेटणार नाहीस का? तिलाही तुझी आठवण येते, ती ही तुझ्यासाठी रडत असते, आज ती माझ्याकडे आली आहे, भेटशील तिला?”
एकाही सेकंदाचा वेळ न घेता तो उत्तरला,
“हो, अगं मलाही तिची आठवण येतं असते गं, पण बाबा चिडतात म्हणून मी सांगतच नाही.”
समुपदेशकांनी आता जुईला त्यांच्या कक्षात बोलावलं. ती आत आली, त्याला डोळे भरून पाहिलं आणि अतिशय भावूकपणे तिनं दोन्ही हात पुढं करून त्याला साद घातली,
“अनु…. ”
तो जवळजवळ धावतच तिच्याकडं गेला आणि तिच्या मिठीत विसावला. आज एक वर्षानंतर माय लेकरांची भेट होत होती. हा सोहळा पाहण्यासाठी त्यांनी आनंदलाही कक्षात बोलावलं आणि त्याला सांगितलं, “आनंद नैसर्गिक प्रेम आपण कधीही थांबवू शकत नाही. तू आणि अश्विनी दोघे मिळून अनुजची खूप काळजी घेता, पण नैसर्गिक प्रेमापासून त्याला वंचित ठेवू नका. दोन्हीही आईचं प्रेम त्याला मिळू देत.”
आनंदही जुईची आणि अनुजची गळाभेट न्याहळत होता आणि नकळत त्याचेही डोळे भरून आले. नैसर्गिक प्रेमाची महती त्यालाही कळली.
(लेखिका कुटुंब न्यायालयात समुपदेशक आहेत.)
(smitajoshi606@gmail.com)

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marriage counseling relationship mother father and child family why have i two mothers how come vp
First published on: 24-02-2023 at 07:42 IST