डॉ. स्मिता प्रकाश जोशी

लग्न जोडीदाराशी होत असलं तरी तो प्रवेश असतो त्याच्या घरात. त्याच्या कुटुंबीयांमध्ये. माहेर सोडून आलेल्या तिचा नवा ऋणानुबंध तयार होतो. अशा वेळी गरज असते ती पूर्वग्रह दूर सारण्याची. प्रत्येकीचा अनुभव वेगळा आणि स्वत:चाच असायला हवा. कारण तिचं लग्न लागत असतं ते फक्त नवऱ्याशी नाही तर त्याच्या कुटुंबाशी.

“प्रिया, खूप छान दिसते आहेस. लग्न झाल्यानंतर तुझ्या चेहऱ्यावर एक वेगळाच ग्लो आला आहे.” “चल, काही तरीच काय, लग्नात मेकअप केला होता, तेव्हाचं ठीक आहे. आता दोन महिने झालेत माझ्या लग्नाला.” “प्रिया, हे मानसिक समाधानाचं प्रतीक आहे. तुझ्या मनाप्रमाणे जोडीदार मिळाला, लग्न छान पार पडलं आणि दोन्हीही कुटुंबांचं एकमेकांशी छान जुळलं, त्यामुळं तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद दिसतो आहे.”  ऑफिसमध्ये मोकळ्या वेळेत प्रिया आणि मीनल गप्पा मारत बसल्या होत्या तेवढ्यात विशाखा आलीच. न मागता सल्ले देण्याची हौसच होती तिला. “प्रिया, तुझं नवीन लग्न झालं आहे म्हणून सांगते, सासूने सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी ऐकण्याची काही गरज नाही, त्यांना तशीच सवय लागते. एखादी गोष्ट मनाविरुद्ध झाली की लगेच सून वाईट होते आणि माहेरच्या सगळ्या गोष्टीही त्यांना सांगत जाऊ नकोस, त्यांच्या अपेक्षा वाढत जातात.

हेही वाचा >>> नातेसंबंध: तुमचं नातं फक्त शारीरिक आहे का…?

सासर आणि माहेर यात अंतर असलेलेच बरं आणि बाकीची नाती जाऊ देत, तुझ्या नवऱ्याला फक्त सांभाळ. त्याचं आणि तुझं जमलं तर संसार चांगला होणार, इतर नात्यांचं काही नसतं.” मीनलला विशाखाचा रागच आला. ती लगेच म्हणालीच, “विशाखा, अगं तिचं नवीन लग्न झालं आहे आणि तिला काही तरीच काय शिकवतेस?” “मीनल, म्हणूनच तर तिला अनुभवाचे बोल सांगते आहे.” “विशाखा, तू म्हणतेस ते योग्य नाही. संसार फक्त दोघांचा नसतो, कुटुंबाची इतर नातीही महत्त्वाची असतात.” मीनल समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत होती, परंतु विशाखाला ते पटत नव्हतं, तिनं तिचं म्हणणं मांडलंच, “पती-पत्नीचं नातं चांगलं असणं महत्त्वाचं, त्यात नातेवाईकांचा काय संबंध? प्रेमात पडलेली जोडपी आईवडिलांच्या नात्यांचा विचार करतात? त्यांच्या आवडीनिवडीचा विचार करतात? त्यांचा विरोध असला तरी ते लग्न करतातच ना? शेवटी दोघांमधील प्रेम महत्त्वाचं. ते म्हणतात ना, ‘मिया बीबी राजी, तो…”

आता मीनल पुन्हा स्पष्टीकरण देऊ लागली,

“अगं, हे प्रेम काही दिवस टिकतं, पण जेव्हा खऱ्या अर्थानं संसार सुरू होतो तेव्हा या प्रेमापलीकडे जाऊन इतर नात्यांचीही गरज लागतेच. दोघांच्या प्रेमाबरोबरच कौटुंबिक नात्यांची त्याला जोड असली तर त्या प्रेमाची गोडी टिकते. यासाठी दोन व्यक्तींबरोबर दोन्ही कुटुंबंही एकत्र येणं महत्त्वाचं आहे.”

हेही वाचा >>> नात्यातले गैरसमज धुमसत ठेवणं घातकच!

प्रियाला मात्र मीनलचं म्हणणं पटलं. ती म्हणाली, “हे बाकी खरं आहे, दोन्ही कुटुंबांचे विचार जुळणं फार महत्त्वाचं आहे. फक्त नवराबायकोचे एकमेकांशी विचार जुळवून चालत नाही. ते दोघेही त्या कुटुंबाचा भाग असतात आणि कुटुंबाचा प्रभाव दोघांवरही असतो. दोन्हीकडच्या नातेवाईकांचे एकमेकांशी पटलं तर पती-पत्नीच्या नात्याला अधिक बहर येतो. एकमेकांच्या मुद्दाम चुका काढणं, एकमेकांच्या विरुद्ध भडकवणं इत्यादी नातेसंबंधात येणाऱ्या अडचणी कमी होतात. आता बघ ना, माझे आईबाबा आणि सासू-सासरे चौघे एकत्र ट्रिपला चालले आहेत, आम्ही दोघेही उत्साहानं त्यांची तयारी करून देत आहोत.” विशाखाला मात्र अजूनही हा मुद्दा पटत नव्हता,

“प्रिया, तुझं नवीन लग्न झालं आहे. नव्याचे नऊ दिवस चांगलेच असतात, पण नंतर सगळं बिघडतं. मनातील सर्व गोष्टी आपण सासरी बोलू शकत नाही. सासू कधीच आई होऊ शकत नाही. काहीही असलं तरी सासर आणि माहेर यात अंतर असायलाच हवं.”  मीनलने मात्र आपला मुद्दा लावून धरला, “विशाखा, ज्या वेळी मुलगी सासरच्या घराला आपलं घर मानेल, तेव्हाच ती त्या घरात रमेल. ही माणसं वेगळी आहेत, हे तिनं मनात ठेवलं तर ती कधीच त्या कुटुंबाची होणार नाही. एक लक्षात ठेव, लग्नामुळे कोणत्याही मुलीला आपलं कुटुंब सोडून यावं लागत नाही तर लग्न झाल्यामुळं आपल्या कुटुंबाचा परिघ विस्तारतो, माहेरच्या बरोबर सासरची माणसंही तिचीच होतात. मुलगी, मावशी, आत्या या नात्यांबरोबरच आता ती कोणाची तरी पत्नी, सून, जाऊ, मामी, काकू होते. किती नाती वाढतात? या सर्वांना तिनं आपलं म्हटलं तर तिला सासर आणि माहेर वेगळं वाटणारच नाही. सासूला अगदी आईचं स्थान देता आलं नाही तरी, सासरी आईला पर्याय तीच असते.

सासरी काही दुखलं-खुपलं तर तीच सुनेची काळजी घेते. नवीन आलेल्या सुनेने जर मोकळेपणाने वागून घरातील माणसांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं तर तिला त्यांचं प्रेम मिळेलच.” खरं तर मीनल काय म्हणतेय ते विशाखाला समजत होतं, पण तिच्या संसारात तिचे अनुभव चांगले नव्हते. त्यांच्या संसारात सासूचा हस्तक्षेप जास्त होता आणि त्यामुळं पती-पत्नीच्या नात्यात इतर कोणी नकोच असंच तिला वाटत होतं. “मीनल, हे सगळं दोन्हीकडून असावं लागतं गं, सासरच्या लोकांनीही तिला आपलं समजायला हवं, तिलाही सासरचं घर आपलं वाटेल असं वागायला हवं. ती आपलं घर सोडून पतीच्या कुटुंबात नव्यानं राहायला आलेली असते. तिला माणसं नको असतात असं नाही; पण त्या दोघांच्या नात्यात जेव्हा इतर कोणाची घुसखोरी होते, तेव्हा ती माणसंच नकोत असं तिला वाटायला लागतं.” विशाखाचा स्वर आता हळवा झाला होता. “विशाखा, तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे. नात्यांचा समंजस स्वीकार दोन्ही बाजूंनी व्हायला हवा; पण अनेक पूर्वग्रह आणि दुसऱ्यांचे अनुभव हे आपल्या सोबत असतात, त्यामुळं चुका दोन्हीकडून होतात. आता बघ, प्रिया सर्व नात्यांमध्ये खूश आहे, पण तू तुझं मत तुझ्या अनुभवाने तिला सांगितलंस, हे जर तिच्या डोक्यात राहिलं तर ती त्याचं नजरेनं सासूकडे बघेल. म्हणूनच दुसऱ्याचे अनुभव आपल्या संसारात लावायचे नाहीत. मुलाचं लग्न ठरल्यावर इतर नातेवाईक, मैत्रिणी त्याच्या आईला सांगतात, ‘हल्लीच्या मुलींना सासू-सासरे नकोच असतात, जरा जपून वाग.

हेही वाचा >>> कुटुंबात तुम्हाला डावललं जातंय?

घरातील सर्व गोष्टी लगेचच तिला सांगू नकोस.’ या सर्वांतून एक पूर्वग्रह निर्माण होतो आणि अंतर ठेवून वागलं जातं. हे व्हायला नको. प्रत्येकाने आपल्या नात्यांचा अनुभव घ्यावा, नाती समृद्ध करण्यासाठी एकमेकांना समजावून घ्यावं आणि स्वतःचे निकष स्वतः लावावेत. ज्या घरात पती-पत्नीची इतर नात्यांशीही नाळ जुळते तिथं संसार चांगला होतोच. विशाखा, अगं, मुलीला जसं माहेरी मन मोकळं करण्याची गरज असते ना, तसंच मुलालाही त्याच्या आईवडिलांशी बोलण्याची गरज असते. याच बाबतीत पती आणि पत्नी दोघांनीही एकमेकांना स्पेस देणं गरजेचं आहे. दोघांनीही एकमेकांच्या नात्यांचा आदर ठेवला आणि आपली कर्तव्यं पार पाडली तर अडचणी कमी होतील. मतभेद असतील तरीही दुसरीकडे एकमेकांची बदनामी न करता, एकमेकांशी बोलून मार्ग काढायला हवेत.” विशाखा आता शांत झाली होती. आपल्यातील नातं कसं बिघडत गेलं आणि इतरांच्या अनुभवाने आपण कसं पूर्वग्रहदूषित झालो, हे तिच्याच लक्षात आलं, प्रियाला आपण उगाचंच चुकीचे सल्ले दिले असं तिला वाटून गेलं. ती म्हणाली, “प्रिया, सॉरी, मी जे काही सांगितले त्याकडं तू दुर्लक्ष कर. तुझे व्यक्तिगत अनुभव महत्त्वाचे. मी जी चूक केली ती तू करू नकोस. मीनलचं म्हणणं बरोबर आहे, हे माझ्याही लक्षात आलं आहे. लग्नात केवळ पती-पत्नी नाही तर संपूर्ण कुटुंबाने एकत्र येणं महत्त्वाचं आहे. मीनल, धन्यवाद, तू एक मैत्रीण म्हणून आज माझ्या चुकीच्या विचारांची मला जाणीव करून दिलीस.” विशाखा ‘सेंटी’ झालेली पाहून मीनलने गप्पा आवरत्या घेतल्या, “विशाखा, आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम झाला असेल, तर काही तरी खाऊन घेऊ, जाम भूक लागली आहे.” “येस, माझ्या सासूबाईंनी केलेला खमंग चिवडा आणि रव्याचे लाडू आपली वाट बघत आहेत,” असं म्हणून प्रियाने तिच्या बॅगमधील डबा बाहेर काढला आणि तिघींनी मिळून त्यावर छान ताव मारला.