मीनाक्षी भूपालन हिनं अन्नकचऱ्यावर केलेल्या प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांना दर्जेदार खत मिळत आहे. खरकटं, फळांच्या-भाज्यांच्या साली, बिया, देठं, खराब झालेली फळे/भाज्या, कांद्याची सालं, बटाट्याची साल, तसेच उपाहारगृह, घरं, लग्न समारंभ, कँटीन्स, बाजारामधून निघणाऱ्या अन्नकचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. यापासून तयार झालेलया कम्पोस्ट खताचा उपयोग जमिनीचा पोत सुधारण्यासाठी व पोषकतत्त्व वाढवण्यासाठी होतो.

घरगुती अन्नकचऱ्याचा वापर पर्यावरणासाठी करण्याचं ध्येय मनात बाळगून एका तरुणीनं सेंद्रिय खताची निर्मिती केली. आज तिच्या प्रयत्नांना भरभरून यश मिळालं आहे. तिचा हा प्रकल्प शेती, नर्सरी, कुक्कुटपालन, मत्स्यपालन या क्षेत्रांसाठी अनोखं वरदान ठरत आहे. मीनाक्षी भूपालन असं या तरुणीचं नाव आहे. तमिळनाडूतील मदुराई येथे तिचा जन्म झाला. तिने ‘ऊर्जा आणि पर्यावरण अभियांत्रिकी शाखेतून शिक्षण घेतलं असून, ती पर्यावरणतज्ज्ञ म्हणून काम करते. मीनाक्षीाल शाळेत असल्यापासूनच पर्यावरणाशी संबंधित गोष्टींवर अभ्यास करण्याची इच्छा होती असं ती सांगते. त्यानुसार तिनं अभ्यासासाठी पर्यावरण क्षेत्र निवडलं आणि त्यातच काहीतरी वेगळं करण्याचा निर्णय घेतला. ती ‘इइटीए सस्टेनेबल सोल्युशन्स’ची संस्थापकही आहे.

ही कंपनी सुरू करण्यापूर्वी तिनं कार्पोरेटमध्ये कचरा व्यवस्थापन या क्षेत्रात काम करत होती. तेव्हा तिच्या लक्षात आलं की, कागद, प्लास्टिक यांसारख्या वस्तूंवर प्रक्रिया करणारी बरीच केंद्रे आहेत, मात्र ही प्रक्रिया अतिशय खर्चीक असून ती वेळखाऊ आहे. देशातील एकूण कचऱ्यापैकी ७० टक्क्यांहून अधिक कचरा हा ‘अन्नकचरा’ (Food waste) आहे. घरातील अन्न कचऱ्यापासून सेंद्रिय खताची निर्मिती लवकर होऊ शकते, मात्र यावर काम करणारे खूपच कमी प्रकल्प आहेत. यामुळे तिनं अन्न कचऱ्यापासून केवळ १० ते १५ दिवसांत पोषक खत आणि प्रथिनयुक्त पशुखाद्य तयार करण्याची पद्धत विकसित केली. विशेष म्हणजे या खतांमुळे जमिनीची सुपिकता वाढायलाही मदत झाली.

सतत वाढणाऱ्या अन्नकचऱ्याच्या समस्येला उत्तर देण्यासाठी मीनाक्षीनं ‘इइटीए सस्टेनेबल सोल्युशन्स’ या त्यांच्या स्टार्टअपद्वारे, अन्नकचऱ्याचे रूपांतर सेंद्रिय खत आणि जैविक खतां(bio-fertilizers) मध्ये करण्याची प्रणाली विकसित केली आहे. यासाठी तिनं तिच्या महाविद्यालयातील अन्य मित्र-मैत्रिणींसह ब्लॅक सोल्जर फ्लाय लार्वा या किटकाच्या माध्यमातून अन्नकचऱ्याचं झपाट्यानं विघटन करण्याची प्रक्रिया शोधून काढली. लार्वा अळ्यांच्या मदतीनं केवळ १५ दिवसांत अन्नकचऱ्याचे रुपांतर सेंद्रिय खत आणि जैविक खतात करू शकलो. ही प्रक्रिया अतिशय साधी असून अत्यंत परिणामकारक आहे, असं मीनाक्षी सांगते.

अन्नकचऱ्यावर प्रक्रिया कशी केली जाते याविषयी विस्तृत माहिती देताना तिनं सांगितले की, ‘‘आम्ही लार्वा अळ्यांना अन्नकचऱ्यात सोडतो. या अळ्या कचरा खातात आणि आकारानं वाढतात. त्यानंतर अवघ्या १० ते १५ दिवसांतच त्या संपूर्ण अन्नकचरा खाऊन संपवतात आणि शेवटी फक्त अळ्या आणि त्यांची विष्ठा एवढंच उरतं. यातून विक्रीयोग्य उत्पादनं तयार होतात. जैव अभियांत्रिकी (bioengineering) आणि सूक्ष्मजीव तंत्रज्ञान वापरून, शहरांमधून गोळा झालेला अन्नकचरा प्रक्रिया करून पोषकद्रव्ययुक्त खतात रूपांतरित केला जातो. हे खत शेतकऱ्यांना आणि बागायतदारांना पुरवलं जातं. अळीमुळे तयार झालेलं प्रथिनयुक्त खत कोंबडी पालन आणि मत्स्यपालनसाठी वापरलं जातंच शिवाय नायट्रोजन आणि फॉस्फरस यांसारख्या पोषक तत्त्वांनी समृद्ध असं कम्पोस्ट खत नर्सरी, बागा, आणि शेतीसाठी विकलं जातं. लार्वाच्या अळ्यांचा पशुखाद्य म्हणून दिल्या जातात.

घरातील अन्न कचऱ्यापासून सुरुवात…

घरगुती अन्नकचरा गोळा करून त्यावर प्रक्रिया करण्यास सर्वप्रथम मीनाक्षीनं सुरुवात केली. त्यानंतर मदुराई महानगरपालिकेनं तिच्या या संशोधनाबाबत कौतुक करत तिचा सन्मान केला. त्यांनी तिला याविषयी पहिला ‘पायलट प्रकल्प’ राबवण्याची संधी दिली. तिथे सध्याच्या घडीला ५०० ते ८०० किलो अन्नकचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. भविष्यात फक्त मदुराईच नाही तर भारतातील वेगवेगळ्या राज्यांमधून दररोज ३ टन अन्नकचरा प्रक्रिया प्रकल्प राबवण्याचा तिचा मानस आहे. या खतामुळे जमीन अधिक सुपीक होते. रासायनिक खतांचा वापर कमी होतो आणि शेतकऱ्यांनाही सेंद्रिय पिकांचे उत्पादन घेण्यासाठी प्रोत्साहन मिळतं असं ती सांगते.

सेंद्रिय पिकासाठी वरदान

मीनाक्षी भूपालन हिनं अन्नकचऱ्यावर केलेल्या प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांना दर्जेदार खत मिळत आहे. अनेक पोल्ट्री फार्म्स, मत्स्यपालन यांना पशुखाद्य तसंच शेतकऱ्यांना खताचा उपयोग होतो. खरकटं, फळांच्या-भाज्यांच्या साली, बिया, देठं, खराब झालेली फळे/भाज्या, कांद्याची साल, बटाट्याची साल, तसेच उपाहारगृह, घरे, लग्न समारंभ, कँटीन्स, बाजारामधून निघणाऱ्या अन्नकचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. यापासून तयार झालेलया कम्पोस्ट खताचा उपयोग जमिनीचा पोत सुधारण्यासाठी व पोषकतत्त्व वाढवण्यासाठी होतो. यामुळे गांडूळ आणि सूक्ष्मजीवनही कचरा विघटनाची प्रक्रिया नैसर्गिक पद्धतीने करतात. याशिवाय बायोगॅस प्लांटसाठीही याचा वापर होतो. यातून तयार झालेला गॅस स्वयंपाकासाठी किंवा जनरेटरसाठी वापरला जातो.

‘ब्रिटानिया’ कंपनीनं मीनाक्षीच्या प्रकल्पाला मान्यता दिली असून ‘Her stratup school’ या स्त्री उद्योजिका मंचावरही ती झळकली आहे. तिनं आणि तिच्या सहकाऱ्यांनी मिळून लावलेल्या या शोधामुळे दररोज शेकडो टन अन्नकचऱ्यातून सेंद्रिय खताची निर्मिती केली जाते. आर्थिकदृष्ट्या शेतकऱ्यांना परवडेल अशा पर्यावरणपूरक तंत्राचा वापर करून अन्नकचऱ्याचं व्यवस्थापन करण्याचा तिचा मानस आहे. भारतामध्ये अन्नकचरा व्यवस्थापन ही अत्यंत मोठी समस्या आहे, आणि त्यावर मोठ्या प्रमाणात काम होणं गरजेचं आहं. त्यामुळे भविष्यात भारतभरात लाखो टन अन्नकचरा पर्यावरणपूरक पद्धतीने उपयोगात आणला जाऊ शकतो. आपल्या संस्थेमार्फत हे ध्येय गाठण्याचं तिचं स्वप्न आहे. ती म्हणते, “कचऱ्याकडे फक्त कचरा म्हणून न पाहता त्याची योग्य विल्हेवाट लावल्यास त्यातून सोनं उगवू शकतो.” namita.warankar@expressindia.com