फ्रुटी आणि अॅपी फिज ही पेय प्रत्येक गावातील, शहरातील, तालुक्यातील दुकानात सहज उपलब्ध आहे. नेक्स्ट जनरेशनच्या पसंतीस उतरलेलं आणि प्रचंड विक्री असणारी ही दोन्ही पेय पार्ले कंपनीची उत्पादनं आहेत. १९२९ सालापासून पार्लेने विविध उत्पादनं देऊन भारतीयांच्या मनावर अधिराज्य गाजवलंय. पार्ले कंपनीच्या मालकाची सध्या चौथी पिढी व्यवसायात आहे. या चौथ्या पिढीनेही ग्राहकांच्या मनावर चांगली पकड ठेवली असून नवनव्या उत्पादनाने ग्राहकांना आकर्षित करत आहे. तसंच, फ्रुटी आणि अॅपी फिजची कल्पना प्रत्यक्षात आणण्यामध्ये पार्ले कंपनीच्या मालकाच्या चौथ्या पिढीतील एका महिलेचा हात आहे. तिच्याचविषयी आज आपण जाणून घेऊयात.
पार्ले अॅग्रोने भारताच्या बाजारपेठेतील प्रसिद्ध मँगो ड्रिंक तयार केले आणि कल्पक पॅकेजिंग सुधारणांसह ते देशभरातील ग्राहकांना उपलब्ध करून दिले.आज, पार्ले अॅग्रोमार्फत अनेक उत्पादने होत असून फ्रूटी हे त्यांचं प्रमुख उत्पादन आहे. फ्रुटीची एकूण विक्री ४८ टक्क्यांपेक्षा पेक्षा जास्त आहे. भारतीय शीतपेय बाजारातील क्रांतीमागे नादिया आणि शौना चौहान या दोन बहिणींची कमाल आहे. या दोघींची धोरणात्मक दृष्टी आणि पूरक कौशल्य यामुळे त्यांनी पार्ले अॅग्रोला खूप उंचीवर नेले. एका १७ वर्षांच्या मुलीनं भारतीय शीतपेय बाजारात आपला दबदबा कसा निर्माण केला, याची ही कथा.
नादिया चौहान सध्या पार्ले अॅग्रोच्या मुख्य विपणन अधिकारी आणि संयुक्त व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम करतात. नादिया चौहानचा जन्म कॅलिफोर्नियामध्ये झाला. परंतु संपूर्ण बालपण मुंबईत गेलं. त्यांनी एचआर कॉलेजमध्ये कॉमर्सचे शिक्षण घेतलं. नादिया फक्त चांदीचा चमचा घेऊन जन्मला आल्या नव्हत्या, तर कुटुंबातील व्यवसायिक गुणही त्यांच्या अंगी उतरले होते. त्यांचा कौटुंबिक वारसा नादियांना पुढे चालवायचा होता हे त्यांनी लहानपणीच जाणलं होतं. त्यामुळे लहानपणापासून कंपनीच्या अनेक बैठकांमध्ये त्या त्यांच्या वडिलांसोबत जायच्या. वयाच्या ११ व्या वर्षी त्या पहिल्यांदा बैठकीला गेल्या होत्या. तर, वयाच्या १७ व्या वर्षी नादिया पार्ले अॅग्रोमध्ये अधिकृत रुजू झाल्या. त्यानंतर त्यांंनी कंपनीचा विस्तार झपाट्याने केला. कारण, नादिया यांच्याच रक्तातच व्यवसाय होता.
१९२९ मध्ये नादियाचे पणजोबा मोहनलाल चौहान यांनी पार्ले ग्रुपची स्थापना केली होती. मधल्या काळात या कंपनीत अनेक बदल झाले. अनेक उत्पादने आली. २००३ साली नादिया पार्ले अॅग्रोमध्ये दाखल झाल्या. तेव्हा त्या अवघ्या १७ वर्षांच्या होत्या. त्यावेळी फ्रुटीचंच उत्पादन आणि विक्री सर्वाधिक होत होतं. झपाट्याने बदलणाऱ्या बाजारात टिकायचं असेल तर ग्राहकांना आवडेल अशी उत्पादने देणं गरजेचं आहे हे नादियाने ओळखलं. त्यामुळे अनेक उत्पादने बाजारात आणली. तसंच, फ्रुटीचीही विक्री वाढवली. फ्रुटीची लोकप्रियता इतकी वाढली की शाहरुख खानपासून अलिया भट्टपर्यंत अनेक सेलिब्रिटींनी त्याच्या जाहिराती केल्या. आज पार्ले अॅग्रोकडून अॅपी, अॅपी फिज, बी फिज, बेले, बेले सोडा, ढिशूम, फ्रिओ, फ्रूटी, बॉम्बे ९९ आणि स्मूथ अशी उत्पादने होतात, ही माहिती पार्ले अॅग्रोच्या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
नादिया यांनी आणलेलं अॅप्पी फिज हे पेयही अल्पावधीत लोकप्रिय ठरलं. लोकांची आवड लक्षात घेऊन त्यांनी व्यवसायात केलेले बदल कंपनीसाठी लाभदायक ठरले. सफरचंदाचे कोणतेच पॅकेज स्वरुपातील पेय आधी भारतीय बाजारात उपलब्ध नव्हते. परंतु, नादिया यांनी ही कामगिरी करून दाखवली. तंत्रज्ञान आणि उत्पादनाच्या दृष्टीकोनातून हे फार आव्हानात्मक होते. २००५ साली लॉन्च केलेला अॅपी फिजचा प्रयोग गेम चेंजर ठरला. अल्पावधितच हा प्रयोग हिट ठरल्याने पार्लेचा व्यवसाय पुन्हा वाढीस लागला.
पार्ले अॅग्रोची कमान बहिणींच्या हाती
पार्ले अॅग्रोच्या यशामागे चौहान भगिनींची उत्तम भागीदारी आहे. शौना ही नादियाची मोठी बहिणी असून त्या कंपनीचे उत्पादन, अनुपालन, गुणवत्ता, वित्त आणि तांत्रिक कार्यांचे नेतृत्व करतात. तर, नादियाकडे रणनीती, विक्री आणि विपणन, संशोधन आणि विकासाची जबाबदारी आहे, अशी माहिती Financial एक्स्प्रेसने दिली आहे. या दोघींनी आपल्या कौशल्याच्या बळावर जबाबदाऱ्या वाटून घेतल्याने कंपनी यशाच्या उंचीवर पोहोचली आहे. कौटुंबिक व्यावसायात मुलं वारसा चालवतात. त्यांच्याच हातात उद्योग जातो. परंतु, वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत या चौहान भगिनींनी मोठी कामगिरी केली आहे. त्यामुळे त्यांचं नेहमीच कौतुक केलं जातं.