दोन वर्षांपूर्वीच दिव्या बुद्धिबळ कारकीर्दीला पूर्णविराम देण्याबाबत विचार करत होती. खेळातच पुढे जावं की अभ्यासाला प्राधान्य द्यावं अशा द्विधा मनःस्थिती ती सापडली होती. सतत बुद्धिबळ खेळून तिला मानसिक थकवाही जाणवू लागला होता. तसेच लहान वयात कारकीर्द आणि वैयक्तिक आयुष्य यात समतोल साधणंही तिला अवघड जात होतं. मात्र, २०२४ च्या सुरुवातीस तिनं निर्णय घेतला. हे वर्ष पूर्णपणे बुद्धिबळासाठी द्यायचं. खेळावरच लक्ष केंद्रित करायचं. यश मिळालं तर ठीक, अन्यथा आपला मार्ग बदलायचा असं दिव्यानं ठरवलं. काही महिन्यांतच ती कनिष्ठ गटात जगज्जेती झाली. मग तिच्या कामगिरीने प्रतिष्ठेच्या ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय महिला संघाला ऐतिहासिक सुवर्णपदक मिळविण्यातही मदत झाली. त्यानंतर दिव्यानं मागे वळून पाहिलं नाही.

गेला आठवडाभर भारतीय क्रीडा जगतात एकाच नावाची चर्चा होती- दिव्या देशमुख. नागपूरच्या या १९ वर्षीय मराठी मुलीनं विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेचं जेतेपद पटकावत इतिहास घडवला. विश्वचषक जिंकणारी भारताची पहिली महिला बुद्धिबळपटू म्हणून लौकिक मिळवतानाच दिव्यानं प्रतिष्ठेचा ‘ग्रँडमास्टर’ किताबही पटकावला. ‘ग्रँडमास्टर’ होणारी भारताची पहिली महिला बुद्धिबळपटू असणाऱ्या कोनेरू हम्पीला अंतिम फेरीत पराभूत करत दिव्यानं विश्वचषकावर आपलं नाव कोरलं हे विशेष.

महिला बुद्धिबळात चीनला टक्कर देणंही अवघड असल्याचं मानलं जातं. आजवरच्या १७ महिला जगज्जेत्यांपैकी सहा जणी चीनच्या आहेत. २०१६ सालापासून चिनी महिलेकडेच जगज्जेतेपद राहिलं आहे. मात्र, विश्वचषक स्पर्धेत दिव्या आणि हम्पी यांनी चिनी प्रतिस्पर्ध्यांना हरवून अंतिम फेरीपर्यंतचा पल्ला गाठला. त्यातच दिव्यानं जेतेपद पटकावत युवाशक्तीचं वेगळेपण दाखवून दिलं.

दिव्याच्या या सर्व प्रवासाची सुरुवात २०१० मध्ये नागपुरातूनच झाली. थोरली बहीण आर्या बॅडमिंटनचे धडे गिरवत असताना पाच वर्षांची दिव्याही तिच्याबरोबर जायची. त्याच ठिकाणी बुद्धिबळाचंही प्रशिक्षण दिलं जात होतं. दिव्याला मात्र ६४ घरांची भुरळ पडली. तिथपासून दिव्याची चौसष्ठ घरांच्या पटावरील घोडदौड सुरू झाली. दोन वर्षांतच तिनं सात वर्षांखालील गटात राष्ट्रीय स्पर्धेत जेतेपद पटकावलं. त्यानंतर तिनं विविध वयोगटांतील स्पर्धेत वर्चस्व गाजवण्यास सुरुवात केली. २०२२ साली वयाच्या १६व्या वर्षी दिव्यानं राष्ट्रीय महिला स्पर्धेत अजिंक्यपद मिळविण्याची किमया साधली. पुढच्याच वर्षी ती आशियाई महिला स्पर्धेतही विजेती ठरली. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर तिची स्वतंत्र ओळख निर्माण झाली.

हम्पी, द्रोणावल्ली हरिका आणि आर. वैशाली या ‘ग्रँडमास्टर’ असलेल्या त्रिकुटासह भारतीय महिला बुद्धिबळाचा चेहरा म्हणून दिव्याकडे पाहिलं जाऊ लागलं. त्यानंतर २०२२ आणि २०२४ च्या ऑलिम्पियाडमध्ये तिनं एकूण तीन सुवर्णपदकं मिळवून भारतासाठी निर्णायक भूमिका बजावली. मात्र, या सगळ्या यशानंतरही ती ‘ग्रँडमास्टर’ किताबासाठी आवश्यक असलेला एकही निकष पूर्ण करू शकली नव्हती.

दिव्या महिला विश्वचषक स्पर्धेसाठी जॉर्जिया येथे दाखल झाली, तेव्हा ती ‘आंतरराष्ट्रीय मास्टर’ होती. स्पर्धेत १०० हून अधिक बुद्धिबळपटू सहभागी झाल्या. यात महिला बुद्धिबळात मक्तेदारी असलेल्या चीनच्या नऊ खेळाडूंचाही समावेश होता. अनेक अनुभवी आणि दिग्गज खेळाडूंच्या गर्दीत दिव्याकडून जेतेपदाची अपेक्षा बाळगली जात नव्हती. मात्र, दिव्यानं एकामागून एक धक्कादायक निकालांचा धडाकाच लावला.

उपउपांत्यपूर्व फेरीत द्वितीय मानांकित चीनची झू जिनेर, उपांत्यपूर्व फेरीत हरिका, मग उपांत्य फेरीत माजी जगज्जेत्या आणि जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी असणाऱ्या चीनच्या टॅन झोंगयीला पराभूत करत दिव्यानं जेतेपदाची संधी निर्माण केली. मात्र, तिच्या स्वप्नपूर्तीच्या मार्गात भारताची सर्वकालीन सर्वोत्कृष्ट महिला बुद्धिबळपटू अशी ख्याती असलेल्या हम्पीचं आव्हान होतं. १९ वर्षीय दिव्या आणि ३८ वर्षीय हम्पी यांच्यातील अंतिम फेरीला ‘दोन पिढ्यांतील लढत’ असं संबोधले गेलं. अखेर या लढतीत बुद्धिबळाचा ‘मॉडर्न’ चेहरा वरचढ ठरला.

या स्पर्धेदरम्यान दिव्याची मानसिक कणखरता सर्वांत लक्षवेधी ठरली. दिव्या अतिशय निडर खेळासाठी आणि आक्रमक चलींसाठी ओळखली जाते. विश्वचषक स्पर्धेत तिनं लौकिकाला साजेसा खेळ केलाच, शिवाय आपल्या खेळाची दुसरी बाजूही दाखवली. काळ्या मोहऱ्यांनी खेळताना बचावाला आपलंसं करून तिनं प्रतिस्पर्धांची कोंडी केली. महिला बुद्धिबळपटू सहसा आपल्या खेळात बदल करणं किंवा अतिधोका पत्करणं टाळतात असं म्हटलं जातं. मात्र, नव्या युगातील दिव्या याला अपवाद ठरते.

अंतिम फेरीत पारंपरिक (क्लासिकल) प्रकारातील दोनही डाव बरोबरीत सुटल्यानंतर विजेतेपदाचा निकाल टायब्रेकरच्या आधारे लावण्यात आला. टायब्रेकर जलद (रॅपिड) पद्धतीने खेळला जातो. यात चाली रचण्यासाठी खेळाडूंकडे अतिशय कमी वेळ असतो. हम्पी या प्रकारातील विद्यमान जगज्जेती आहे. मात्र, तिच्याच ‘होम ग्राऊंड’वर तिला पराभूत करण्याची अविश्वसनीय कामगिरी दिव्यानं करून दाखवली. तिनं निर्णायक विजय काळया मोहऱ्यांनी खेळताना मिळवला हे अधिकच खास.

दोन वर्षांपूर्वीच दिव्या बुद्धिबळ कारकीर्दीला पूर्णविराम देण्याबाबत विचार करत होती. खेळातच पुढे जावं की अभ्यासाला प्राधान्य द्यावं अशा द्विधा मनःस्थिती ती सापडली होती. सतत बुद्धिबळ खेळून तिला मानसिक थकवाही जाणवू लागला होता. तसेच लहान वयात कारकीर्द आणि वैयक्तिक आयुष्य यात समतोल साधणंही तिला अवघड जात होतं. मात्र, २०२४ च्या सुरुवातीस तिनं निर्णय घेतला. हे वर्ष पूर्णपणे बुद्धिबळासाठी द्यायचं. खेळावरच लक्ष केंद्रित करायचं. यश मिळालं तर ठीक, अन्यथा आपला मार्ग बदलायचा असं दिव्यानं ठरवलं. काही महिन्यांतच ती कनिष्ठ गटात जगज्जेती झाली. मग तिच्या कामगिरीने प्रतिष्ठेच्या ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय महिला संघाला ऐतिहासिक सुवर्णपदक मिळविण्यातही मदत झाली. त्यानंतर दिव्यानं मागे वळून पाहिलं नाही.

आक्रमक शैली, उचित निर्णयक्षमता, धाडसी वृत्ती आणि बुद्धी कौशल्य यांसारख्या गुणांमुळे भविष्यात दिव्या जगज्जेतेपदासाठी प्रबळ दावेदार ठरू शकते, असं मत जाणकारांकडून व्यक्त केलं जात आहे. विश्वचषक जिंकून दिव्या पुढील वर्षीच्या ‘कँडिडेट्स’ स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे. ‘कँडिडेट्स’मधील विजेती बुद्धिबळपटू विद्यमान जगज्जेत्या चीनच्या जू वेन्जूनला किताबासाठी आव्हान देण्याची संधी मिळवेल. गेल्याच वर्षी पुरुषांमध्ये भारताच्या १८ वर्षीय दोम्माराजू गुकेशनं ‘कँडिडेट्स’ स्पर्धा जिंकून पुढे आजवरचा सर्वांत युवा जगज्जेता ठरण्याचा मान मिळवला होता. आता महिलांमध्ये दिव्याकडूनही अशाच प्रकारच्या कामगिरीची अपेक्षा बाळगली जाईल हे निश्चित.