एलिसा कार्सन हे नाव सध्या जगभरात चर्चेत आलं आहे. २४ वर्षीय असलेली ही अमेरिकन तरुणी मंगळावर जाणारी पहिली व्यक्ती असणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे, परंतु त्यात तथ्य नाही. असे असले तरी तिला मात्र मंगळावर पाऊल ठेवणारी पहिली व्यक्ती बनायचं आहे हे नक्की. तिचं हे स्वप्न खरं हाेईल की नाही हे येणारा काळच ठरवेल परंतु तिचा या ध्यासाचं कौतुक आहे.

अलीकडच्या जेन-झी मुलांना विचारले की, तुम्हाला मोठेपणी काय बनायचे आहे? तर ते सांगतात रॉकेट उडविणार, चंद्रावर जायचंय, मंगळावर जाऊन संशोधन करणार… अशी काहीतरी उत्तरे देताना दिसतात. मागच्या काही पिढ्यांसाठी चंद्रावर जाणं किंवा अंतराळात जाणं या गोष्टी स्वप्नवत वाटत असल्या तरीही आताच्या पिढीसाठी त्या सहज शक्य होणाऱ्या गोष्टी आहेत. इतकी विज्ञानाने प्रगती केली आहे. आता हेच पाहा ना, १० मार्च २००१ मध्ये अमेरिकेत जन्मलेल्या एलिसा कार्सनने ती तीन वर्षांची असताना मंगळावर जायचे स्वप्न बघितले आणि त्यासाठी ती प्रयत्न करीत आहे.

कोण आहे ही एलिसा? सर्वसामान्य अमेरिकन कुटुंबात जन्मलेल्या एलिसाँ आपलं शालेय शिक्षण बॅटनरूज या इंटरनॅशनल स्कूलमधून पूर्ण केलं. पुढे फ्लोरिडा इनस्टीट्युट ऑफ टेक्नॉलॉजीमधून ॲस्ट्रो बायोलॉजी या विषयात आपले पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. सध्या ती अंतराळ आणि ग्रह विज्ञान या विषयात पीएचडी करत आहे.एकदम मंगळावर जायची इच्छा कशी काय निर्माण झाली, या प्रश्नावर दिलेल्या एका मुलाखतीत ती म्हणाली की, योगायोग म्हणा की नियती, पण वयाच्या तिसऱ्या वर्षापासूनचे माझं हे स्वप्न आहे. त्यावेळी ‘द बॅकयार्डडीगन्स’ नावाचा एक कार्टून शो प्रसारित व्हायचा. त्यात प्रत्येक शो मध्ये मुलं एका वेगवेगळ्या साहसी मोहिमेवर जात असत. असंच एकदा ती मुलं मंगळावर जातात. मंगळाचा तो लालबुंद गोळा आणि तिथे घडणाऱ्या त्या गोष्टी पाहून, आपणदेखील मंगळावर जायचं हा विचार माझ्या मनात आला. मला आठवतंय, त्यावेळी बाबांना तऱ्हेतऱ्हेच्या शंका विचारून त्यांचं डोकं भणाणून सोडलं होतं. आणि तिथूनच माझ्या मनात ग्रह, अंतराळ या गोष्टींचे आकर्षण निर्माण झालं.

विद्यार्थीदशेपासून मुलांमध्ये अंतराळ, ग्रह-तारे याविषयी उत्सुकता वाढावी, त्यांच्यात संशोधन वृत्ती निर्माण व्हावी म्हणून नासातर्फे त्या त्या वयोगटासाठी अनेक उपक्रम राबविले जातात. वयाच्या ११व्या वर्षापासून एलिसा या उपक्रमात भाग घेत आहे. नासाचे सर्व १९ स्पेस गेम पूर्ण करणारी आणि नासाचा पासपोर्ट उपक्रम पूर्ण करणारी ती जगातील एकमेव तरुणी आहे. यावरूनच तिचा अंतराळ विषयात असलेला रस किती आहे, याची कल्पना येईल.

या उपक्रमांविषयी बोलताना एलिसा म्हणते, ‘‘नासाचे हे उपक्रम एका वेगळ्याच पातळीवरचे असतात. जेव्हा तुमच्या अवती-भवती तुमच्यासारखाच रस असलेली मुलं असतात, तेव्हा खूप काही शिकायला मिळतं. तिथं तुम्ही स्वत: तुमचे स्वत:चे रॉकेट तयार करता, त्यासाठी लागणारी मशिनरी, त्याचे उड्डाण या साऱ्या गोष्टींचा कंट्रोल तुमच्याकडे असतो. काही दिवसांसाठी का होईना, पण तुम्ही प्रत्यक्ष अंतराळवीराचे जीवन तुम्ही जगता. जरी या दिसायला छोट्या गोष्टी वाटत असल्या तरीही प्रत्यक्ष जीवनात खूप काही शिकवून जातात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मंगळावरील मोहिमेचा ध्यास घेतलेल्या एलिसानं स्वत:ची अशी एक खास तयारी सुरू केली आहे. त्यासाठी स्कुबा प्रशिक्षण, पायलट प्रशिक्षण, जी फोर्स प्रशिक्षण,तर्हेतर्हेचे स्पेस प्रशिक्षण ती पूर्ण करीत आहेत. मंगळावर जाण्यासाठी अजून पाच वर्षे असली तरीही एलिसा स्वत:ला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त ठेवत आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात आपल्या क्षेत्रातला कोण ना कोणतरी आदर्श हा असतोच, तसाच एलिसाचा देखील आहे. सन्माननीय अंतराळवीर सॅण्डरा मॅग्नस या तिच्या आदर्श आहेत. विशेष म्हणजे ती शालेय शिक्षण घेत असताना नासाच्या एका उपक्रमात तिची आणि सॅण्डराची भेट देखील झाली होती. त्यावेळी एलिसानं आपलं स्वप्न तिला सांगितलं. तिचं स्वप्न ऐकल्यानंतर सॅण्डराने, ‘‘स्वप्नं पाहण्यासाठी वयाची अट नसते. त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न आणि मनापासून कष्ट घेण्याची तयारी केली की ती पूर्ण होतातच,’’ असा प्रेमळ सल्ला तिला दिला होता. आज एलिसाची वाटचाल पाहता तिनं आपल्या या आदर्शाचा सल्ला किती मनापासून मानलाय,याची कल्पना येते.