आज रुपालीच्या घरी सर्वजणी जमल्या होत्या. महिन्यातून एकदा एकीच्या घरी जमायचं आणि मनसोक्त गप्पा मारायच्या, आपलं मन मोकळं करायचं. सुख दुःख एकमेकांशी शेअर करायचं, असं त्यांचं ठरलेलंच होतं. गप्पा मारताना एखादा विषय निघाला, की त्यावर सगळ्याजणी आपापले अनुभव सांगत. बोलता बोलता काहींचं म्हणणं पडलं, की काही व्यक्तींचे गुणधर्म ठरलेले असतात आणि ते कायमच त्याचप्रमाणे वागतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वनिताला हे काही पटतं नव्हतं. ती म्हणाली, “एखादी व्यक्ती तशी वागली म्हणून आपण सर्वचजण तसेच असतात असा शिक्का का लावायचा?” त्यावर प्रत्येकजणीने आपापला मुद्दा वनिताला पटवून सांगायला सुरुवात केली.

सागरिका म्हणाली, “वनिता, अगं कारलं तुपात तळलं आणि साखरेत घोळलं तरी ते त्याचा गुणधर्म सोडत नाही, तसंच सासू हा वर्ग आपला गुणधर्म कधीच सोडत नाही. सुनेवर तिला हक्क गाजवायचाच असतो. मी माझ्या सासुशी किती चांगली वागते, त्यांच्या म्हणण्यानुसार उपासतापास, देवधर्म अगदी सगळ्या गोष्टी करते. मग सून एवढं करते म्हणून त्यांनी कधी दोन शब्द कौतुकाचे बोलावेत, अशी माझी अपेक्षा असणं चुकीचं आहे का? पण नाही, त्या कधीही नातेवाईकांसमोर मला चांगलं म्हणणार नाहीत, माझं एवढंसं काही चुकलं तर नाव ठेवायला मात्र पुढे. शेवटी सासवा सगळ्या सारख्याच हेच मला पटलं आहे त्यामुळं,उगाचच आपण अपेक्षा ठेवण्यात काहीच अर्थ नसतो.”

पूजानेही तिचा मुद्दा मांडला, “अगं, सासू काय नवरा तरी आपलं कौतुक करतो का? खरं तर घरातील स्त्री आपलं घर सांभाळते, कुटुंब सांभाळते मग ‘तुझ्यामुळे आपला संसार झाला,’ असं आपल्या पत्नीला कितीजण म्हणतात? सगळे नवरे सारखेच. स्वतःचीच टिमकी वाजवणारे.”

सागरिका आणि पूजा पूर्णवेळ गृहिणी होत्या, पण श्यामल नोकरी करणारी होती. तिनंही तिचा मुद्दा सांगितला,“वनिता, अगं रुपाली म्हणते ते बरोबरच आहे, काही व्यक्तींच्या वर्तनाचा पॅटर्न ठरून गेलेला असतो, याचा अनुभवही आपल्यालाही येतोच ना? आता सासू, नवरा कसे वागतात हे तू कितीही जणींना विचारलंसं तरी जवळ जवळ ८० टक्के स्त्रिया अशीच उत्तरं देतील, जी सागरिका आणि पूजाची आहेत, तसंच माझ्यासारख्या नोकरी करणाऱ्या स्त्रियांना विचारलंस, की तुमचा बॉस ऑफिसमध्ये कसा वागतो तर ‘बॉस खूप खडूस आहे, आमच्या अडचणी समजून घेत नाही, उगाचच चिडचिड करतो,’ असंच उत्तर तुला मिळेल, मग त्यांच्या वागणुकीला शिक्का लावणं चुकीचं आहे का?”

हेही वाचा… स्त्रीबद्दल असभ्य शेरेबाजी करणाऱ्या नवऱ्यापासून फारकत! इटलीच्या पंतप्रधानांच्या निर्णयाची जगभर चर्चा

केतकीही त्यात सामील झाली, “आताची ‘जनरेशन झी’मधील मुलं – जी कुणाचं म्हणजे कुणाचंच ऐकत नाहीत. स्वकेंद्रित आहेत. संयम आणि तडजोड त्यांच्या गावीच नाही, मग आताची तरुण मुलं अशीच आहेत, असं मी लेबलिंग लावलं तर त्यात सत्यता आहेच ना?”

प्रत्येकजण आपला मुद्दा वनिताला पटवून देण्याचा प्रयत्न करीत होत्या. कामवाली बाई. ऐनवेळी सुट्टी घेणारच, टेलरकडे कपडे शिवायला टाकले, की तो कधीही वेळेवर देणार नाहीच. सरकारी कामं, कधीच वेळेवर होणार नाहीत. ‘सरकारी काम, सहा महिने थांब, अशी म्हणही प्रसिद्ध झाली आहे. मंत्र्यांची आश्वासनं कधीच पूर्ण होणार नाहीत, हे सगळ्यांनी गृहीत धरलंय. वनिता सर्वांचं बोलणं ऐकत होती. तिला वाटलं, “बापरे, सर्वांना शिक्के मारायची किती सवय झालीय. ही व्यक्ती ना, मग ती तशीच वागणार, हे गृहीत धरूनच या सगळ्याजणी वागतात की काय? हे सर्व यांच्या मनामध्ये एवढं रुजलं आहे की, केवळ नकारात्मक बाजूच सर्वांच्या नजरेसमोर येतेय.

वनिता आता तिची बाजू सर्वांसमोर मांडण्याचा प्रयत्न करू लागली. “काय आहे सख्यांनो, आपल्याशी सर्वांनी चांगले वागलेच पाहिजे आणि सभोवतालची सर्व परिस्थिती माझ्यासाठी चांगली असलीच पाहिजे, असं आपल्या प्रत्येकाला वाटतं असतं. मानसशास्त्राच्या दृष्टीने हे व्यक्तीचे बालिश हट्ट असतात. सर्वच माणसं आपल्याशी चांगली वागतील असं नाही,आणि सदासर्वकाळ आपल्यासाठी सभोवतालची परिस्थिती चांगली असेलच असं नाही, पण कोणत्याही परिस्थितीचा स्वीकार आपण कसा करतो हे जास्त महत्वाचं असतं. काही अनुभव नकारात्मक आल्यावर आपण त्यावर शिक्के मारतो आणि त्यामुळं स्वतःचा दृष्टीकोन न बदलता आपण त्या परिस्थितीला आणि व्यक्तीला जबाबदार धरतो.”

सागरिका आणि रुपालीला तिचं बोलणं झेपलंच नाही, “वनिता, तू मानसशास्त्राची अभ्यासक आहेस, त्यातील तुला सगळं समजतं, पण आम्हांला समजेल अशा भाषेत सांग.”

“ठीक आहे सांगते, तुम्ही म्हणता, ‘सासू’ अशीच असते किंवा ‘नवरा’ असाच असतो, बॉस खडूसच असतो, आताची तरुण पिढीचं अशी आहे, पण खरंच १०० टक्के तसं असतं का? कितीतरी घरात सासू सुनेची चांगली मैत्री असते, सासूच्या मदतीनं सून आपलं कुटुंब आणि करिअर दोन्ही सांभाळू शकते. अशी कितीतरी उदाहरणं आहेत, की पत्नीच्या यशामागे पतीचा मोलाचा वाटा आहे, सावित्रीबाई फुले, आनंदी-गोपाळ जोशी. आताच्या काळातले अभय आणि राणी बंग, प्रकाश आणि मंदा आमटे यामध्ये पत्नीला साथ देणारे, तिच्या योगदानाचं कौतुक करणारे कितीतरी आहेत. ऑफिसमध्ये टीमवर्कला महत्व देऊन व्यवसाय वाढवणारे, कर्मचाऱ्यांच्या योगदानाचं महत्व लक्षात घेऊन त्यांचं कौतुक करणारे बॉसही आहेत. आजच्या तरुण पिढीत बुद्धिबळ, क्रिकेट, फुटबॉल इत्यादी खेळात विक्रम करणारे तरुण आहेत तसंच विज्ञानामध्ये नवीन संशोधन करणारे आणि जागतिक विक्रम करणारे तरुण संशोधकही आहेत. मग आजची पिढी अशीच, असं सरसकट म्हणणं योग्य आहे का?”

हेही वाचा… गच्चीवरची बाग: इथे विहरती फुलपाखरे

वनिताचं म्हणणं सर्वांना पटतं होतं, पण श्यामलनं विचारलं, “अगं, पण आम्हांला वारंवार येणाऱ्या अनुभवाचं काय?”

“ श्यामल, आपण शिक्के मारून ठेवले आहेत म्हणून आपण त्या व्यक्तींकडे आणि त्या परिस्थितींकडे त्याच दृष्टीकोनातून बघतो आणि आपल्याला सगळं तसंच दिसतं. शिक्के मारणं थांबवा आणि तुमचा दृष्टीकोन बदला, मग बघा, तुम्हांला येणारे अनुभव वेगळे असतील.”

चर्चा चांगलीच रंगली होती. प्रत्येकीनं आपल्या शंका -कुशंका वनिताला विचारून आपलं समाधान करून घेतलं. प्रत्येक भेटीत काहीतरी नवीन विचार सोबत घेऊन जायचा, असं ठरलेलचं होतं. आज सर्वांनी वनीताच्या बोलण्यावर विचार केला आणि ठरवलं, “एखाद्या व्यक्तीचं वागणं आवडलं नाही, असं आपण म्हणू शकतो, पण सरसकट लेबलिंग लावण्याची सवयं बदलायलाच हवी.”

(लेखिका कुटुंब न्यायालयात समुपदेशक आहेत.)

(smitajoshi606@gmail.com)

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Never judge and label anyone in a negative way dvr
First published on: 23-10-2023 at 16:05 IST