या सगळ्या रानफुलांमधे अजून एक नाजूक फूल आढळलं ते डेझीचं. डेझी तशी आपल्याकडेही फुलते. गणपतीनंतरच्या सरत्या पावसात डेझी, तीळ म्हणजे कॉसमॉसची फुलं, अस्टर आणि सिलोसिया म्हणजे स्थानिक भाषेत ज्याला कोंबडा म्हणतात ती सगळी मंडळी आपल्या डोंगरकड्यांवर मुबलक आढळतात.
इथेही पांढरी डेझी सगळीकडे फुलली होती. डेझीच्या जोडीला कॉसमॉस सारखीच दिसणारी, पण कॉसमॉस नसलेली अशी सुरेख निळी फुलं होती. ज्याचं नाव आहे कॅम्पेन्युला रेनेरी. हीची निळी नाजूक, बेलसारखी दिसणारी फुलं अतिशय मोहक होती.
मागच्या महिन्यात युरोपमध्ये होते. तिथल्या वसंत ऋतूचं सौंदर्य अनुभवताना आपोआप भारतातल्या वानस मित्रांची आठवण येत होती. स्वित्झर्लंडमधील ते सुंदर कडे, हिरवीगार कुरणे त्यात फुललेली नाजूक फुलं, वाऱ्यावर डोलणारं हिरवगार, पोपटी झाक असलेलं गवत, नदीच्या किनारी फुललेली रानफुलं.
सगळं कसं अगदी फोटोंमध्ये, हिंदी गाण्यांमध्ये पाहिलेलं, म्हटलं तर परिचित म्हटलं तर अपरिचित असं.
झ्युरीच ते झरमॅट असा प्रवास करत असताना आरामदायी अशा स्वीस ट्रेनच्या भल्यामोठ्या खिडक्यांमधून बाहेर पसरलेला अप्रतिम निसर्ग, खळाळणारे नदी प्रवाह, पांढरट झाक असलेले डोंगर, नीळसर हिरवे स्वच्छ, प्रवाही पाणी आणि नदीच्या दोन्ही काठाला पसरलेली अफाट फुलं पाहताना भान हरपत होतं. मला जमेल तसे मी फोटो काढत होते. हेतू हा की, त्या फुलांची ओळख पटावी.
हे राजवैभव नक्की कोणत्या कुळातले आहे, त्या वनस्पतींचा नेमका उपयोग काय, औषधी गुण कोणते असं सगळं मला समजून घ्यायचं होतं. ग्लेशियर ट्रेनच्या प्रवासात असताना तिथल्या निरनिराळ्या ठिकाणच्या वनस्पती व संस्कृती यांची ऑडिओ गाईडडकडून सतत माहिती मिळत होती. त्या माहितीच्या अनुषंगाने बाहेरील निसर्ग जाणून घेत होते.
सगळ्याच वनस्पती मला एकाच वेळी दिसणं शक्यच नव्हतं, कारण वेगवेगळ्या हंगामात त्या उगवणाऱ्या होत्या. परंतु जेवढं शक्य होतं तेवढं अवलोकन करत होते. मे-जून या महिन्यात मी तिथे असल्यामुळे आणि हे वसंताचा बहर असलेले महिने असल्याने जिकडे तिकडे फुलेच फुले होती. रानफुलांनी परिसर नुसता सजला होता. यात लांब दांडा असलेली, नाजूक छत्रीच्या आकाराची सुंदर पांढरी फुलं होती. नदीच्या कडेला मोकळ्या माळरानावर ती हारीने फुलली होती.

ही वनस्पती होती काऊ पार्सेली. लेससारख्या म्हणजे पांढऱ्या झालरी सारख्या दिसणाऱ्या या फुलांचे एक नाव. ॲनाज् लेस असं ही आहे. छत्रीसारखे पसरट फुलांचे गुच्छ असलेली ही वनस्पती युरोपमध्ये जवळपास प्रत्येक ठिकाणी दिसत होती. या काऊ पार्सेलीचा उपयोग सूप, सलाड यामध्ये सजावटीसाठी केला जातोच, पण पदार्थांना एक विशिष्ट फ्लेवर देण्यासाठीही होतो. याची नाजूक फर्नसारखी दिसणारी पानं आणि दांडे हे खाण्यासाठी उपयोगात आणतात.
निसर्ग प्रत्येक ऋतूत फुलणाऱ्या फुलापानांच्या सोबतीने प्राणी जगताची ही काळजी घेत असतो. आपल्याकडे दिवाळीच्या सुमारास पीक कापणी होते त्यावेळी शेतात एक विशिष्ट वनस्पती उगवते जीची पानं चुरडून छोट्या मोठ्या जखमांवर चोळतात. एखाद्या अँटीसेप्टिक क्रीमसारखी ही वनस्पती काम करते. शेतकरी आणि कामकरी वर्गाला तिची नेमकी ओळख असते.

या काऊ पार्सेलीचा उपयोग नेमका असाच होतो. हिच्यातही जखमा, व्रण भरून काढण्याचा गुण आहे. या दिवसांत ही माळावर, गवतात, कड्यांवर अगदी सगळीकडे पसरलेली असते. युरोपातले हे उन्हाळ्याचे महिने म्हणजे भटकंती करणाऱ्यांसाठी पर्वणी. छोटेमोठे ट्रेक, सायकलच्या सफरी, छोट्या मोठ्या सहली यांसाठी इथले लोक जंगलांची, दर्या खोऱ्यांची वाट धरतात. त्यावेळी लागलं खरचटलं तर ही काऊ पार्सेली त्यांच्यासाठी मुबलक प्रमाणात उपलब्ध असते.
या सगळ्या रानफुलांमधे अजून एक नाजूक फूल आढळलं ते डेझीचं. डेझी तशी आपल्याकडेही फुलते. गणपतीनंतरच्या सरत्या पावसात डेझी, तीळ म्हणजे कॉसमॉसची फुलं, अस्टर आणि सिलोसिया म्हणजे स्थानिक भाषेत ज्याला कोंबडा म्हणतात ती सगळी मंडळी आपल्या डोंगरकड्यांवर मुबलक आढळतात.

इथेही पांढरी डेझी सगळीकडे फुलली होती. डेझीच्या जोडीला कॉसमॉस सारखीच दिसणारी, पण कॉसमॉस नसलेली अशी सुरेख निळी फुलं होती. ज्याचं नाव आहे कॅम्पेन्युला रेनेरी. हीची निळी नाजूक, बेलसारखी दिसणारी फुलं अतिशय मोहक होती. स्विस आणि इटालियन आल्प्समध्ये आढळणारी ही वनस्पती कॅम्पेन्युला कुळातली आहे. हिच्या इतर प्रजाती जरी औषधी उपयोगासाठी प्रसिद्ध असल्या तरी ही रेनेरी मात्र फक्त शोभेसाठी जोपासली जाते. वसंतात माळरानांवर शेकेडोंनी उमलवणारी ही नखरेल प्रजाती एरवी मात्र निगुतीने घरच्या बागांमध्ये, गॅलरीमध्ये वाढवली जाते. पिवळ्या रंगाची अजून एक वनस्पती मला सगळीकडे आढळली ती होती रानुनकुलस. हिला बटरकप असंही एक नाव आहे. यांच्या जोडीला रेड क्लोवरची झुपकेदार फुलं सगळीकडे उगवली होती. युरोपमधील स्थानिक प्रजाती असलेली क्लोवर औषधी गुणांनीही संपन्न असलेली वनस्पती. स्विसमध्ये. ऑस्ट्रियामध्ये फिरताना दिसणारी ही फुलं आणि त्यांच्या जाती मी माहिती करून घेत होते. हिंदी चित्रपट आणि त्यातील गाण्यांमधून युरोप आपण पाहिलेला असतो. पिवळ्या, निळ्या, गुलाबी फुलांनी सजलेले माळ आणि त्या पार्श्वभूमीवर गाणी गात नाचणारे, बागडणारे नायक-नायिका पाहिलेले असतात. ते माळ, ते डोंगर फुललेले असतात ते वर उल्लेखिलेल्या रानफुलांनी. हे तिथलं वसंत वैभव असतं.
तिथल्या फुलांचा असा शोध घेताना फुलांच्या सौंदर्यात हरवून गेले आणि नकळत एक गोष्ट मनाशी पक्की ठरवून टाकली, ती म्हणजे पुढच्या वर्षी फक्त ट्युलिपसाठी इथे न येता नारसेसिस, डेफोडील यांच्या साथीने उमलणारी ही शेकडो रानफुलं बघायला नक्की यायचं. त्यासाठी आखले जाणारे फ्लावर ट्रेलसुद्धा करायचे.
mythreye.kjkelkar@gmail.com