वसंतागमनाचे दिवस सरून वैशाखाच्या धगीकडे निघालेल्या सृष्टीला या फुलांच्या बहराची शीतलता वेढून असते. भर दुपारी वर आग ओकणारा सूर्य, घामघाम झाल्यामुळे होणारी चिडचिड, चारी बाजूने वेढणाऱ्या गरम झळा, पण तरीही महत्त्वाच्या कामासाठी पोहोचण्यासाठीची आपली लगबग असताना हलकेच एखादा नील मोहर, एखादा जवळून आपल्याला साद घालतो. गगनजाईचं एखादं सुगंधी फूल आपल्या पुढ्यात येऊन पडतं. क्षणभर मन सुखावतं. झाडाने घातलेली ती साद असते. रणरणत्या उन्हात सावलीत येण्याविषयीचं ते आमंत्रण असतं.
मागच्या आठवड्यात एका प्रदर्शनाला गेले होते. वेगवेगळ्या स्टॉलनी तो परिसर अगदी फुलून गेला होता. प्रदर्शनात असतो तसा भरपूर उत्साह आजूबाजूला ओसंडून वाहत होता. खरेदीची लगबग दिसून येत होती. तिथेच एका स्टॉलवर पेंटिंग केलेले वेगवेगळे ड्रेस, साड्या आणि इतर बऱ्याच गोष्टी अतिशय कलात्मकतेने मांडल्या होत्या. सहाजिकच माझ्या आंतरिक निसर्ग ओढीने माझे पाय तिकडे वळले. चाफा, जाई, जुई, लिली, डेझी अशी अनेक प्रकारची आणि अनेक रंगांची फुलं चितारलेली होती. फुलांचे बारीकातले बारीक डिटेल्स पेंटिंगमध्ये उतरविण्याचा प्रयत्न केला होता. ती फुलं साकारणाऱ्या कलाकाराचं तर कौतुक वाटतं होतं, पण त्याबरोबरच त्यातील रंगाचं आणि पानांचं सौंदर्यही प्रतीत होतं होतं. सृष्टीकर्त्याची मूळ निर्मिती किती अफाट आहे त्याचा इवलासा नमुनाच जणू.
बहाव्याची सुरेख फुलं रेखलेलं कापड मी हातात धरलं आणि बघतच राहिले. बहावा हा वसंतागमनाला फुलणारा अत्यंत देखणा वृक्ष. खाली ओघळणारे फुलांचे पिवळे गुच्छ मिरवणारा बहावा बघणे हेच एक सुख आहे. पूर्ण वर्षभर आपल्या अस्तित्वाची मुळीच जाणीव न करून देणारा बहावा वसंतागमनाला असा उत्फुल्लपणे फुलतो. फुलांचे घोसच्या घोस मिरवत राहतो. आपल्याकडे पाडव्याला झेंडूची फुलं, आंब्याचे डहाळे आणि कडुनिंबाची पानं ही हवीतच, तसेच मल्याळी लोकांच्या नववर्षाचा या बहाव्याच्या डहाळ्या हव्यातच.
नववर्षाच्या आदल्या रात्रीपासूनच या फुलांची सजावट करत देवघर सजवण्याची खरी तर यांची प्रथा. हेतू हा की सकाळी उठल्यावर डोळ्पयासमोर पहिलं दृश्य हे फुलांच्या सजावटीत बसलेल्या देवाचं असलं पाहिजे. याला विशुक्कनी म्हणतात. आपण गुढीला झेंडूची फुलं आणि कडुलिंबाचे डहाळे बांधतो. मल्याळी लोक विशूच्या पुजेत बहाव्याच्या फुलांना मान देतात. या दिवसांत बहरणारा मोगरा ति्रूपतीच्या बालाजीच्या सजावटीत अढळ स्थान प्राप्त करतो. सरत्या वसंतात फुलणारा ताम्हण हा असाच एक देखणा वृक्ष. आत्यंतिक मनोहारी जांभळ्या रंगाची फुलं ल्यालेला ताम्हण जेव्हा फुलाफुली फुलून आलेला असतो तेव्हा तो बघताना उन्हाचा कडाका विसरायलाच होतं.
ताम्हण आपलं राज्यपुष्प. त्याचं सौंदर्य ही अगदी त्याचं तोडीचं आहे. ताम्हणाच्या जोडीला सर्वत्र एक पिवळ्या नाजूक फुलांचा सडा घालणारा वृक्ष दिसतो तो म्हणजे ताम्र वृक्ष याची फुलं जरी पिवळी असली तरी याच्या कळ्या गर्द ताम्र रंगी म्हणजे copper colour च्या असतात. त्यामुळे कदाचित याला ताम्र वृक्ष म्हणत असावेत. कळ्यांनी फुललेला वृक्ष आणि पुढे फुलांचा बहर ओसरल्यावर शेंगांनी बहरलेला वृक्ष तांब्याच्या रंगात अगदी माखून गेल्यासारखा दिसतो. आमच्या गच्चीवर हा पेल्टोफोरम एका बाजूला अगदी झुकलेल्या स्थितीत होता. उन्हाळ्यातं तो पूर्ण फुलून जायचा. मुद्दाम कुणीतरी सजावट केलेली असावी तशी गच्चीची एक बाजू पूर्ण पिवळी धमक होऊन जायची. फुलं असे पर्यंत यांच्या भोवती विविध किटक आणि माशांचा गराडा असे, पण जशी फळं धरायला लागत तसे पोपटाचे थवे फांदी फांदीवर कलकलाट करताना दिसतं. ताम्रवृक्षाच्या शेंगा हे त्यांचं आवडीचं खाद्य. सोनचाफा, मधुमालती यांचा दिमाखदार बहर उन्हाळ्यात पहायला मिळतोच, पण आकाशनींब किंवा आपलं बुचाच झाडही याच दिवसात फुलतं. उंच डेरेदार बुचाच्या झाडाखाली लांब दांड्याच्या फुलांचा गालीचाच पसरलेला असतो. पायतळी पसरलेल्या फुलांचा मंद गोड सुगंध आणि वर दाट हिरव्या पालवीने बहरलेला भला थोरला वृक्ष. ऐन उन्हाळ्यात या वृक्षाखाली उभं राहिल्यावर एक वेगळीच संवेदना जाणवते. वडीलधाऱ्या माणसाच्या भक्कम आधाराखाली असल्यासारखं किंवा मग घराच्या आश्वासक उबेची जी जाणीव आपल्या खोल मनात असते ती किंवा तसंच काही मला या गगनजाई खाली उभं राहिल्यावर जाणवतं.
नील मोहर, गुलमोहर, काटेसावर, पर्जन्यवृक्ष अशा अजूनही बऱ्याच वृक्षांचा बहर आपण उन्हाळ्याच्या या धगधगत्या दिवसांत अनुभवू शकतो. वसंतागमनाचे दिवस सरून वैशाखाच्या धगीकडे निघालेल्या सृष्टीला या फुलांच्या बहराची शीतलता वेढून असते. भर दुपारी वर आग ओकणारा सूर्य, घामघाम झाल्यामुळे होणारी चिडचिड, चारी बाजूने वेढणाऱ्या गरम झळा, पण तरीही महत्त्वाच्या कामासाठी पोहोचण्यासाठीची आपली लगबग असताना हलकेच एखादा नील मोहर, एखादा जवळून आपल्याला साद घालतो. गगनजाईचं एखादं सुगंधी फूल आपल्या पुढ्यात येऊन पडतं. क्षणभर मन सुखावतं. झाडाने घातलेली ती साद असते. रणरणत्या उन्हात सावलीत येण्याविषयीचं ते आमंत्रण असतं.
अशावेळी निसर्गाच्या कनवाळू हाकेला आपसूकच प्रतिसाद दिला जातो.
mythreye.kjkelkar@gmail.com