पोलीस विभागाच्या मानवी तस्करी विभागात अशा एक ना अनेक मुली आहेत… पालकांच्या तक्रारीवरून शोध घेतलेल्या तर काही कारवाईत सापडलेल्या… प्रत्येकीची व्यथा वेगळी… काहींना घरी जायचे तर पालक न्यायला तयार नाहीत. पालक मुलींना घरी न्यायला तयार तर गतकाळाची सावली पाठ सोडायला तयार नाही अशी परिस्थती…

पोलीस विभागाच्या मानवी तस्करी विभागात डोकावलं की तिथे बसलेले हताश चेहरे न बोलताही खूप काही सांगून जातात. भावना त्यातील एक… वडील लहानपणीच वारले. आई आरोग्य विभागात कामाला… सरकारी नोकरी असल्याने कधीही कामाला जावं लागे, आदिवासी पाडे, दुर्गम भाग. मुलांना हा त्रास नको म्हणून शहरात घर घेऊन मुलींना आईजवळ ठेवलं. अनुभवाने आणि वयाने मोठ्या असलेल्या आजीची मुलींवर बारीक नजर होती. आई कामावरून आली की मुली कशा चुकल्या याचा पाढा वाचला जायचा. घरात भांडणं-वादावादी… या कटकटीतून मोकळीक हवी होती. आईसाठी अभ्यास महत्त्वाचा होता तर भावनासाठी गाणं… आजीच्या लेखी ही थेरं होती. भावनाच्या मनातील खुमखुमी तिच्या वाढत्या वयासोबत वाढत गेली. विरोधाला विरोध वाढत असताना भावनाला शिक्षणासाठी बाहेर पाठवण्यात आलं. तिलाही या वातावरणातून मोकळीक हवी होती. आईने ज्या ठिकाणी शिक्षणासाठी पाठवलं त्या गावातल्या एका इसमाच्या ओळखीतून एक रिक्षावाला तिला कॉलेजला ने आण करीत असे. या रिक्षावाल्याची सुरुवातीच्या जुजबी गप्पा प्रेमात रुपांतरीत झाल्या. त्याने भावनाची आर्थिक स्थिती पाहता तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं… प्रेम, शारीरिक आकर्षण अशा एक एक पायऱ्या चढत असताना त्यांचे संबध पुढपर्यंत गेले. भावनाच्या घरच्यांना याची कुणकुण लागली. तो तिला प्रेमाच्या आणाभाका देत राहिला… घरच्यांनी तिला खूप समजावलं… आई रडली… चिडली. पण मुलीच्या हट्टापुढे झुकावं की तिला यातून बाहेर काढावं या द्विधा मनस्थितीत असताना भावना मात्र कोणालाही न सांगता घरातून पळून गेली. ती कुठे गेली हे माहिती असल्याने रितसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली… पण या दिवसांतच भावनाला त्याची खरी ओळख तिला पटली. त्याला असलेली व्यसने, त्याचे मैत्रीच्या नावे दुसऱ्या मुलींशी असणारे संबंध… याचा उलगडा होत गेला. आपण खूप मोठी चूक केली आहे याची जाणीव तिला झाली. एके दिवशी पोलीस आले आणि भावनाला आणि तिच्या सो कोल्ड प्रियकराला ताब्यात घेतले… पोलीसांनी आज तिला आई समोर हजर केले… आई मात्र शून्यात हरवलेली. हिला घरी नेलं तर दुसऱ्या मुलीचं काय? हिला स्विकारलं नाही तर हिचं काय या विवंचनेत ती होती.

साधनाची गोष्ट वेगळी… घरात मोकळं वातावरण… मित्र-मैत्रीणींचा वावर घरात पहिल्या पासून… स्त्री-पुरूष समानता-वाद याची पुसटशी ओळखही नाही. मनाला येईल तसं वागणं. ते घरच्यांना खटकल तर समज देऊन सोडून देणं… अशा वातावरणात ती वाढली. दहावी चांगल्या मार्कांनी पास झाली म्हणून वडिलांनी तिला हव्या त्या कंपनीचा मोबाईल घेऊन दिला. या मोबाईलने ती आभासी विश्वात गढून गेली. सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप मित्र-मैत्रिणी मिळवले. यांपैकी एक आकाश… सुुवातीच्या चॅटिंगचे प्रेमात रुपांतरत झाले. एकमेकांचे फोटो शेअर केल्यानंतर व्हिडिओ कॉल… नको त्या अवस्थेत पाहायाचे ही त्याची इच्छा. प्रेमाखातर तिने तसे फोटो… व्हिडिओ पाठवले… त्या फोटोंचा त्याने गैरफायदा घेत तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. पैसे देता येत नाही म्हणून तिची बोली लागली… तिला एका ठिकाणी बोलावलं. नेमकं त्या ठिकाणी धाड पडली आणि ही पोलीसांना सापडली. पोलीसांनी खोदून खोदून विचारल्यावर तिने केवळ वडिलांचे नाव सांगितलं. काहीशा तुटक माहितीवर तिच्या वडिलांशी संपर्क झाला. टेबलाच्या समोर समुपदेशक वडिलांशी चर्चा करत आहेत. तिला घेऊन जा… एक संधी तिला द्या… वडिलांचं एकच म्हणणं, हिला वाढवण्यात काय चुकलं?

मानवी तस्करी विभागात अशा एक ना अनेक मुली आहेत… पालकांच्या तक्रारीवरून शोध घेतलेल्या ती काही कारवाईत सापडलेल्या… प्रत्येकीची व्यथा वेगळी… काहींना घरी जायचे तर पालक न्यायला तयार नाही. पालक मुलींना घरी न्यायला तयार तर गतकाळाची सावली पाठ सोडायला तयार नाही. या परिस्थितीला जबाबदार कोण?