“अंजली, मला राधिकाची खूप काळजी वाटते गं, ती माझं काहीच ऐकत नाही, कसं होणार हिचं पुढं?”
“एवढी का काळजी करतेस रेवती, या वयातील सर्वच मुलं अशी वागतात. त्यांना त्यांच्या मर्जीने वागायचं असतं, पालकांनी सांगितलेलं ते ऐकतातच असं नाही.”

“तरुणाईला ‘माय चॉईस’ आवडत असतो, हे ठीक आहे, आपणही त्या वयात तसं वागलेलो असू,पण अंजली माझी काळजी वेगळीच आहे गं, माझी राधिका ही मुलीसारखी वागतच नाही. मुलींमध्ये जो हळवेपणा, नाजूकपणा असतो तो तिच्याकडे नाहीच. ती कपडेही मुलांसारखेच घालते. हल्ली सर्वच मुली जीन्स आणि टॉप-टी शर्ट वापरतात,पण मुलींचे कपडे वेगळे असतात, ती सर्वच कपडे मुलग्यांसारखे वापरते, हेअरकटही मुलग्यांसारखा ठेवते. सलवार कमीज, साडी हे तर तिच्या शब्दकोषातही नाहीत. तिचं कोणतंही वागणं मुलींसारखं नाहीच. मागच्याच महिन्यात तिनं २५ वर्ष पूर्ण केली. आता तिच्या लग्नाचं बघावं लागेल. तिचं असं पुरुषी वागणं असेल तर तिला कोण पसंत करणार?आणि लग्न झाल्यावरही ही अशीच वागली तर तिचं वागणं कोण सहन करणार? तिनं रांगडेपणाने न राहता मुलींसारखं नाजूक राहावं, घरात, स्वयंपाकातही लक्ष पुरवावं, रोज नाही, पण सण समारंभाला तरी मुलींसारखे कपडे घालावेत असं मला वाटतं. तिच्यात बदल घडवून आणण्यासाठी मी काय करू ते मला सांग.”

आणखी वाचा-हे आत्मभान कधी येईल?

अंजली रेवतीचं बोलणं ऐकत होती. ती आज राधिकाच्या तक्रारी करीत असली तरी काही वर्षांपूर्वी ती राधिकाच्या याचं गुणांचं कौतुक करायची. ‘तो माझा बंड्या आहे,’ असं म्हणायची. तिला कराटे, स्विमिंग,ड्रायव्हिंग इत्यादी सर्व गोष्टी क्लास लावून शिकवल्या. तिनं कोणत्याही गोष्टी कशा डॅशिंगपणे कराव्यात हे तिला सतत सांगत आली. ती तशीच घडत गेली आणि आता मात्र राधिकामध्ये बदल व्हायला हवा असं रेवतीला वाटतंय.

रेवतीचं लग्न झालं तेव्हाच आपल्याला एकच मूल असावं असं तिनं आणि धीरजनं ठरवलं होतं. लग्नानंतर ४ वर्षांनी तिला दिवस गेले. आई वडील, सासू सासरे सगळ्यांनी तिचं खूप कोडकौतुक केलं. बागेतील, नावेतील, चांदण्यातील, अशी सर्व डोहळाजेवणं केली. प्रत्येक डोहळ जेवणात पेढे,की बर्फी, करंजी की लाडू, जिलेबी की गुलाबजाम याचा शोध घेताना प्रत्येकवेळी ‘मुलगाच होणार’ हेच शब्द तिनं ऐकले होते. सासूबाईंनी बालकृष्णाचा सुंदर फोटो तिच्या बेडरूम मध्ये लावला होता. ‘घराण्याचा कुलदीपक जन्माला येणार’ असे त्या सर्वांना सांगत होत्या. ‘सर्व लक्षणं मुलाचीच दिसत आहेत, मुलगाच होणार बघ तुला,’ असं आई म्हणायची. रेवतीनं बाळाचं नाव काय ठेवायचं हे ठरवतानाही सर्व मुलांची नावं ठरवली होती. ‘आपल्याला मुलगाच होणार’ याची तिला खात्री झाली होती. आपण जो विचार करतो तसंच आपल्या बाबतीत घडतं यावरही तिचा विश्वास होता. परंतु कृष्ण नाही तर राधिका जन्माला आली. जेव्हा बाळ आणून तिच्या हातात ठेवलं गेलं तेव्हा ती बाळ हातात घ्यायलाही तयार नव्हती. ‘हे बाळ माझं नाही’ असंच ती म्हणू लागली. बाळाला दूध पाजायलाही ती तयार नव्हती. ती पूर्णपणे नैराश्यात गेली. त्यासाठी तिला वेगळे उपचार द्यावे लागले, त्यातून ती सावरली. रेवतीला स्वतःची इच्छा पूर्ण करायची होती म्हणून तिनं राधिकाला मुलांसारखं वाढवलं होतं. तिच्यासाठी ती कायम ‘माझा बंड्या’ होती. अशा सर्व वातावरणात वाढलेली राधिका मुलासारखीच वागणार होती. आता वयात आल्यावर तिनं ‘मुलींसारखं’ वागावं असं रेवतीला वाटायला लागलं होतं.

आणखी वाचा-स्वप्न जगणारी ‘बाईक गर्ल’ झेनिथ इरफान

रेवतीचं बोलणं पूर्ण ऐकल्यावर अंजली शांतपणे म्हणाली. “रेवती, लहानपणापासून राधिकाला वाढवताना तू मुलासारखं वाढवलंस, मग आता ती कशी बदलेल?”
“तू तिला ‘मला मुलगा हवा होता’, हे कधी बोलून दाखवलं नाहीस, परंतु तू जी आहेस त्यापेक्षा तू वेगळी आहेस हा आदेश तिच्या अबोध मनात जमा झाला. पालकांच्या निशब्द कृतीत काय आहे हे लहानपणीच मुलं उचलतात त्यामुळं जे आपण आहोत त्यापेक्षा वेगळं वागायचं ही कमांड घेतात आणि तशीच वागू लागतात. राधिकानं लहानपणी मुलगी म्हणून तिच्या नैसर्गिक भावनांचं दमन केलं आहे आणि मुलासारखं वागणं चालू केलं, आता पुन्हा तिला ‘ती कोण आहे?’ याची ओळख करून द्यावी लागणार आहे. त्यात निश्चित वेळ जाईल, पण प्रयत्नपूर्वक बदल घडवणं आणि संयम ठेवणं गरजेचं आहे. हे अवघड आहे, पण अशक्य नाही.”

अंजलीनं बऱ्याच गोष्टी रेवतीला समजावून सांगितल्या आणि रेवतीनं चिडचिड न करता राधिकामध्ये बदल घडेपर्यंत संयम ठेवण्याचं ठरवलं.

(लेखिका कौटुंबिक न्यायालयात समुपदेशक आहेत.)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(smitajoshi606@gmail.com)