पुरुषांचे वर्चस्व असलेल्या व्यवसायात जेव्हा एखादी महिला समाजातील पारंपरिक चौकट मोडण्याचे धाडस करते, तेव्हा ती समाजातील असंख्य महिलांसाठी प्रेरणादायी ठरते. तिच्या कर्तबगारीचे धडे पुढच्या पिढीला धैर्य देऊन समाजासमोर एक नवीन आदर्श निर्माण करते. कुठलेही क्षेत्र हे जिद्द, कौशल्य, अथक परिश्रम यावर अवलंबून असते. याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे नागपूरच्या प्रीती हिंगे.
प्रीती हिंगे यांचा जन्म नागपूरच्या वाठोडामधील सर्वसामान्य कुटुंबातील. घरची परिस्थितीदेखील तशी बेताचीच होती. पण आज त्यांच्या जिद्दीमुळे, कौशल्यामुळे त्या सर्वत्र सुतार दीदी (कारपेंटर दीदी) म्हणून प्रसिद्धीस आल्या आहेत. प्रीती यांनी त्यांनी पुरुषांची मक्तेदारी असलेले सुतारकाम हे क्षेत्र निवडले आणि आज त्या एक यशस्वी उद्योजिका म्हणून नावारुपास आल्या आहेत. प्रीती यांचे वडीलदेखील सुतारकाम करायचे. त्यामुळे लहानपणपासूनच त्यांना लाकडाचा गंध, सुतारकामाची ओढ लागली होती. शाळेत शिक्षण घेत असतानाच त्या वडिलांना त्यांच्या सुतारकामात मदत करू लागल्या. तिथेच मदत करता करता त्यांनी वडिलांकडून सुतारकामातील बारकावे शिकून घेतले. वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी स्वत: एकटीने लाकडी कपाट बनवले आणि ते लगेच विकले गेले. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला. इथूनच त्यांच्यातील उद्योजक प्रवासाला सुरुवात झाली. पण नंतर काही वर्षांतच त्यांचे लग्न झाले. नवऱ्याकडची परिस्थितीदेखील वडिलांसारखी बेताचीच. त्यांचे पती ड्रायव्हरचे काम करत. एक मूल झाल्यावर त्याचे पालणपोषण करताना तटपुंज्या पगारामुळे घरखर्च, मुलाचे औषधपाणी भागवणे कठीण होऊ लागले. म्हणून मोठ्या धाडसाने पतीला आपल्या मनातील विचार बोलून दाखवला. त्यांनीदेखील कोणतेही आढेवेढे न घेता किंवा पुरुषी अहंकार न दाखवता पत्नीला साथ दिली.
उद्योग सुरू करायचे म्हटले तर भांडवल, सामान तर घेणे गरजेचे होते. त्यासाठी त्यांनी पोटाला चिमटा काढून साठवलेल्या पैशांतून ८००० रुपये प्रति महिना असा एक छोटा दुकानाचा गाळा भाड्याने घेतला व उतरेल्या पैशांतून सुतारकामासाठी लागणारे सामान घेतले. त्या दुकानाचे नाव ठेवले ‘जय श्री गणेश फर्निचर मार्ट’. सुरुवातीला पाहिजे तितका प्रतिसाद नव्हता. कारण लोकांच्या मनात शंका यायची की ही तर बाई आहे, सुतारकाम हे पुरुषजातीचं काम आहे हिला काय जमणार? त्यामुळे लोक काम देण्यास टाळत असत. पण ज्या काही छोट्या छोट्या ऑर्डर मिळू लागल्या होत्या त्या प्रीती यांनी सफाईदारपणे पूर्ण केल्या. हळूहळू त्यांच्या कामातील सफाई, अत्यंत बारकाईने केलेले कोरीव काम, कलात्मक दृष्टीकोन यामुळे ग्राहकांना त्यांचे काम आवडू लागले. त्यांच्या फर्निचर बनवण्याच्या पद्धीतून दर्जा, टिकाऊपणा, सौंदर्य या गोष्टी ठळकपणे दिसू लागल्या होत्या. ग्राहकांचा विश्वास बसल्याने त्यांना ऑर्डरवर ऑर्डर मिळू लागल्या व अल्पावधीतच त्या ‘सुतार दीदी’ (कारपेंटर दीदी) म्हणून नागपूरात प्रसिद्ध झाल्या. त्याच दरम्यान प्रीती यांनी भारत सरकारच्या स्किल इंडिया मिशन अंतर्गत द नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर एंटरप्रेन्योरशिप अँड स्मॉल बिझनेस डेव्हलपमेंट (NIESBUD) मध्ये १५ दिवसांच्या कार्यशाळेत भाग घेतला. तिथे त्यांना त्यांच्या सुतारकामाशी संबंधित अनेक बारकावे शिकण्याची संधी मिळाली. वडिलांसोबत काम करताना ज्या गोष्टींची मला माहिती नव्हती त्या गोष्टी मला इथे शिकायला मिळाल्या. या शिबिरामुळे मला माझ्या कामात खूप फायदा झाला, असे त्या सांगतात.
प्रीती आज जरी एक यशस्वी महिला उद्योजिका असल्या तरी त्यांचा इथपर्यंचा प्रवास हा काही साधा सोपा नव्हता. लग्नाच्या आधी वडिलांबरोबर काम करताना आजूबाजूचे लोक वडिलांना टोमणे मारत असत. तरी वडिलांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि आपल्या लेकीला सुतारकाम शिकविले. लग्नानंतरही सुतारकाम व्यवसाय सुरू करताना पुन्हा तेच टोमणे त्यांना ऐकून घ्यावे लागले. हे काम बायकांच्या कुवतीचे नाही. बायकांनी आपले फक्त घराकडे लक्ष द्यावे असे टोमणे त्यांना ऐकावे लागत. पण वडील आणि नवऱ्याची पूर्ण साथ मिळाल्याने ते दोघे पाठीशी खंबीरपणे उभे असल्यामुळेच प्रीती यांनी या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केले आणि आपली वाटचाल सुरू ठेवली. जे लोक टीका करायचे, टोमणे मारायचे त्यांना प्रीती यांनी आपल्या कृतीतून उत्तर देऊन त्यांचे तोंड बंद केले आहे. फर्निचरच्या वाढत्या मागणीमुळे प्रीती यांचे स्वप्न आता फक्त दुकानापुरते मर्यादित न ठेवता त्यांना एक भव्य शोरुम सुरू करायचे आहे.
प्रीती हिंगे या केवळ उद्योजिका नाहीत तर समाजातील स्त्रियांसाठी एक प्रेरणादायी व्यक्ती आहेत. पुरुषप्रधान क्षेत्रात त्यांनी आपल्या मेहनतीने स्वत:ला सिद्ध करून दाखवले आहे. स्त्रियांसाठी कोणतेही काम छोटे वा मोठे नाही किंवा अवघड नाही. अंगात जिद्द, आत्मविश्वास असेल तर ती कोणत्याही क्षेत्रात आपले वर्चस्व निर्माण करू शकते.
rohit.patil@expressindia.com