ॲड. तन्मय केतकर

या प्रकरणात लग्नानंतर पत्नीचे चार गर्भपात झाले आणि चौथ्या गर्भपाताच्या वेळेस कर्करोगाची शक्यता निर्माण झाल्याने तपासणी करण्यात आली आणि कर्करोग झाल्याचे निष्पन्न झाले. त्याच कर्करोगामुळे पत्नीचे गर्भाशय काढून टाकावे लागले. लग्नाअधीच पत्नीला कर्करोग होता तो लपविल्याच्या आणि क्रुरतेच्या कारणास्त्व पतीने घटस्फोट मागणारी याचिका दाखल केली. पत्नीला अगोदरच कर्करोग असल्याचा कोणताही पुरावा नसल्याच्या कारणास्तव कौटुंबीक न्यायालयाने याचिका फेटाळली आणि पुढे मद्रास उच्च न्यायालयानेही कर्करोगामुळे गर्भाशय काढून टाकल्यास ती पतीप्रती क्रुरता नाही असा निर्णय दिला.

हेही वाचा >>> IIM मधून एमबीएचं शिक्षण, मायक्रोसॉफ्टने दिलं रेकॉर्डब्रेक पॅकेज, जाणून घ्या अवनीचा वार्षिक पगार किती?

अपत्याला जन्म देऊन आपला वंश पुढे वाढवणे हा वैवाहिक जीवनाचा महत्त्वाचा उद्देश आहे. अपत्याला जन्म देण्याकरता पती-पत्नी दोघेही त्यादृष्टीने सक्षम आणि सुदृढ असणे गरजेचे आहे. समजा पत्नीला कर्करोग झाल्याने तिचे गर्भाशय काढून टाकावे लागले आणि तिला अपत्यप्राप्ती करणे अशक्य झाले तर ती पतीप्रती क्रुरता ठरेल का?  असा प्रश्न मद्रास उच्च न्यायालयासमोर आला होता.

या प्रकरणात उभयतांच्या लग्नानंतर पत्नीचे चार गर्भपात झाले आणि चौथ्या गर्भपाताच्या वेळेस कर्करोगाची शक्यता निर्माण झाल्याने तपासणी करण्यात आली आणि कर्करोग झाल्याचे निष्पन्न झाले. त्याच कर्करोगामुळे पत्नीचे गर्भाशय काढून टाकावे लागले. लग्नाअधीच पत्नीला कर्करोग होता तो लपविल्याच्या आणि क्रुरतेच्या कारणास्त्व पतीने घटस्फोट मागणारी याचिका दाखल केली. पत्नीला अगोदरच कर्करोग असल्याचा कोणताही पुरावा नसल्याच्या कारणास्तव कौटुंबीक न्यायालयाने याचिका फेटाळली, त्याविरोधात उच्च न्यायालयात अपील करण्यात आले.

उच्च न्यायालयाने-

१. चौथ्या गर्भपाताच्या वेळेस कर्करोगाची शंका आल्याने तपासणी केल्यावर कर्करोग असल्याचे निष्पन्न झाले.

२. अपत्यप्राप्ती शक्य नसल्याने क्रुरतेच्या कारणास्तव पतीने घटस्फोटाची मागणी केली.

३. या प्रकरणातील पुराव्याचे अवलोकन केल्यावर असे दिसून येते की, अपत्यप्राप्तीच्या मुद्द्यावर घटस्फोट घेण्याकरता नातेवाईकांनी दबाव आणल्याने पतीने घटस्फोटाची याचिका दाखल केली.

 ४. उलटतपासात उभयतांनी सरोगसी, दत्तक या पर्यायी मार्गाने अपत्यप्राप्तीच्या शक्यतांचा विचार जाहीर केलेला आहे.

 ५. सगळे पुरावे लक्षात घेता लग्नानंतर पत्नीला कर्करोग झाल्याचे स्पष्ट होते आहे.

 ६. कर्करोगाच्या उपचारादरम्यान गर्भाशय काढून टाकावे लागणे यास पत्नीला जबाबदार धरता येणार नाही.

 ७. काही विघ्नसंतोषी नातेवाईकांनी अपत्यप्राप्तीच्या मुद्द्यावरुन घटस्फोट घेण्याची कल्पना पतीच्या मनात भरवली आणि पती त्यास बळी पडला.

 ८. पतीने पत्नीच्या शस्त्रक्रियेपूर्वी ‘तू माझे अपत्य हो, मी तुझे अपत्य होतो’ असे उद्गार काढले होते, अशा सुवर्ण हृदयाच्या माणसाच्या मनात आणि विचारात नातेवाईकांनी विष कालवले आणि घटस्फोटाची मागणी करायला उद्युक्त केले.

 ९. पतीच्या घटस्फोटाची मागणी ही त्याच्या कोणत्यातरी नातेवाईकांनी कान भरल्यामुळे केल्याचे दिसून येते आहे.

 १०. मानवी जीवन नाजूक आहेच आणि मानवी मन त्यापेक्षाही नाजूक आहे आणि ते पटकन कोणाच्याही प्रभावाखाली येऊ शकते.

 ११. या सगळ्या मुद्द्यांचा विचार करता हे प्रकरण घटस्फोट मान्य करण्याजोगे नाही अशी निरीक्षणे नोंदविली आणि अपील फेटाळले.

कर्करोग हा जीवघेणा आजार आहेच, त्यातसुद्धा कर्करोगामुळे गर्भाशय गमावून अपत्यप्राप्ती अशक्य होणे हे कोणत्याही स्त्रीकरता मोठेच दु:ख. त्याच कर्करोगाचा दोष पत्नीवर लादून त्याकरता घटस्फोट मागणे हे तर अजूनच वाईट. कर्करोग होणे यात मानवी दोष नाही असे स्पष्ट करून उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली हे उत्तमच केले.

हेही वाचा >>> लहान मुलांचा ‘फिटनेस’ कसा राखावा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रकरणातील अजून एक महत्त्वाचा भाग म्हणजे विघ्नसंतोषी नातेवाईक. शस्त्रक्रियेपूर्वी ‘तू माझे अपत्य हो, मी तुझे अपत्य होतो’ असे उद्गार काढणार्‍या माणसाचे कान भरून, त्याच्या मनात विष कालवून त्याला घटस्फोट घेण्यास उद्युक्त आणि प्रवृत्त करणार्‍या नातेवाइकांची निर्भत्सना करावी तेवढी कमी आहे. पती-पत्नी उभयतांनी उभयतांबद्दल कोणताही निर्णय कोणाच्यातरी सांगण्यावरुन घेऊ नये हा विवाहाचा सुवर्ण नियम आहे आणि त्याचे पालन केले नाही तर चांगल्या माणसाचे नातेवाईकांच्या नादाने किती पतन होऊ शकते याचे हे ज्वलंत उदाहरण आहे. अशा नातेवाईकांचा पतीवरील प्रभाव प्रकरणाच्या पुराव्यात येणे आणि त्याचा सामावेश निकालात करणे हे न्यायालयाचे क्रांतिकारी पाऊलच म्हणावे लागेल. कोणाच्याही कोणत्याही नातेवाईकांनी कोणत्याही पती-पत्नीमध्ये लुडबुड करू नये आणि तसा प्रयत्न झालाच तो पता-पत्नी उभयतांनी हाणून पाडावा हाच धडा या निकालातून आपण घ्यावा.