स्त्रियांचं नोकरी करण्याचं प्रमाण वाढलं, त्यांची क्षेत्रं व्यापक झाली तसा तिच्या कामाच्या वेळांमध्येही फरक पडू लागला. त्यामुळे आता मुलींनी नाईट शिफ्ट (Night Shift For Women) करणं हे काही नवीन राहिलेलं नाही. प्रसारमाध्यमे, आयटी या क्षेत्रांमध्ये तर सर्रास नाईट शिफ्ट असते. कामाच्या बाबतीत समानता असली तरी स्त्रियांसाठी सुरक्षिततेच्या पुरेशा उपाययोजना केल्या जातात का? खरंतर महिलांच्या नाईट शिफ्टबद्दलचे सरकारी नियमही आहेत. ते पाळले जातात का, हा प्रश्न तर आहेच. काही ठिकाणी आता महिलांची सुरक्षितता लक्षात घेऊन नाईट शिफ्ट बंद करण्यात आली आहे. तरीही कामाचा अपरिहार्य भाग म्हणून अनेक मुलींना नाईट शिफ्ट करावीच लागते.
रात्री उशिरापर्यंत थांबून किंवा नाईट शिफ्टमध्ये काम करायचं असल्यासं अत्यंत सावध, जागरुक राहणं आवश्यक आहे. ड्युटी संपल्यावर रात्री उशिरा ऑफिसची गाडी नसेल तर कॅब किंवा रिक्षा करुन जावं लागतं. मुंबईसारख्या महानगरांमध्ये लोकलची सुविधा आहे. तसंच महिला डब्यांमध्ये रात्री पोलीसही असतात. पण स्टेशनपासून घरी जाताना सुरक्षिततेचा प्रश्न येतोच. तर इतर शहरांमध्ये कॅब केल्यास त्याबद्दलही सतत टेन्शन असतं. अशा परिस्थितीत घाबरण्यापेक्षा सतत अलर्ट राहणं महत्त्वाचे आहे. जर तुम्ही रात्री उशिरा कामावरून घरी परतत असाल किंवा स्टेशन, एअरपोर्ट, बसस्टँडवरून एकट्या घरी जात असाल तर काही गोष्टींची नक्की काळजी घ्या. या छोट्या टिप्स सुरक्षिततेच्या (Security Tips) दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत.
सगळे महत्त्वाचे फोन नंबर्स फोनमध्ये/ जवळ ठेवा
एरवीही महिलांनी आपल्याजवळ आपल्या घरच्यांच्या नंबर्सबरोबर काही महत्त्वाच्या हेल्पलाईन्सचेही नंबर ठेवणे गरजेचे आहे. रात्री उशिरापर्यंत काम करणाऱ्या, नाईट शिफ्ट करणाऱ्या स्त्रियांनी काही नंबर्स स्पीड डायलमध्ये आणून ठेवावेत. यामध्ये आपल्या कुटुंबियांपैकी कमीत कमी तीन जणांचे आणि ऑफिसच्या तीन सहकाऱ्यांचे नंबर्स असावेत. म्हणजे अगदी काही संकट आलंच तरी कॉन्टॅक्टमध्ये जाऊन सर्च करण्यात वेळ जाणार नाही.
काही महत्त्वाची सेफ्टीॲप्स डाऊनलोड करुन घ्या- महत्त्वाच्या सेफ्टी अॅप्स या ॲप्सबद्दल व्यवस्थित माहिती करुन घ्या. ते कसे ऑपरेट करायचे हे शिकून घ्या. संकटात सापडलातच तर तुम्ही असुरक्षित असल्याची माहिती या ॲप्सच्या माध्यमातून कळू शकते. तुम्ही एखाद्या असुरक्षित ठिकाणी असाल तर जवळच्या पोलीस स्टेशन्स, मदत केंद्रांची माहिती, नंबर्स या ॲप्समधून मिळू शकतात. याद्वारे तुम्ही मेसेज, तुम्ही असलेले ठिकाण पाठवू शकता. काही ॲप्समध्ये इमर्जन्सी नंबर्सवर फोन करण्याचीही सोय असते. तुमच्या लिस्टमध्ये असलेल्या इमर्जन्सी नंबर्सवर तुमच्या घरच्यांना संपर्क साधता येऊ शकतो.
कॅबने घरी जात असाल तर सतर्क राहा
खरंतर नाईट शिफ्ट किंवा उशिरापर्यंत काम करणाऱ्या स्त्रियांसाठी घरी जाताना गाडीची व्यवस्था करणं ही कंपनीची, व्यवस्थापनाची जबाबदारी आहे. त्यासाठी सर्व महिला कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन आवाज उठवा.पण तरीही गाडीची सोय होत नसेल तर रात्री जाताना अत्यंत जागरुक राहा.
रात्री उशिरा ऑफिसची गाडी नसल्यास हल्ली कॅब बुक केली जाते. पण कॅबमध्येही महिलांवर अत्याचाराचे प्रसंग घडले आहेत. कामामुळे थकवा येणं, झोप येणं स्वाभाविक आहे. पण कॅबमध्ये बसल्यावर झोपण्याचं टाळा. कॅबचे ड्रायव्हर आपल्या नेहमीच्या ओळखीतले नसतात. त्यामुळे प्रायव्हेट कॅब केल्यावर कोणत्या रस्त्याने चालला आहात याकडे पूर्ण लक्ष द्या. सतत फोनवर बोलू नका किंवा आपल्या खासगी गोष्टीही फोनवरून बोलू नका. कॅबमध्ये बसल्यावर चित्रपट, वेबसीरीज बघणं टाळा. अनेकदा त्यामध्ये आपण गुंतून पडतो आणि बाकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष होतं. तेव्हा सतर्क राहा.
कॅबमधून जाताना…
कॅबमधून एकट्या जाताना खासगी गोष्टी फोनवर बोलू नका पण घरच्यांच्या सतत संपर्कात राहा. तुम्ही कुठपर्यंत पोहोचला आहात, साधारण कधीपर्यंत घरी पोहोचाल याची माहिती त्यांना वेळोवेळी देत राहा. त्यांना कॅब नंबर मेसेज करुन ठेवा.
तुमच्या पर्समध्ये काही गोष्टी आवश्यक ठेवा
म्हणजे अगदीच काही संकट आलं तर स्त्रियांच्या पर्समध्ये शक्यतो सेफ्टीपिना असतातच. त्याचबरोबर नेलकटर किंवा एखादा छोटा चाकूही ठेवू शकता.लाल तिखटाची पूड किंवा काळी मिरीचा स्प्रे मिळतो तो सोबत ठेवू शकता. एखाद्यावेळेस काही संकट आलं तर या गोष्टींचा उपयोग कसा करायचा हे लक्षात ठेवा आणि घाबरून न जाता सतर्क राहून त्याचा सामना करा.
तुमच्या आसपासच्या परिस्थितीबद्दल सतत जागरुक राहा. रात्री उशिरा ऑफिसमध्ये असाल आणि तुम्हाला काही असुरक्षितता जाणवली तर तिथला वॉचमन, तुमचे सहकारी, वरिष्ठ, कुटुंबीय, मित्रमैत्रीणींना लगेचच कळवा.
ओळखपत्रे जवळ ठेवा
मुलींना, स्त्रियांना पर्सेस बदलायची सवय असते. मॅचिंगसाठी किंवा अन्य काही कारणासाठी पर्स बदलत असाल तरी त्यात काही गोष्टी मात्र अवश्य ठेवा. रात्री उशिरा जाताना काहीवेळेस सुरक्षिततेचा भाग म्हणून तुमची गाडी तपासली जाऊ शकते. अशावेळेस तुमच्याकडे सर्व ओळखपत्रे असणे आवश्यक आहे. .म्हणजे तुम्ही नाईट ड्युटी करत आहात याचा पुरावा मागितल्यास देऊ शकाल. तसेच काही संकटे आल्यास ही ओळखपत्रे दाखवून तुमच्या घरच्यांशी संपर्क साधता येऊ शकतो.
कोणती ओळखपत्रे जवळ बाळगणे आवश्यक आहेत
-कंपनीचे ओळखपत्र
-आधारकार्ड
-मतदार ओळखपत्र
-ड्रायव्हर लायसन्स
-पॅनकार्ड
कामानिमित्त रोज रात्री प्रवास करणाऱ्या स्त्रियांनी तर या गोष्टी लक्षात ठेवाव्यातच पण कधीतरी रात्री उशिरा प्रवास करणाऱ्या महिलांनीही तितकंच सतर्क राहणं गरजेचं आहे.