‘क्विन्स ड्राईव्ह’ या सुपरकार क्लबच्या माध्यमातून स्त्रियांना गाडी चालवायला शिकण्यास आणि चालक म्हणून नोकरी करण्यासाठी मदत मिळवून देण्यासाठी विविध उपक्रम सुरू करण्याचं रितिकाचं स्वप्न आहे. आजवरच्या अनुभवाविषयी ती सांगते, माझी एक मैत्रीण जी एकेकाळी गाडी चालवण्यास घाबरत होती, ती आता आत्मविश्वासानं गाडी चालवते. वाहन चालवायल्या शिकल्यामुळे काही जणींच्या आयुष्यालाच वेगळी दिशा मिळते. इथे ‘आत्मभान, आत्मविश्वास आणि स्वातंत्र्य’ या त्रिसूत्रीवरही भर दिला जातो.

‘ऑटोमोटिव्ह उद्योगात सुपरकार क्लबची संख्या सध्या वेगाने वाढत आहे. हे क्लबवर प्रामुख्याने पुरुषांचे प्राबल्य आहे. पुरुषांचे कॉफी ड्राइव्ह, मॉर्निंग ड्राइव्ह असे क्लब असतात, मात्र स्त्रियांसाठी या क्षेत्राशी निगडीत असे कोणतेच व्यासपीठ नाही.’ हे लक्षात घेऊनच एका स्त्रीनं ‘क्विन्स ड्राईव्ह’ या सुपरकार क्लबची स्थापना केली. आज तिनं स्थापन केलेला हा क्लब भारतातील स्त्रियांसाठीचा पहिला सुपरकार क्लब मानला जातो. “पुरुष चारचाकी गाडी चालवतात. गाड्यांची खरेदी करतात आणि स्त्रियांची भूमिका काय, तर फक्त प्रवाशाची… हे मी पाहिलं होतं. मला भारतीय पुरुष आणि स्त्रियांची ही मानसिकता बदलायची होती.” हे तिचं ध्येयच स्त्रियांसाठी अनोखं काही तरी करण्याची कारण ठरलं. वाहनाचे स्टेयरिंग स्त्रियांच्या हातात देणाऱ्या या स्त्रीचं नाव आहे रितिका जतिन अहुजा.

रितिकानं स्थापन केलेल्या ‘क्विन्स ड्राइव्ह’ क्लबच्या माध्यामातून चालकाच्या सीटवर बसून स्त्रिया आत्मविश्वासानं वाहन चालवू लागल्या आहेत. रितिकासाठी गाडी चालवणं हे केवळ वाहतुकीपुरतं मर्यादित नाही, तर हे स्त्रियांना प्रेरणा आणि आत्मविश्वास देण्याचं साधन आहे. ‘वाहन चालवणं हा माझ्यासाठी तणावापासून दूर जाण्याचा मार्ग, संगीत ऐकण्याची संधी आणि स्वातंत्र्याचा आनंददायी अनुभव आहे,’ असं तिला वाटतं.

कटू वास्तव आणि पूर्वग्रह…

जेव्हा लोक एखाद्या स्त्रीला गाडी चालवताना पाहतात, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर पहिली प्रतिक्रिया आजच्या काळातही आश्चर्य व्यक्त करणारीच असते. आणि त्यानंतर लगेचच ते प्रश्नार्थक नजरेनं ‘कधी शिकलीस?’ या विचारानं तिच्याकडे पाहू लागतात, तर काहींना वाटतं, ही तिची स्वतःची गाडी नाही किंवा ती व्यवस्थित गाडी चालवू शकेल का?. बऱ्याचदा स्त्रियांना अशा कटू वास्तवाला सामोरं जावं लागतं. तरीही हे वास्तव झुगारून आणि लोकांच्या पूर्वग्रहांकडे दुर्लक्ष करून स्त्रियांसाठी दुर्लक्षित असलेल्या या उद्योगात चिकाटीनं प्रवेश केला. आजूबाजूच्या लोकांच्या मतांपेक्षा वाहन प्रत्यक्षात चालवण्याचा आनंद मोठा असतो, हे तिनं तिच्या कृतीतून अनेक स्त्रिया आणि लोकांना दाखवून दिलं आहे.

आत्मभान, आत्मविश्वास आणि स्वातंत्र्य

क्लबच्या माध्यमातून स्त्रियांना गाडी चालवायला शिकण्यास आणि चालक म्हणून नोकरी करण्यासाठी मदत मिळवून देण्यासाठी विविध उपक्रम सुरू करण्याचं तिचं स्वप्न आहे. आजवरच्या अनुभवाविषयी ती सांगते, माझी एक मैत्रीण जी एकेकाळी गाडी चालवण्यास घाबरत होती, ती आता आत्मविश्वासानं गाडी चालवते. वाहन चालवायल्या शिकल्यामुळे काही जणींच्या या आवडीला वेगळी दिशा मिळते. मुख्य म्हणजे ‘आत्मभान, आत्मविश्वास आणि स्वातंत्र्य’ या त्रिसूत्रीवरही भर दिला जातो.

आमच्या सदस्यांमध्ये काही नेते, सीईओ, उद्योजिका, तर काही गृहिणीही आहेत. त्यांनी आपण कधी सुपरकार चालवू अशी कल्पनाही केली नव्हती, पण जेव्हा पहिल्यांदा त्या इथे शिकल्या, तेव्हा त्यांना जाणवलं की, दुसरी स्त्री शिकू शकते, तर मी का नाही? गाडी चालवायला शिकल्यामुळे एक प्रकारचा आत्मविश्वास त्यांच्या जगण्यातच नाही, तर त्यांच्या कामातही दिसून येतो. गाडी चालवताना एकाग्रता, जबाबदारी आणि क्षणात निर्णय घेण्याची गरज असते, तसेच नेतृत्वातही स्पष्टता आणि स्वतःचा मार्ग आखण्याची क्षमताही आवश्यक असते, हे सारे गुण शिकण्यातून त्यांच्यातही यायला मदत होते, आमच्याकडे प्रवेश घेणाऱ्या अनेक सभासद स्त्रियांच्या घरी स्पोर्टस् कार आहे, मात्र ती आपण स्वत: चालवू, अशी कल्पना त्यांनी कधीही केली नव्हती, मात्र येथे त्या जेव्हा दुसऱ्या स्त्रीला आत्मविश्वासाने स्टेअरिंग हातात घेताना पाहतात, तेव्हा त्यांच्या मनातही आत्मविश्वास जागृत होतो. त्यामुळे फक्त गाडी चालवण्यापुरतंच नाही, तर इथे एक असा ग्रुप तयार झाला आहे जिथे महिला एकमेकींना सक्षम करतात. वाहनचालक केवळ पुरुषच असू शकतात, हा समज त्यांनी मोडून काढला आहे, असं रितिका सांगते.

नवशिक्या स्त्रियांना संदेश

ज्या स्त्रियांना गाडी चालवणं धडकी भरवणारं वाटतं, त्यांना रितिका सांगते की, अनेक स्त्रियांना गाडी चालवणं कठीण वाटतं. याविषयी काही जणींच्या मनात आपण फक्त प्रवास करावा, त्यांनी चालक होऊ नये, ही भावना प्रबळ असते, त्यामुळे त्या कधी गाडी चालवायला शिकण्याचा प्रयत्नच करत नाहीत. त्यांना रितिका सांगते की, कुणाच्याही परवानगीची वाट बघू नका. स्टेअरिंग हातात घेणं हे स्वातंत्र्य, आत्मविश्वास आणि स्वत:चे पूर्वग्रह मोडून गाडी चालवायला शिकण्याचं पहिलं पाऊल आहे. नवीन शिकणाऱ्या तरुणी, मध्यमवयीन स्त्रियांना ती प्रोत्साहन देते, ती म्हणते, पहिली सुरुवात छोट्याशा प्रवासाने करा. स्वातंत्र्याचा आनंद घ्या,

भविष्याचे ध्येय…

मी स्त्रियांना फक्त वाहन खरेदीदार नाही, तर वाहन चालवणाऱ्या स्त्रियांची एक चळवळ उभी करण्याचे तिचे ध्येय आहे. ती म्हणते, त्यांनी फकत प्रवासीच नाही, तर चालकही व्हावे. याविषयी ती तिचा स्वत:चा अनुभव सांगते, मी जेव्हा या उपक्रमाला सुरुवात केली तेव्हा फक्त स्त्रियांनी वाहन चालवण्यापुरतं मर्यादित नव्हतं, तर त्यांना त्यांचं स्वप्न सत्यात आणण्यासाठी पर्याय उपलब्ध करून देण्याबाबत होतं.

एक स्त्री एखाद्या लक्झरी शोरूममध्ये जाऊन तिची स्वप्नातली कार खरेदी करेल आणि गाडी चालवणं हे स्त्री आणि पुरुष दोघांसाठी समान असेल… ‘क्विन्स ड्राइव्ह’च्या माध्यमातून रितिकाने स्त्री सक्षमीकरणासाठी एक नवा मार्ग उपलब्ध करून दिला आहे. गाडी चालवण्याच्या आनंदातून भारतातील स्त्रियांना नव्या व्यापक संधी उपलब्ध होत असल्याचं तिचं भविष्यातलं स्वप्न आहे.

namita.warankar@expressindia.com