scorecardresearch

लैंगिक समस्या प्रश्नोत्तरे : दुटप्पी वासनेमागेपासून सावध

आपल्या प्रियकराचं आपल्यावर निस्सीम प्रेम आहे आणि तो आयुष्यभर आपली साथ निभावणारच या भ्रमात असताना अचानक त्याचा विश्वासघात लक्षात आला तर काय कराल? तुमची प्रतिष्ठा महत्वाची की त्याच्यावरचं प्रेम? तुमचं भविष्य की मिंधपण?

Sexual problems, Husband, Wife, extra marital affairs, lust, sex
लैंगिक समस्या प्रश्नोत्तरे : दुटप्पी वासनेमागेपासून सावध ( Image Source – iStock )

डॉ. राजन भोसले

प्रश्न : माझं व अमरचं दीड वर्षांपासून प्रेम आहे. चार महिन्यांपूर्वी अमर दिल्लीला आपल्या आईवडिलांकडे जातो म्हणून गेला आणि एका महिन्यापूर्वी परत आला. आल्यावर त्याने ‘आईवडिलांनी माझ्यावर दबाव टाकून बळजबरीने माझं लग्न केलं’, ही धक्कादायक बातमी मला सांगितली. बायकोला त्याने दिल्लीतच ठेवलं आहे. मुंबईत माझ्याशी प्रेमसंबंध पुढेही चालू ठेवण्याची त्याची इच्छा आहे. मी काय निर्णय घ्यावा? माझं मन अजूनही त्याच्या प्रेमाला विसरू शकत नाही. मी त्याच्याशिवाय जगू शकत नाही. मी काय करू?

उत्तर: मुंबईत स्वतंत्रपणे राहणारा तरुण मुलगा आई-वडिलांच्या दबावाखाली स्वत:ला नको असलेल्या मुलीशी निमूटपणे लग्न करायला तयार होतो, या कथेत अनेक कच्चे दुवे आहेत. अमरचं तुमच्यावर जर खरोखरच प्रेम असतं तर तो ते आई-वडिलांपाशी हे बोलू शकला असता. लग्नाचं आयोजन व कार्यवाही या गोष्टी इतक्या तडकाफडकी होत नसतात. लग्नाच्या या तयारीच्या काळात तुम्हांला या प्रकाराची माहिती तो फोन किंवा पत्राद्वारे देऊ शकला असता. आई -वडिलांनी ठरवलेल्या लग्नाला विरोध करून मुंबईला येऊन तुमच्याशी लग्न करू शकला असता. पण यापैकी काहीही न करता गुपचूप लग्न करून तो परत येतो आणि इथे तुमच्याशी प्रेमसंबंध चालूच टेवण्याची अपेक्षा बाळगतो, यातच त्याचा दुटप्पीपणा दिसून येतो.

अमरने त्याच्या आईवडिलांपासून आणि बायकोपासून तुमच्याशी असलेले संबंध नक्कीच लपवून ठेवलेले असणार व यापुढेही ही लपवालपवी चालू ठेवण्याचा त्याचा मानस दिसतो. पण या चोरट्या लंपट प्रकरणात तुम्ही भागीदार व्हावं, असं मला वाटत नाही. नशीब की त्याने हे तुम्हाला सांगितले. त्यामुळे सावध राहा आणि यातून बाहेर पडा. तुमचं प्रेम काळाबरोबरच विसरलं जाणं शक्य आहे.

अमरचं तमुच्यावर ‘प्रेम’ आहे, हा समज आधी दूर करा. त्याला केवळ आपल्या वासनेच्या तृप्तीसाठी व करमणुकीसाठी म्हणून मुंबईत एक मैत्रीण हवी आहे. तुम्हाला तुमचं स्वत:चं असं जीवन आहे, स्वत:ची अशी स्वप्नं आहेत व स्वत:चं असं भवितव्य आहे. एका घाबरट माणसाशी विववाहबाह्य संबंध ठेवणारी मैत्रीण होण्यात कुठली प्रतिष्ठा आहे? अशा नात्याला समाजात काही स्थान नाही, हे तुम्हाला ठाऊक असेल! जो माणूस दबावाखाली किंवा इतर स्वार्थी हेतू ठेवून तुमच्या प्रेमावर तिलांजली टाकतो, त्याच्या सावत्र प्रेमाच्या पोकळ आधाराने तुम्ही जीवन जगू शकणार नाही.

अमरसमोर दोन पर्याय होते, – तुमच्याशी असलेलं प्रेम व आई-वडिलांची पारंपरिक इच्छा. त्यापैकी तुमच्याशी असलेल्या प्रेमाला त्याने दुय्यम स्थान दिलं व असं करत असताना तुम्हाला साधी सूचनाही दिली नाही. एवढा मोठा निर्णय घेताना तुम्हाला कळवण्याची साधी तसदी त्याने घेतली नाही, याचा विचार करा. त्याने त्याचा निर्णय तुम्हाला न विचारता घेऊन टाकला आहे. तुम्ही तुमचा निर्णय घेण्याची वेळ आली आहे. स्वत:वर कसलंही दडपण येऊ न देता ‘उघड्या डोळ्यांनी’ निर्णय घ्या. या निर्णयावर तुमची सगळी आत्मप्रतिष्ठा व भविष्य अवलंबून आहे. अमर तुमच्याकडे आकर्षित झाला तसा दुसरा कुणीही तुमच्याकडे नक्कीच आकर्षित होऊ शकेल. खऱ्या प्रेमाची पारख व प्रतीक्षा करण्याची तयारी ठेवा. अमरला स्वत:च्या बायकोशी एकनिष्ठ राहण्याचा सल्ला देऊन कायमचा निरोप द्या. सुरवातीला थोडं कठीण जाईल, पण लवकरच तुम्ही सावराल. तुम्ही चांगलं आयुष्य डिझर्व्ह करता. ते तुम्हाला मिळो. यासाठी तुम्हाला शुभेच्छा.

( तुम्ही तुमचे सेक्सविषयीचे प्रश्न बेधडक विचारा. लैंगिक विज्ञानतज्ञ डॉ. राजन भोसले तुमच्या प्रश्नांची दर सोमवारी इथे उत्तरे देतील. तुम्हाला तुमचं नाव प्रसिद्ध करायचं नसेल तर तसं कळवा. तर पाठवा आम्हाला तुमचे प्रश्न – lokwomen.online@gmail.com या ईमेल आयडीवर. सब्जेक्टमध्ये ‘कामजिज्ञासा’ असा उल्लेख अवश्य करा. )

मराठीतील सर्व चतुरा ( Women ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 13-03-2023 at 15:53 IST