scorecardresearch

Premium

कामजिज्ञासा: मासिकपाळीत सेक्स करावा का?

मासिक पाळीत सेक्स करावा का? हा अनेक जोडप्यांना पडणारा प्रश्न. शरीरसंबंध आणि स्त्रीची त्याकाळातली शारीरिक- मानसिक अवस्था यांचा खूप जवळचा संबंध आहे, म्हणूनच या काळात सेक्स केल्याचे परिणाम काय होतात, याचा विचार व्हायला हवा.

should have sex during menstrual cycle?
मासिकपाळीत सेक्स करावा का?

“डॉक्टर एक खासगी आणि नाजूक गोष्ट विचारायची आहे तुम्हाला. माझा बॉयफ्रेंड म्हणतोय, की मासिक पाळी चालू असताना केलेला सेक्स सर्वांत सुरक्षित आणि चांगला असतो. तो मागेच लागलाय माझ्या, पण मला तो विचारसुद्धा नको वाटतोय. मला ते अजिबात सुरक्षित वाटत नाही. त्यावरून आमच्यात वादावादी सुरू झालीय म्हणून तुमच्याशी बोलायला आलेय.” एक तरुणींचा मला हलक्या आवाजात विचारलेला हा प्रश्न.

नव्या पिढीत हा एक भलताच ट्रेण्ड आला आहे सध्या. पाळीमध्ये सेक्स करणे चांगले, ही कल्पना कोणाच्या डोक्यातून आली कुणास ठाऊक, पण ते आरोग्याच्या दृष्टीने निश्चितच योग्य नाही. स्त्रीला पाळीमध्ये ओटीपोटात दुखणे, योनीमार्गात तिला जाणवणाऱ्या वेदना किंवा अस्वस्थता या सगळ्यात सेक्स करणे कितपत आनंददायी असेल? योनीमार्ग आणि जननसंस्थेत वेगवेगळे जंतूसंसर्ग होण्याची शक्यता यामुळे खूप जास्त वाढते, हा आणखी एक महत्वाचा भाग.

Women Health
स्त्री आरोग्य : लग्नानंतर लगेच मूल होत नाहीए?
Benefits of cuddling for health
हृदयाच्या आरोग्यापासून ते उत्तम झोपेपर्यंत ‘Cuddling’, ‘मिठी मारणे’ ठरते फायदेशीर! काय सांगतात डॉक्टर पाहा…
Exercising 150 mins week to prevent heart attacks Study says it may not be enough if you have sugary health drinks
दर आठवड्याला व्यायाम करता? पण साखरयुक्त पेय घेऊन सर्व मेहनत वाया घालवता; संशोधनाबाबत काय सांगतात डॉक्टर….
Why do breasts itch?
स्तनांना वारंवार खाज सुटते? काय आहे त्यामागचे कारण? जाणून घ्या कशी मिळवू शकता ‘या’ त्रासातून सुटका

रक्त हे कोणत्याही जीवाणूंची वेगाने वाढ होण्यासाठी उपयुक्त माध्यम आहे. पाळीच्या दरम्यान सेक्स केल्यास गर्भधारणा होण्याची शक्यता नाही म्हणून काही जणांना हा मार्ग सुरक्षित वाटतो. म्हणजे कंडोम न वापरता सेक्स करता येईल, परंतु यामुळे तर संसर्ग होण्याची शक्यता अधिक वाढणार. पाळी सुरु असताना गर्भाशयाचे एरवी म्यूकस प्लगने बंद असणारे तोंड उघडलेले असते. तसेच या काळात योनीमार्गाची प्रतिकारशक्ती कमी झालेली असते त्यामुळे धोकादायक जिवाणू योनीमार्गातून वर गर्भाशय, गर्भनलिकेकडे जाऊन गंभीर स्वरूपाचे जंतुसंसर्ग होऊ शकतात. ज्याचा परिणाम वंध्यत्व असू शकतो. गर्भाशयातील आतील आवरणाच्या पेशी गर्भाशयाच्या बाहेर वाढीस लागल्यामुळे होणारा Endometriosis हा आजार पाळीमध्ये सेक्स केल्याने होण्याची शक्यता असते. हा आजार स्त्रीच्या शरीरात दूरगामी समस्या निर्माण करू शकतो. आणि पाळीमध्ये सेक्स केला तरीही क्वचित प्रसंगी गर्भधारणा होऊ शकतेच, हेही लक्षात घ्यायला हवं. अशा प्रकारचे संभाव्य धोके वा रिस्क कायम त्या मुलीच्या जीवावर बेतू शकते, त्यामुळे मुलींनी आरोग्याविषयी जागरूक राहून स्वत:ची काळजी घेणे आवश्यक आहे.

हेही वाचा… गच्चीवरची बाग: फुलांचा सम्राट गुलाब

सेक्सच्या आधी शक्य असेल तर अंघोळ करणे, ब्रश करणे यामुळे सेक्स जास्त आनंददायक ठरू शकतो. शक्य नसेल तर निदान सुगंधी द्रव्याचा वापर, मुखशुद्धी याकडे तरी लक्ष द्यावे. या गोष्टी अतिशय साध्या वाटल्या तरी याकडे खूप वेळा सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते. विशेष करून पुरुषांनी शिश्नाचा भाग स्वच्छ ठेवणे हे त्यांच्या जोडीदाराच्या दृष्टीने खूप आवश्यक आहे. त्यामुळे स्त्रियांच्या अनेक आरोग्य समस्या दूर राहू शकतात. हल्ली सहज उपलब्ध असणारी आकर्षक अंतर्वस्त्रे (lingerie)वापरणे, खोलीमध्ये वातावरण निर्मिती करणे यामुळे सेक्स लाईफ जास्त इंटरेस्टिंग होऊ शकेल. तसेच यासाठी निवांत वेळ असणेही महत्त्वाचे आहे. गर्भनिरोधक कोणते वापरायचे आहे याबद्दल आधीच चर्चा करून निर्णय घेणे रसभंग करणारे वाटले तरी अत्यावश्यक आहे. बरीच जोडपी कोणतेही गर्भ निरोधक न वापरता coitus interuptus(Ejaculation outside vagina.) म्हणजे योनीमार्गाच्या बाहेर वीर्य स्खलन ही पद्धत वापरतात, परंतु ही पद्धत योग्य नसून त्यात गर्भधारणा होऊ शकते हे समजून घ्यायला हवे. कारण काही वेळा ‘फोरप्ले’ च्या वेळी सुद्धा शुक्राणू योनीमार्गात येऊ शकतात. गर्भ निरोधक वैद्यकीय सल्ल्याने योग्य ते वापरल्याने नको असलेली गर्भधारणा खात्रीलायक टाळता येते. त्याचा ताण घेतला नाही तर जोडप्यांना सेक्समध्ये जास्त आनंद मिळू शकतो.

हेही वाचा… ग्राहकराणी: कुरियरने पाठवलेल्या पार्सलमधील वस्तू गायब झाल्या तर….?

भारतीय पुरुषांमध्ये स्त्रीच्या कामसुखाकडे फारसे लक्ष देण्याची वृत्ती अजूनही रुजलेली नाही. त्यामुळेही स्त्रियांमध्ये सेक्सविषयी उदासिनता दिसून येते. त्यामुळे पुरुषांनी या बाबतीत जरा विशेष प्रयत्न करायला हरकत नसावी. घाईघाईत उरकण्याची ही गोष्ट नव्हे. ‘फोरप्ले’साठी भरपूर वेळ द्यायला हवा. एकमेकांची आवडनिवड जाणून घ्यायला हवी. नको तितक्या संकोचामुळे सगळा आनंद हिरावला तर जात नाहीये ना हे बघायला हवं. तसेच स्त्रियांनी सुद्धा स्वत:च्या शरीराची जास्त नीट ओळख करून घ्यावी. सेक्सनंतर स्त्रीला जवळ घेऊन प्रेम व्यक्त करणे ही तिची मानसिक निकडीची गरज असते. जी पुरुषांकडून बऱ्याच वेळा पुरी केली जात नाही. सेक्सनंतर बरेच पुरुष दुसऱ्या बाजूला वळून सरळ झोपी जातात. यामुळे स्त्रिया मनातून दुखावल्या जातात. पुरुषांनी ही चूक नक्की सुधारावी. सेक्सनंतर तो भाग स्वच्छ करणे योग्य आहे, पण अतिस्वच्छता टाळावी. त्यामुळे कोरडेपणा येऊ शकतो. कोरड्या पडलेल्या योनीमार्गाची प्रतिकारशक्ती कमी होते आणि मग वेगवेगळया समस्या निर्माण होतात. स्त्रीला वारंवार योनीमार्गाचे संसर्ग होत असतील तर कधी कधी दोघांनाही उपचार द्यावे लागतात. कारण संसर्ग जरी फक्त स्त्रीला होत असला आणि पुरुषांना काही त्रास होत नसला तरी तो संसर्ग पुरुष जोडीदाराकडून झालेला असू शकतो. त्यामुळे पुरुषांनी समजूतदारपणा दाखवून नीट उपचार घ्यायला हवेत.

तर मित्र मंडळी या माहितीचा उपयोग करून तुम्ही तुमचे आणि तुमच्या जीवलगांचे आयुष्य तुम्ही समृद्ध करू शकता.

(लेखिका स्त्रीरोग व वंध्यत्व तज्ञ आहेत)

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Should have sex during menstrual cycle dvr

First published on: 06-10-2023 at 14:35 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×