Shri Krishna Janmashtami 2023 : कृष्णाचं नाव घेतल्यावर अलगद एक नाव समोर येते ते म्हणजे राधेचं. राधा कृष्णाच्या प्रेमाचे गोडवे अनेकदा भजन किर्तनातून मोठ्या आवडीने गायले जातात. राधा कृष्णाच्या रासलीलेचं वर्णन कौतुकाने केलं जातं, पण तुम्हाला अनेकदा ही गोष्ट जाणवली असेल ती राधा कृष्णाच्या प्रेमाचे गोडवे गाणारेच प्रेम विवाहाला कठोर विरोध करतात. म्हणजेच, राधा-कृष्णाचं प्रेम म्हणजे रासलीला आणि आम्ही करू ते प्रकरण?

समाज पुढारला असला तरी आजही अनेक भागात प्रेमविवाहाला समाजमान्यता नाही. तरुण-तरुणींनी स्वमर्जीने एकत्र येण्याचा निर्णय घेतला तरी त्याला विरोध केला जातो. संस्कृतीचा दाखला देत जोडप्याला विभक्त केलं जातं. अन् त्याच समाजात राधा कृष्णाची प्रेमकथा मोठ्या उत्साहाने आणि गोडीने गायली जाते. हा विरोधाभास नाही का?

हेही वाचा : श्रीकृष्णाकडून शिका ‘या’ पाच गोष्टी; जाणून घ्या आनंदी आयुष्य जगण्याचा मंत्र

भजन-किर्तनातून राधा-कृष्णाच्या प्रेमाचे गोडवे गाणारे आधुनिक युगातील राधा-कृष्णेच्या प्रेमाला मात्र अनैतिकतेचे लेबल लावून मोकळे होतात. कृष्ण देव होता म्हणून त्याच्या प्रेमाला भक्ती समजणारे कलियुगातील खऱ्या प्रेमाला मात्र नावे ठेवतात.
मग अशावेळी हे मान्यच करावं लागेल की जर कृष्ण आजच्या युगातला सामान्य व्यक्ती असता तर कदाचित कृष्णालाही समाजातील या मानसिकतेला तोंड द्यावच लागलं असतं.

राधा-कृष्णाचं प्रेम अजरामर आहे. विवाहपर्यंत त्यांची प्रेमभक्ती पोहोचली नसली तरी आजही कृष्णाच्या नावासमोर राधेचं नाव घेतलंच जातं. एवढंच काय तर राधे कृष्णाच्या नावाचा जप केला जातो. ज्या रुख्मिणीबरोबर कृष्णाने लग्न केलं त्या रुख्मिणीबरोबर कृष्णाचं नाव क्वचितच घेतलं जातं. राधे कृष्णाच्या प्रेमाला एवढं महत्त्व देणारा हा समाज मात्र आताच्या प्रेमाला पाप का समजतो?

हेही वाचा : ‘बाईपण भारी देवा’च्या चारूला ४१ व्या वर्षीच आला मेनोपॉज; मासिक पाळी लवकर बंद होण्याची कारणे काय?

नागराज मंजूळे यांच्या सैराट चित्रपटाची कहाणी अनेक गावा शहरात दरदिवशी घडते. कधी प्रेम प्रकरण समोर आले की दुसऱ्या व्यक्तीबरोबर लग्न करून दिले जाते, दोघांना विभक्त केले जाते, कधी यातून हिंसाचार, मारामारी तर कधी हत्याही घडून येतात. एखाद्याने प्रेमविवाह केला तर त्याला वाळीत टाकलं जातं. समाजातून बाहेर काढलं जातं, कुटुंब नाराज होतं. पण हे कितपत योग्य आहे?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राधा कृष्णाच्या प्रेमाने जगाला प्रेम करायला शिकवलं. फक्त जो आदर त्यांच्या प्रेमाला मिळाला तो आदर सामान्य व्यक्तीच्या प्रेमाला का मिळत नाही? मला वाटतं राधा कृष्णाच्या प्रेमापासून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. आजही अनेक कृष्ण या समाजात आहे ज्यांना खरं प्रेम सोडून दुसऱ्या व्यक्तीबरोबर लग्न करावं लागलं, तर आजही असंख्य राधा या समाजात आहे ज्यांना त्यांचा कृष्ण कधीच मिळाला नाही. त्यांनी दुसऱ्याच व्यक्तीबरोबर आपला संसार थाटला. त्या राधा कृष्णाच्या प्रेमाची किंमत आपल्याला समजत असेल तर समाजात वावरणाऱ्या या राधा कृष्णांना आपण का समजू शकत नाही. आपली मानसिकता कुठे आडवी येते? याचा विचार आपण स्वत: केला पाहिजे.