दिल्लीस्थित एका सामाजिक संस्थेसोबत काम करत असताना एका रेस्क्यू मिशनच्या दरम्यान त्या संस्थेचा मुख्याधिकारी आजारी पडला. तेव्हा पल्लबी यांनी ते काम स्वत:च्या हाती घेतले. अपेक्षेप्रमाणे बचाव मोहीम यशस्वी झाली. पीडितांच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून पल्लबी यांना आपण हाती घेतलेल्या मिशन सार्थकी लागल्याचा अभिमान वाटू लागला. पुढे हेच काम चालू ठेवताना त्यांनी मानवी तस्करीमधून हजारो मुलांना सुखरुपपणे बाहेर काढले. पण यासाठी त्यांना खूप त्रास, अडचणींचादेखील सामना करावा लागला.
मानवी तस्करी ही देशासाठी एक मोठी समस्या बनत चालली आहे. काही लोक लहान शहरांमधून, गावखेड्यातील लहान मुलांना, महिलांना शब्दांच्या जंजाळात अडकवून मोठमोठी आमिष दाखवून त्यांना आपल्या जाळ्यात फसवून त्यांच्या राहत्या ठिकाणापासून लांब शहरांत विकतात. काहींना घरकामासाठी ठेवले जाते तर काहींना कारखान्यात तर अनेकदा महिलांना वेश्याव्यवसायात ढकलले जाते. ही मानवी तस्करी रोखण्याचे शिवधनुष्य आसाममधील एका सर्वसामान्य कुटुंबातील पल्लबी घोष यांनी हाती घेतले. आतापर्यंत त्यांनी १० ते १५ हजार लोकांना या मानवी तस्करीतून वाचवून त्यांच्या कुटुंबाच्या हवाली केले आहे.
पल्लबी घोष यांना मानवी तस्करीबद्दल वयाच्या १२ व्या वर्षी समजले. लहानपणी शाळांना जेव्हा सुट्टी असे त्याकाळात त्या कोलकाता येथे नातेवाईकांकडे जात असत. तिकडे एका संध्याकाळी त्यांना एका व्यक्तीचा ओरडण्याचा आवाज ऐकू आला. त्या आवाजाच्या दिशेने धावत जाऊन चौकशी केली असता समजले की, त्या व्यक्तीची मुलगी गायब आहे. गावात तसेच आजूबाजूच्या गावातदेखील शोध घेतला, पण त्या मुलीचा कुठेच ठावठिकाणा लागला नाही. दुसऱ्या दिवशी पल्लबी यांनी गावात काहीजणांकडे चौकशी केली असता समजले की, मुलं गायब होणे ही इथे सामान्य बाब आहे. अधूनमधून अशा घटना इथे होतच राहतात.
पल्लबी सुट्टी संपल्यानंतर त्यांच्या घरी परतल्या पण ही घटना त्यांच्या मनात खोलवर रुतून बसली. १२ वर्षांच्या पल्ल्बीच्या मनात एक विचार होता की गावातून एखादी मुलगी अचानक गायब कशी काय होऊ शकते आणि तेही गावात कोणलाच त्याची माहितीसुद्धा कशी नाही. त्यावेळीच पल्लबी यांनी लोकांना मानवी तस्करीपासून वाचवून त्यांना नवीन आयुष्य देण्याचे मनाशी ठरवले. सुरुवातीला त्यांनी याबद्दल आपले आईवडील, मित्र- मैत्रिणी, नातेवाईक यांच्याशी बोलून काही करता येईल का? याबद्दल चौकशी केली, पण कोणाकडूनच सकारात्मक प्रतिसाद मिळत नव्हता. नंतर ११ वीला गेल्यावर तिने स्वत:च स्वत:च्या परीने यावर काम करण्यास सुरुवात केली व स्थानिक सामाजिक संस्थांची मदत घेतली नंतर तिने ‘इम्पॅक्ट ॲड डायलॉग फ़ाउंडेशन’ (The Impact and Dialogue Foundation) नावाची स्वत:ची संस्था स्थापन केली.
या मिशनची सुरुवात आसाम रेल्वे स्टेशनपासून झाली. आसाम स्टेशनवर जास्तकरून लोक हे स्थानिक भाषा बोलतात. पण काही लहान मुलं ही हिंदीमध्ये बोलत होती. त्यांच्याशी गप्पा मारताना समजले की ही मुले राजस्थानची असून ते मानवी तस्करीची शिकार झालेली आहेत. यात काहीजणांना मोलमजुरी करण्यास भाग पाडले होते तर काही लहान मुलींना वेश्याव्यवसायात ढकलण्यासाठी सेक्स वर्कर्स बनण्याचे प्रशिक्षण दिले जात होते.
२०१२ साली असेच दिल्लीस्थित एका सामाजिक संस्थेसोबत काम करत असताना एका रेस्क्यू मिशनच्या दरम्यान त्या संस्थेचा मुख्याधिकारी आजारी पडला. तेव्हा पल्लबी यांनी ते काम स्वत:च्या हाती घेतले. अपेक्षेप्रमाणे बचाव मोहीम यशस्वी झाली. पीडितांच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून पल्लबी यांना आपण हाती घेतलेल्या मिशन सार्थकी लागल्याचा अभिमान वाटू लागला. पुढे हेच काम चालू ठेवताना त्यांनी मानवी तस्करीमधून हजारो मुलांना सुखरुपपणे बाहेर काढले. पण यासाठी त्यांना खूप त्रास, अडचणींचादेखील सामना करावा लागला. काही प्रकरणांमध्ये तर घरातील कपाटांच्या आतून बनलेल्या अडगळीमधून मुलांना बाहेर काढले तर कधी घरात किचनमध्ये बनवलेल्या छुप्या बोगद्यातून मुलांना बाहेर काढले आहे.
पल्लबी यांच्यासाठी हा प्रवास मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या कठीण, त्रासदायही होता. कारण पोलिसांशिवाय एखाद्या ठिकाणी बेकायदेशीर क्षेत्रात जाणे अवघड असल्याने आम्ही तासनतास पोलीस स्टेशनमध्ये बसून पोलिसांशी चर्चा करत असू. तसेच जर एखाद्या मुलीला वाचवले जाई तेव्हा तिची संपूर्ण वैद्यकीय तपासणी केली जाते. त्यासाठी किमान ४/५ तास तरी लागतात. कित्येकदा लग्नासाठीुसद्धा मुलींची तस्करी केल्याचे आढळून आले आहे. आसाम, बिहार, झारखंड राज्यातून तर केवळ मोलमजुरीसाठी मुलांची तस्करी केली जाते. केवळ मुलांना तस्करीपासून वाचवले म्हणजे काम झाले असे नाही. त्यांचे पुनर्वसन करणेदेखील महत्त्वाचे आहे. तसेच त्यांना सुखरुप त्यांच्या घरी पाठवणे हीदेखील एक मोठी जबाबदारी आहे.
पल्लबी यांनी २०२० पासून आपल्या फाऊंडेशनच्या माध्यमातून पश्चिम बंगाल, आसाम, भूटान, म्यानमार मधील अनेक मुलींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले आहे. तसेच या फाऊंडेशनच्या माध्यमातून पूर्वोत्तर भागातील ७५०००० हून अधिक महिलांना या मानवी तस्करीबद्दल माहिती दिली आहे.
पल्लबी यांच्या म्ह्णण्यानुसार, तस्करीचे प्रमुख कारण म्हणजे गरिबी, बेरोजगारी, अशिक्षितपणा आहे. तस्करीला बळी पडणाऱ्या बहुतेकांना कोणतीही सुरक्षा नसते. त्यांना शहरातील ऐशोआराम, ग्लॅमर, चांगली नोकरी, सुशिक्षित राहणीमान आदींचे आमिष दाखवले जाते. मुलींना तर शहरातील मोठी स्वप्ने दाखवून त्यांना वेश्याव्यवसयात ढकलले जाते.
पण आता फाऊंडेशनच्या माध्यमातून त्या सर्वांचे पुनर्वसन केले जात आहे. त्यांना स्टडी टूरवर नेले जाते. काहींना स्वावलंबी होण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते, तर काहींना त्यांच्या आवडीनुसार सध्याच्या युगात उपयोगी असे ग्राफिक डिझाईनिंग, वेब डेव्हलपिंगचे प्रशिक्षणसुद्धा मोफत दिले जात आहे.
पीडित लोकांपर्यंत वैयक्तिकरित्या पोहोचल्यामुळे आणि समुपदेशनामुळेच तसेच कायदेशीर सल्ल्यांमुळेच आम्ही आजवर मानव तस्करीतून मोठ्या प्रमाणात मुला- मुलींना सुखरुप बाहेर काढू शकलो. मानवी तस्करीतून वाचलेल्यांना चांगले जीवन देऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे आणि त्यांचे भविष्य उज्ज्वल करणे हेच एक आपले एकमेव उद्दिष्ट असल्याचे पल्लबी घोष सांगतात.