नेहमीच्या पठडीपेक्षा वेगळ्या वाटेवर चालू लागले की, सहकार्यापेक्षा अडथळेच अधिक येतात. परंतु या अडथळ्यांना न डगमगता, स्वत:वर अथक परिश्रम घेत, तऱ्हेतऱ्हेच्या आव्हानांचा सामना करीत अमृता आणि निशिता या नणंद-भावजयीच्या जोडगोळीने मिळविलेले यश हे इतरांसाठी निश्चितच प्रेरणादायक आहे.
तुम्ही एक तरुणी आहात. लग्न करून तुम्ही निवडलेल्या क्षेत्रात नोकरी सुरू आहे आणि अचानक नोकरी सोडून काहीतरी वेगळं, साहसी करायचयं असा विचार तुमच्या मनात डोकावला तर ते तुम्हाला करता येईल का? घरातून पाठिंबा मिळणं दूर राहिलं आणि जग तुम्हाला मूर्ख ठरवतील की, सारं काही सोडून कशाला नसत्याच्या पाठी पळायचे.
पण अमृता आणि निशिता या नणंद-भावजयची कहाणी म्हणजे वरील नियमाला अपवाद अशीच आहे. अमृता ही पेशाने आर्किटेक्चर आहे तर निशिता सिव्हील इंजिनीअर. योग्य वेळी लग्न होऊन दोघीही आपापल्या नोकरीमध्ये व्यस्त होत्या. नोकरी तर सुरू होती, पण मन काही लागत नव्हते.
वेगळं काहीतरी सुरू करायचं की जे नेहमीच्या रुटीनसारखे कंटाळवाणे नसेल. काहीतरी वेगळे असेल. हाच एक विचार दोघींच्या मनात घोळत होता. नेमकं काय हे मात्र कळत नव्हते. तेव्हा २०२४ मध्ये नोकरी सोडून अमृताने डोंगर-दऱ्यांना जवळ केले तर निशिताने समुद्राला. ‘माऊंटेन्स मीट्स सीज’ ट्रॅव्हल नावाची कंपनी सुरू केली.
स्वत:ची गिर्यारोहणाची आवड लक्षात घेऊन अमृताने आवश्यक ते प्रशिक्षण घेत माउंट एव्हरेस्ट, माउंट रिनोक, माउंट किलीमिन्जारो सारखे ट्रेक्स पूर्ण केले, तर निशिताने सेलिंग अड्व्हेनचर म्हणजे समुद्रात कराव्या लागणाऱ्या साहसी गोष्टींचे प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षणाचा हा प्रवास वाटतो तितका सोपा नव्हता. त्यांची शारीरिक क्षमता जोखणारा होता. उगीचच या नादाला लागलो की काय, असा अधूनमधून विचार येत होता त्यांच्या मनात. पण तो तेवढ्याच पुरताच. दोघींनी परिश्रमपूर्वक स्वत:ला या साहसपूर्ण गोष्टींसाठी तयार केले.
प्रशिक्षण तर पूर्ण झाले, पुढे काय हा विचार दोघींच्या मनात येत होता. तेव्हा एक दिवस गप्पांच्या नादात आपण एकत्र येऊन ट्रॅव्हल कंपनी सुरू केली तर हा विचार चमकून गेला. आणि त्यावर विचार मंथन सुरू झाले. तेव्हा टिपिकल प्रवासी कंपनी सुरू न करता काहीतरी वेगळं द्यावं या उद्देशाने त्यांनी ‘माउंट मिट सी’ असे आपल्या कंपनीचे नाव ठेवले. आणि नावाप्रमाणे ज्यांना ट्रेकिंग किंवा समुद्रातील साहसी, थरारक अनुभव घ्यायचा असेल तर तशी त्यांच्यासाठी टूर त्या आखत असत.
मुळात प्रवासाच्या बाबतीत आपल्या इथे अशा स्वरुपाची कल्पनाच नाविन्यपूर्ण असल्यामुळे सुरुवातीचे सहा महिने कंपनीचा कारभार अगदी थंड होता. उगीच नसत्या गोष्टींच्या नादाला लागतंय, असं लोक बोलू लागली. घरच्यांचा पाठिंबा होता, पण भोवतालचे वातावरण पार नकारात्मक होते. आपण निर्णय घेण्यात चुकलो की काय असे वाटत असताना पहिली टूर मिळाली. लोकांना ही टूर प्रचंड आवडली.
कारण या टूरची आखणी पारंपरिक स्वरुपाची नव्हती. ही टूर म्हणजे ट्रेकिंग आणि समुद्री साहस यांचे कॉंम्बिनेशन होते. नेहमीच्या त्याच त्याच वाटेवरून न जाता वेगळ्या वाटाना आपलंस करणं. साहस आणि त्यामागचा थरार अनुभविताना स्वत:मधल्या क्षमता जोखल्या जातील आणि काहीतरी वेगळं केल्याचा आनंद त्या प्रवाशांना अनुभवता येईल, अशा स्वरुपाची आखणी केली होती.
पहिल्या टूर नंतर त्यांची ही संकल्पना चांगलीच मूळ धरू लागली. जसजसा लोकांचा प्रतिसाद वाढत गेला, तसतशी वेगवेगळ्या टूर्सची आखणी होऊ लागली. मग त्यात लेहपर्यंत रोडबाईक ट्रीप, भूतान, मेघालय, व्हेल्स माशांना बघण्यासाठी बोटसफारी, रिव्हर राफ्टींग अशा अनेक वेगळ्या संकल्पना घेऊन देशात आणि परदेशात टूर्स काढायला सुरुवात केली. एका वर्षाच्या कालावधीत त्यांनी सुमारे १५ हुनअधिक ग्रुप टूर्स आयोजित करण्यात यश मिळविले. शिवाय लाखो रुपयांचा नफा देखील कमविला. जी लोक यांना मूर्खात काढत होती, तेच लोक आता त्यांच्या यशाचं गुणगान करू लागली.
असे असले तरीही दोघींचे पाय आजही जमिनीवर आहेत. आमची संकल्पना यशस्वी ठरत असली तरीही अजून बरीच आव्हाने आमच्यासमोर आहेत. कधी पुरेसे फंड मिळत नाही तर कधी कधी आमच्याच शारीरिक क्षमतेचा कस लागतो. अशावेळी दोघी एकमेकींना साथ देत एकमेकींचा हुरूप वाढवितात. विशेष म्हणजे त्यांच्या या कामासाठी त्यांच्या पतींचीही तितिकीच मोलाची साथ लाभली आहे.अ मृता आणि निशिता यांनी फक्त स्वप्न पहिले नाही, तर ते प्रत्यक्षात आणण्यासाठी तितकेच अथक परिश्रम देखील घेतले आहेत. वेगळ्या वाटेवरून चालताना मार्गात अडथळे हे येतातच, पण म्हणून हिंमत न हरता आपली ध्येयाकडची वाटचाल सुरू ठेवली. आज यशाची चव चाखताना त्यांना आनंद तर होतोय, पण वेगळं स्वप्न पाहण्याचं धाडस करू शकलो, याचा अधिक आनंद आहे.