बाग फुलवण्यासाठी टेरेस हा सर्वोत्तम पर्याय आहे. स्वच्छ ऊन, वारा व ऐसपैस जागा, निवांतपणा ही टेरेसची वैशिष्ट्ये असतात. टेरेसवर प्रतिकूल परिस्थिती (कडक ऊन, उष्ण वारा, माती नाही) असली तर ती नियंत्रित नक्की असते. टेरेसचे वॉटर प्रूफिंग केलेले असले तरी खबरदारी म्हणून ५०० मायक्रॉनचा प्लास्टिक पेपर सर्वात तळाशी वापरून, त्यावर सरळच्या सरळ लांब विटांचे वाफे साकारता येतात. टेरेसचे बांधकाम थोडे जुने किंवा गळतीची शक्यता वाटल्यास टेरेसवर १ इंच जाडीचा सिमेंट काँक्रीटचा थर द्यावा. त्यावर विटा रचाव्यात व त्यावर प्लास्टिक पेपर अंथरून विटांचे वाफे तयार करावेत.
आणखी वाचा :आहारवेद : जीवनसत्त्वांनी परिपूर्ण अंजीर
टेरेसप्रमाणे फ्लॅटच्या बाल्कनी/गॅलरीत अशी बाग फुलवता येईल. अगदी ५ बाय १० इतकी जागा असेल तरी चालते. अशा जागेच्या नियोजनासाठी शक्य असल्यास लोखंडी पायऱ्यांची मांडणी करून घ्यावी. प्रत्येक पायरी ही ८ इंच रुंदीची असली तरी चालते. २ फुटांच्या रुंदीच्या मांडणीत ८ इंचाच्या ३ पायऱ्या करता येतात. येथे आयताकृती/सपाट बुडाच्या मातीच्या, प्लास्टिकच्या कुंड्या किंवा नर्सरी बॅगही रचून ठेवता येतात.
आणखी वाचा : गच्चीवरची बाग:पुठ्ठ्यांची खोकी आणि सुपारीची पाने
बाल्कनी/गॅलरीला सुरक्षा म्हणून लोखंडी ग्रिल लावता येते. याचाही कल्पकतेने वापर करून कुंड्या ठेवण्यासाठी पायरी किंवा कुंडी बसेल अशी गोल रिंग करून घ्यावी. कुंड्या, पिशव्या हलवताना सहजपणा येतो.
कुंडी, वाफा भरण्याची पद्धत
आता गच्चीवरच्या बागेसाठी कुंड्या किंवा वाफा कसा भरायचा ते पाहू. कुंड्या किंवा वाफा हा कधीही पूर्ण मातीने भरू नये. कालांतराने मातीतील सत्त्व संपून झाडे फळे, फुले देत नाहीत. माती निर्जीव होते. त्यासाठी कुंडी, वाफा भरताना तळाकडून अधिकचे पाणी वाहून जाण्यासाठी खाली एक छिद्र किंवा वाफ्यातून पाणी वाहून जाण्याची व्यवस्था असावी. यात सुरुवातीला नारळाच्या सुक्या शेंड्या, उसाचे वाळलेले चिपाड, त्यावर वाळलेल्या काड्यांचा एक सेंटीमीटरपर्यंत थर द्यावा. त्या थरावर कोणत्याही झाडांचा सुकलेला पालापाचोळा, त्यावर वाळलेल्या खरकट्या अन्नाचा किंवा वाळलेल्या हिरव्या कचऱ्याचा थर द्यावा. त्यावर माती असे सर्व साधारणत १५-१५ टक्के थर द्यावेत. ते पायाने अथवा हाताने चेपून घेतल्यास उत्तम. वरील मातीचा थर हा ३-४ इंचांचा असला तरी पुरेसा होतो. वरील थरामध्ये भाताचे तूस, शेणखत किंवा घरच्या व्हर्मी कंपोस्टिंग खताचा १-१ इंचाचा थर दिल्यास उत्तम. अशा प्रकारे कुंडी किंवा वाफा भरल्यावर ४ ते ५ दिवस गरजेपुरते मोजकेच पाणी द्यावे. ते वाहून जाणार नाही याची काळजी घ्यावी. यामुळे कुंडीत, वाफ्यात वाफसा तयार होतो. असा वाफा तयार केल्यावर ३ ते ५ दिवसांनी बियाणे पेरता येते वा रोपाची लागवड करता येते. त्यासाठी मातीच्या थराची उंची वाढवावी. कालांतराने हे थर खाली बसत जातात. त्यात वरखत, लेंडीखत, माती, वाळलेले शेणखत, घरचे कंपोस्टिंग खत, सुका पालापाचोळा व शेंड्यांचे आच्छादन देत जावे म्हणजे कुंडी, वाफा भरत जातो.
sandeepkchavan79@gmail.com