पाच वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘लस्ट स्टोरीज’ या सिनेमाने एकच खळबळ उडून दिली होती. त्यातला कियारा आडवाणीचा ‘व्हायब्रेटर’वाला सीन तर आजही समाजमाध्यमांवर अधूनमधून फिरत असतो. एरवी चित्रपटगृहात प्रदर्शित करता न येणारा आशय असलेले सिनेमे गेल्या काही वर्षांपासून ‘ओटीटी’च्या माध्यमातून आपल्याकडे मोठ्या प्रमाणात येत आहेत. असाच चारचौघांत सहज बोलता न येणारा विषय म्हणजे मानवी कामेच्छा. ‘लस्ट स्टोरीज-२’ हा ‘नेटफ्लिक्स’वरील सिनेमा स्त्रियांची कामेच्छा हा विषय घेऊन समोर येतो. यातल्या चार कथांमध्ये कोंकणा सेन शर्मा यांची कथा- ‘द मिरर’ सर्वोत्तम आणि संवेदनशील असून ‘नेटकरी’ आपल्या कमेंटस् मधून त्याविषयी व्यक्त होताना दिसताहेत.

कोंकणा सेन शर्मा यांची कथा फारच निराळी आहे. शक्यतो कधीही ऐकिवात किंवा वाचनात न येणारी अशी. ही कथा पाहात असताना प्रेक्षकांच्या मनात पहिला प्रश्न येतो, की ‘हे असं पण घडू शकतं?’ ही गोष्ट आहे एका उच्च मध्यमवर्गीय एकल स्त्रीची (तिलोत्तमा शोम) आणि तिच्या घरातली कामवाली बाई (अमृता सुभाष) यांची. प्रणय शुष्क झालेली यातली घरमालकीण आहे. ती जेव्हा आपल्या कामवाल्या बाईला आणि कामवाल्या बाईच्या नवऱ्याला आपल्या अपरोक्ष, आपल्याच घरात, आपल्याच पलंगावर पाहते, तेव्हा अक्षरशः जागेवरच थिजते. सुरुवातीला तिला या घटनेची प्रचंड चीड येते. पण नंतर मात्र तिला स्वतःमधल्या कामेच्छेची तीव्र जाणीव व्हायला सुरुवात होते. माणसांच्या गर्दीनं सुजलेली शहरं, अगदी छोटी घरं आणि घराच्या जबाबदाऱ्या, यामुळे नवरा-बायकोंना सहज न मिळणारा खासगीपणा ही त्या जोडप्याची व्यथा आहे. खोलात जाऊन डोकावलं असता अशी अनेक कारणं सापडतील, ज्यामुळे स्त्रियांना आपल्या कामेच्छेचं दमन करावं लागतं.

The Phenom Story A Dream Come True entrepreneur Srikanth bolla
फेनम स्टोरी: स्वप्न सत्यात उतरवणारा श्रीकांत
Biopic ‘Amar Singh Chamkila’ released
अमर सिंग चमकीला यांचा चरित्रपट प्रदर्शित; २७ व्या वर्षी हत्या झालेले ‘एल्विस ऑफ पंजाब’ नेमके कोण?
vfx oscar winner tim mcgovern
व्यक्तिवेध : टिम मॅकगव्हर्न
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर

हेही वाचा.. ‘या’ महिलांना बीजांडकोशाचा कॅन्सर होण्याचा धोका अधिक ! कोणत्या व्यवसाय करणाऱ्या महिला ठरू शकतात कर्करोगग्रस्त …

तर, या घर मालकिणीला जाणवतं, की आपल्याकडे चांगला पैसा-अडका, सोयीसुविधा असूनही आपण कामसुखापासून वंचित आहोत. ही गोष्ट तिला अस्वस्थ करते. घरमालकीण आजच्या अशा अनेक ‘करिअरिस्टिक’ स्त्रियांचं प्रतिनिधित्व करते, ज्यांना कामाच्या धबडग्यात स्वतःकडे, स्वतःच्या गरजांकडे लक्ष द्यायला वेळ उरत नाही. करिअर करता करता कधी वयाची पस्तीशी आली, तेही समजलं नाही. आयुष्यात प्रेम करायचं राहून गेलं. आपल्या हक्काचं माणूस आपल्या जवळ नाही, ही गोष्ट आत स्वतःला कुरतडते आहे. जीवनात शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही पातळ्यांवर मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आता या वयात प्रेम करायचं ठरवलं, तरी ते कुणावर करायचं? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रेम करायला लागणारं धाडस गोळा कसं करायचं? ती वेळ गेली आहे, याची जाणीव शरीर करुन देत आहे, ही कथा फक्त या घरमालकिणीचीच नाही. अनेकींची आहे. घरमालकीण आणि कामवालीचं भांडण आणि त्यानंतरचा प्रसंग हा तर या कथेतला सिक्सरच!

हेही वाचा… गच्चीवरची बाग: घरातल्या झाडांची काळजी

‘लस्ट स्टोरीज-२’मध्ये पहिल्या भागाच्या तुलनेत चार कथांमध्ये चांगलंच वैविध्य पाहायला मिळतं. शरीर वासना प्रबळ झालेल्या व्यक्तिरेखांची घालमेल, हे प्रमुख सूत्र या चारही कथांचं असलं, तरी केवळ तेवढ्यापुरताच हा विषय मर्यादित नाही. त्यांच्या कथानकाचा एकमेकांशी अर्थार्थी संबंध नसला तरी त्या प्रेक्षकांना मात्र वेगवेगळ्या पातळ्यांवरचा अनुभव देतात. दिग्दर्शक आर.बाल्कींची कथा ‘मेड फॉर इच अदर’ जरा उथळ आहे. एक आजी (नीना गुप्ता) ही घरात नातीच्या (मृणाल ठाकूर) लग्नाची बोलणी सुरू असताना ती नातीच्या होणाऱ्या नवऱ्याला उद्देशून म्हणते, की ‘जर गाडी घेण्याआधी टेस्ट ड्राईव्ह घेता, तर लग्न करताना घ्यायला नको?’ या कथेत ही आजी हेच मुख्य पात्र आहे. तिच्या मते मनं, मतं जुळणे इतकंच महत्त्वाचं नाही. शरीर संबंध जुळणं हाच सुखी संसाराचा मंत्र आहे! ही गोष्ट भारतीय समाजाला पचणं जरा जास्त जड जाईल!

हेही वाचा… नवऱ्याच्या हातचा मार की आत्मसन्मान?

सुजय घोष आणि अमित शर्मा यांच्या कथा (अनुक्रमे ‘सेक्स विथ द एक्स’ आणि ‘तिलचट्टा’) या सूडाच्या आहेत. दोन्ही कथांमध्ये कॅमेरा हा अनुक्रमे अभिनेत्री तमन्ना आणि काजोल यांच्याभोवतीच फिरत असतो. यातला तमन्नाचा अभिनय अगदी प्राथमिक अवस्थेतला आहे. काजोलचं काम मात्र चांगलं झालंय.

सर्वच समाजानं स्त्रियांच्या कामेच्छांना कायमच दुय्यमपणाची वागणूक दिली आहे. पुरुषांची कामेच्छा हे पौरुषत्व आणि स्त्रियांची कामेच्छा ही वासना?… ‘लस्ट स्टोरीज्’सारख्या सिनेमांमधून स्त्रियांना आपल्या आतल्या शृंगारिक भावनांना मोकळेपणानं स्विकारण्याचं स्वातंत्र्य काही अंशी तरी मिळेल, अशी आशा करायला हरकत नाही. आपल्या सर्व भावनांना मोकळेपणानं स्वीकारू शकणाऱ्या उन्मुक्त स्त्रिया याच खऱ्या अर्थानं सुंदर वाटतात!