नमिता वारणकर

जगातील सर्वात प्रतिष्ठित सौंदर्य स्पर्धांपैकी एक मानली जाणारी ‘मिस युनिव्हर्स’ ही स्पर्धा यंदा अत्यंत खास ठरणार आहे. कारण एक तरुणी या स्पर्धेत आपल्या देशाचं- पॅलेस्टाईनचं प्रतिनिधित्व करणार आहे. नोव्हेंबरमध्ये बँकॉकमध्ये होणाऱ्या या स्पर्धेतील लखलख चंदेरी तेजाच्या मंचावर उतरण्या मागे इतर सौंदर्यवतींप्रमाणे फक्त आपलं सौंदर्य आणि प्रतिभा जगासमोर आणणं इतकंच नाही, तर आपल्या देशातल्या प्रश्नांकडे जगाचं लक्ष वेधण्यासाठी ती आत्मविश्वास आणि अपार मेहनतीच्या बळावर या स्पर्धेत उतरली आहे. सध्या पॅलेस्टाईन गाजतंय ते युद्ध, तिथले भूकबळी, निरागस मुलांचा संहार यांमुळेच… पॅलेस्टाईनच्या या भयावह दृश्यांकडे जगाचं लक्ष जावं इतकीच तिची अपेक्षा…

नदिन अय्युब… ती २७ वर्षांची आहे. गेल्या २ वर्षांपासून सुरू असलेलं इस्त्रायल आणि पॅलेस्टाईन युद्ध जगजाहीर आहे. यावेळी होणारं मानवी हक्कांचं उल्लंघन, शेकडोंचे बळी, अन्न-पाण्याचा प्रश्न, कुपोषित बालकं, निर्वासितांचे प्रश्न, हमासच्या ताब्यात असलेली गाझा पट्टी, इस्त्रायलने लावलेली नाकेबंदी, तसेच लाखो पॅलेस्टिनी नागरिकांच निर्वासित छावण्यांमधलं जीवना… एकंदरीत असा घनघोर संघर्ष दररोज सुरू असतानाही ‘मिस युनिव्हर्स’च्या व्यासपीठावरून नदिन आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करणार आहे. दोन देशांचं युद्ध सुरू असताना नादिनचं ‘मिस युनिव्हर्स’च्या व्यासपीठावरून पॅलेस्टिनी लोकांचा आवाज बनून त्यांचं प्रतिनिधित्व करणं हे नागरिकांसाठी अभिमानाचा विषय बनला आहे. या घटनेमागील अनोखी गोष्ट म्हणजे पॅलेस्टाईनच्या इतिहासात पहिल्यांदाच एका पॅलेस्टिनी तरुणी आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धेत उतरली आहे.

‘मिस युनिव्हर्स’च्या व्यासपीठावर स्पर्धक म्हणून प्रतिनिधित्व करायला मिळणार, या गोष्टीचा मला अभिमान वाटतो’, अशी भावना नदिनने या स्पर्धेनिमित्त ‘इन्स्टा’ वर व्यक्त केली आहे. देशप्रेमाने भारावलेली नदिन आपले मनोगत व्यक्त करताना म्हणते, ‘सध्या पॅलेस्टाईनमध्ये सुरू असलेलं युद्ध संपूर्ण जग पाहत आहे, अशा परिस्थितीत ज्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय त्या माझ्या मायभूमीतल्या सगळ्या नागरिकांची मी प्रतिनिधी आहे. ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धेत सहभागी होत असताना ‘माझ्या देशाचा आवाज’ म्हणूनही मी हे प्रतिनिधित्व करत आहे. आम्ही सध्या युद्धाच्या काळात खूप संहार, वेदना सहन करत आहोत, आमची जिद्द, आशा, चिकाटी आणि मातृभूमीवर असलेल्या अगाध प्रेमामुळेच आज आमचा श्वास सुरू आहे. गाझा पट्टीत जे घडत आहे, त्याबद्दल ‘मिस युनिव्हर्स’च्या व्यासपीठावरून आवाज उठवणं ही माझी जबाबदारी आहे, आमच्यावरील संहाराविरोधात आवाज उठवणं हे देशातल्या नागरिकांचं कर्तव्य आहे आणि त्यासाठी ‘मिस युनिव्हर्स’ हे एक महत्त्वाचं व्यासपीठ आहे.’

सामाजिक उपक्रमांत सहभाग

नदीनने २०२२ मध्ये ‘मिस पॅलेस्टाईन’चा किताब जिंकला, त्यानंतर तिने ‘मिस अर्थ’ स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यामध्ये पाच अंतिम स्पर्धकांत तिचा समावेश झाला. त्यानंतर ती ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धेत उतरणार हे निश्चित झालं, पण गाझामध्ये युद्ध सुरू झाल्यामुळे तिला ते शक्य झालं नाही. अखेर यावर्षी ती या स्पर्धेत सहभागी होणार आहे. ती ‘वेलनेस आणि न्यूट्रिशन कोच’ आहे, तसेच तिने मानसशास्त्र आणि साहित्याचं शिक्षणंही घेतलं आहे. तिची आई शिक्षिका आणि वडील वकील आहेत. त्यांच्या कामानिमित्त तिला अमेरिका आणि कॅनडा येथे वास्तव्य करावं लागलं. मूळची रामल्लाची असलेली नदीन अम्मान आणि दुबईत वास्तव्य कतरे. ‘ऑलिव्ह ग्रीन अकादमी’, ‘सायिदात फलस्तीन’ या समाजिक उपक्रमांशी ती जोडली गेली आहे. पॅलेस्टाईनमधील स्त्रियांचं सबलीकरण, जनजागृती करणं, त्यांना योग्य न्याय मिळवून देणं हे ती राबवत असलेल्या उपक्रमांचं उद्दिष्ट आहे.

सौंदर्य स्पर्धा म्हणजे…

‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धेत स्पर्धक म्हणून पात्र होण्यासाठी अनेक अटी, अडथळ्यांचा सामना तिला करावा करायला लागला. गाझा आणि पॅलेस्टाईनमध्ये सुरू असलेल्या दीर्घकालीन संघर्षामुळे स्पर्धेत सहभाग घेण्याचे तिचे आधीचे अनेक नियोजित प्रयत्न पुढे ढकलले गेले. ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धेत सहभागी होण्याचा प्रवास म्हणजे अनेक अडथळ्यांची शर्यत आहे. ‘इतर देशांतल्या स्पर्धकांप्रमाणे साधनं आणि संधी आमच्या देशात नाहीत, कारण पॅलेस्टाईनची आधीची आणि आताची आव्हानं वेगळी आहेत. तरीही माझ्या देशाचं प्रतिनिधीत्व करून व्यासपीठावर माझ्या देशाचा आवाज होणं हे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे’, असे नादिन अय्यूब देशाभिमानाने म्हणते.

तिचा आवाज मातृभूमीसाठी…

आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या या सौंदर्य स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या मातृभूमीसाठी तिने आवाज उठवला असला, तरीही या माध्यमातून मानवी संकटाबाबत जागरूकता निर्माण करण्याबाबत ती प्राधान्य देणार आहे. मर्यादित साधन संपत्ती असूनही याकरिता ‘मिस पॅलेस्टाईन ऑर्गनायझेशन’ आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर काही जागतिक समर्थकांकडून मदत मिळाल्याचे ती सांगते.

आपल्यातील कलागुणांचा वापर देशासाठी करण्याचं ध्येय मनात बाळगून, गाझा आणि पॅलेस्टाईनमध्ये सुरू असलेल्या दीर्घकालीन संघर्षामुळे अनेक आव्हांनाना सामोरे जाणाऱ्या नदीन अय्यूबने मोठ्या देशांतील स्पर्धकांच्या तुलनेत मर्यादित साधनसंपत्ती, सध्याची तणावग्रस्त परिस्थिती… अशा अनेक अडचणींचा सामना केला आहे. युद्धभूमीवरून आलेल्या या सौंदर्यवतीने आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धेत उतरण्याचा आपला प्रवास खंबीरपणे पार केला, ही फक्त तिच्यासाठीच नाही तर पॅलेस्टाईन देशासाठी अभिमानाची गोष्ट मानली जात आहे.

Namita.warankar@expressindia.com