तुमच्यापैकी अनेकांनी ‘ही पोरगी कोणाची’ हा मराठी सिनेमा पाहिला असेल. त्यामध्ये लग्न होत नाही म्हणून कुटुंबाने घराबाहेर हाकलून दिल्यानंतर, स्वतःचा एकटेपणा दूर करण्यासाठी आणि मातृत्व अनुभवण्यासाठी सिनेमामधील महिला पात्र IVF[In vitro fertilization] च्या मदतीने आई होते आणि तिच्या मुलीचे संगोपन करते. खरे तर अतिशय गहन आणि महत्त्वाचा असा हा विषय सिनेमामध्ये खूपच हसत-खेळत मांडलेला आहे. परंतु, तुम्हाला सांगितले की, हे केवळ सिनेमात नव्हे, तर खऱ्याखुऱ्या व्यक्तीच्या आयुष्यातदेखील घडले आहे तर?

सोशल मीडियावर शुभांगी गलांडे नावाच्या महिलेची एक पोस्ट पाहण्यात आली होती. ही पोस्ट मुंबईमध्ये राहणाऱ्या शुभांगीने आपण आई झाल्याची गोड बातमी लिहून शेअर केली आहे. त्या पोस्टवरून असे लक्षात येते की, शुभांगीला अनेक वर्षांपासून मातृत्व, आईपण अनुभवायचे होते. त्यासाठी ती तब्ब्ल १५ वर्षांपासून प्रयत्नदेखील करीत होती. शेवटी काही दिवसांपूर्वीच IUI ट्रीटमेंटमुळे (intrauterine insemination), स्पर्म डोनरच्या मदतीने अखेरीस तिच्या प्रयत्नांना यश मिळाले. शुभांगीने तिच्या फेसबुक अकाऊंटवरून नेमके काय शेअर केले आहे ते पाहू.

Mumbai Women Buys 19 Flats Worth 118 Crores In Malbar Hill
“बंगल्यासमोर बिल्डिंग बांधली, समुद्र कसा बघू?”, म्हणत दक्षिण मुंबईत १९ फ्लॅट्स विकत घेणारी ‘ती’ आहे तरी कोण?
priya bapat reacts on not having baby
लग्नाला १३ वर्षे होऊनही बाळ नाही, प्रिया बापट म्हणाली, “ज्यांना मुलं नकोयत…”
Pranjali awasthi 16 year old entrepreneur - artificial intelligence field
‘१६ वर्षांच्या’ मुलीने सुरू केली स्वतःची कंपनी! आता करते ‘१०० कोटींची’ उलाढाल! कोण आहे, पाहा…
Women Health
स्त्री आरोग्य : लग्नानंतर लगेच मूल होत नाहीए?

हेही वाचा : बोली असो वा प्रमाण, मराठी भाषेची गोडी तुमच्या मुलांना कशी लावाल? ‘खलबत्ताशी’ खास बातचीत…

फेसबुक पोस्ट

“नि:स्वार्थी प्रेमाचा सुखद अनुभव प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात यावा, असं मला आता मनापासून वाटायला लागलं आहे. कारण- मी आता जो अनुभव घेत आहे, तो प्रत्येक स्त्रीनं घ्यावा, असं मला वाटत आहे. तुम्हाला मी काय म्हणत आहे हे आता समजलंच असेल. होय, मी माझं आईपण अनुभवते आहे. मातृत्वाची, गरोदरपणाची इच्छा एवढ्या वर्षांनंतर पूर्ण होत आहे. हे सुख माझ्या पदरात पडलं आहे. ते म्हणतात ना, ‘देर आये, दुरुस्त आये’; पण आता आलंय हे महत्त्वाचं.

१५ वर्षांपासून जी एक गोष्ट मला हवी होती, अखेरीस ती गोष्ट मला २६ जानेवारीला मिळाली आहे. खूप प्रयत्न केले, कितीतरी इंजेक्शन्स, गोळ्या, ट्रीटमेंट्स, करून पाहिले; पण पदरी नेहमी निराशाच होती. इतकेच नाही तर, या वेगवेगळ्या औषधांचे बरेच दुष्परिणाम सहन करूनही त्यांचा कोणताच उपयोग होत नव्हता.
“आज खरंच खूप काही लिहावंसं वाटत आहे. जेव्हा हे सुख आयुष्यात नव्हतं, मूल राहत नव्हतं, तेव्हा अनेकांची बोलणी ऐकली आहेत. मागून बोलणारे, टोमणे मारणारे. त्या वेळेस अशा लोकांच्या बोलण्याने मन घट्ट करून बसावं लागत होतं. इतर लोकांकडे लक्ष न दिल्यामुळे मी त्यांच्या बोलण्याचा फार त्रास करून घेतला नाही; पण आता ते सगळं नको. माझ्या आयुष्यात खूप मोठं सुख मला मिळालं आहे. त्या सुखापुढे या सगळ्या गोष्टी अगदी सहज विसरता येण्यासारख्या आहेत.
तर, शेवटी २०२३-२०२४ माझ्यासाठी खूप भाग्याचं ठरलं. माझ्या उदरात माझा स्वतःचा, हाडामांसाचा गोळा तयार व्हायला लागला आणि आज तो माझ्या हातात आहे. याहून वेगळं सुख नाही. मला मुलगी झाली.. लव यू प्रिन्सेस”, अशी मोठी पोस्ट शुभांगीने तिच्या बाळाच्या फोटोसह शेअर केली आहे.

खरे तर एवढा धाडसी निर्णय घेतल्यानंतर साहजिकच आपल्या मनात अनेक प्रश्न उभे राहतात. ते म्हणजे हा निर्णय घेतल्यानंतर किंवा घेताना कुटुंबातील सदस्य, नातेवाईक काय म्हणाले असतील? सोशल मीडियावर ही पोस्ट केल्यानंतर लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आता घरात लहान बाळ आल्यानंतर मातृत्व अनुभवताना कसे वाटत आहे? याबद्दल माहिती घेण्यासाठी आम्ही शुभांगीशी संपर्क साधला. तेव्हा तिने तिच्या या प्रवासाबद्दल काय सांगितले ते पाहू.

लग्न न करता, आई व्हायचंय या निर्णयावर कुटुंबीयांची काय प्रतिक्रिया होती?

“माझ्या घरातील सदस्यांना खरं तर माझ्या या निर्णयाबद्दल त्रास नव्हता. कारण- मी आधीपासूनच त्यांच्या मनाची तयारी करून ठेवली होती. मात्र, आजूबाजूचे लोक, माझे नातेवाईक यांना मी नेमकं काय करते आहे हे समजावण्यासाठी थोडा वेळ लागला. म्हणजे IUI ट्रीटमेंट काय असते हे सगळं समजून घ्यायला त्यांनाही थोडा वेळ लागला. मात्र, एकदा सगळं नीट सांगितल्यानंतर सगळ्यांनीच मला खूप समजून घेतलं. त्यांना खरं तर माझं मातृत्व खूप महत्त्वाचं होत. कारण- १५ वर्षांपासून माझे प्रयत्न सुरू होते आणि इतक्या वर्षांनंतर आता मला हे सुख मिळालं आहे. म्हणून त्यांना इतर गोष्टींपेक्षाही माझं सुख जास्त महत्त्वाचं होतं.”

सोशल मीडियावर आई झाल्याची पोस्ट शेअर केल्यानंतर तुझ्या या धाडसी निर्णयावर कसा प्रतिसाद मिळाला?

“सोशल मीडियावर मी ही पोस्ट शेअर केल्यानंतर त्यावर आलेल्या सगळ्या प्रतिक्रिया, कमेंट्स या सकारात्मक होत्या. खरं तर अनेकांना असं काही करता येऊ शकतं हे माहीतच नव्हतं. अशा प्रकारच्या ट्रीटमेंट असतात, स्पर्म डोनर असतात हेदेखील अनेकांना नवीन होतं. इतकंच नाही, तर बऱ्याच जणांनी मला बरेच प्रश्नदेखील विचारले. काहींनी तर मला, आम्ही हे फक्त सिनेमांमध्ये पाहिलं होतं; पण प्रत्यक्षातसुद्धा असं होऊ शकतं हे माहीत नव्हतं, असंदेखील सांगितलं.”

“काही सिंगल मदर असतात; पण त्यांना कुठल्या तरी कारणास्तव मुलाचं संगोपन आईला एकट्यानं करावं, असा प्रकार आपण अनेकदा पाहिला आहे; पण डोनरच्या मदतीनं, स्वतःच्या मनानं निर्णय घेऊन, स्वेच्छेनंदेखील आईपण स्वीकारलं जाऊ शकतं, हे अनेकांसाठी नवीन आणि आश्चर्याचं होतं. परंतु, यामधून कुणीही मला नकारात्मक प्रतिक्रिया किंवा कमेंट्स दिलेल्या नाहीत.”

केवळ आई किंवा फक्त बाबा मुलांचे संगोपन करू शकतात का?

“बाळाला किंवा मुलांना वाढविण्यासाठी आई-वडील अशा दोघांची गरज असतेच, असं नाही. आता अगदीच उदाहरण द्यायचं झालं, तर समजा एखाद्या तृतीयपंथीनं बाळ दत्तक घेतलं, तर त्या बाळाला वाढविण्यासाठी ती व्यक्ती, आई व वडील या दोघांची भूमिका एकट्यानं पार पाडत असते. तसंच मीदेखील एक आई आणि वडील या दोघांच्या भूमिका बजावून बाळाचं संगोपन करू शकते. म्हणजे आईच्या मायेबरोबरच बापाचं प्रेम माझ्या बाळाला देण्यास मी समर्थ आहे, असं मला वाटतं. आणि आपण अनेक उदाहरणं पाहतच असतो की, परिस्थिती किंवा एखाद्या अघटित घटनेमुळे स्त्री किंवा पुरुषाला एकट्यानं मूल वाढवावं लागतं. त्यांना त्यांच्यावर आलेल्या परिस्थितीमुळे मुलासाठी दोन्ही पद्धतींनी माया लावावी लागते. आता मला आई व्हायचं आहे हा निर्णय मी स्वतःहून घेतलेला असल्यानं मी नक्कीच आई आणि वडील म्हणून माझ्या बाळाचं पालन-पोषण योग्य पद्धतीनं करीन, अशी माझी खात्री आहे.”

बाळ घरी आल्यानंतर तुमच्या आयुष्यात किती बदल झाले?

“आता माझं बाळ घरी आल्यानंतर मी खूप मोठे बदल अनुभवते आहे. म्हणजे बाळाला सांभाळणं सोपं नसतंच; पण तरीही आपण ते सोपं करून घ्यायचं असतं, असं मला वाटतं. माझी मुलगी खरं तर प्री-मॅच्युअर आहे. त्यामुळे डिलिव्हरीदरम्यानही थोडी अवघड परिस्थिती होती. मात्र, माझ्या बाळाचा जन्म झाल्यानंतर इतकी वर्षं सोसलेली दुःखं, माझ्या सी- सेक्शन डिलिव्हरीमुळे झालेला त्रास, विविध ट्रीटमेंट, औषधं-डॉक्टर्स या सगळ्या सगळ्या गोष्टींचा मला विसर पडला. बाळ माझ्या हातात आल्यानंतर माझ्या आरोग्याच्या तक्रारी म्हणजे ब्लडप्रेशरचा त्रास असेल किंवा अजून काही हे सर्व काही व्यवस्थित झालं आहे. मनावरचा ताण हलका झाला.”
“मुलीची काळजी घेण्यासाठी रात्रभर जागरण असू दे. तिचं पालन-पोषण करण्यात जो आता मी वेळ देत आहे, त्याचं सुख बाकी सगळ्या दु:खांपेक्षा पलीकडचं आहे. खरंच आईपण, मातृत्व काय असतं हे स्वतः अनुभवल्याशिवाय समजूच शकत नाही.”

आपलेदेखील गोंडस, निरागस बाळ असावे, अशी प्रत्येक स्त्रीची इच्छा असते. मात्र, बाळाचे संगोपन हे आपण एकट्याने करू शकतो, असा अत्यंत धाडसी विचार करून, तो सत्यात आणणाऱ्या स्त्रिया खूप कमी असतात. मात्र, हा विचार शुभांगीने केला आणि सत्यात उतरवला. १५ वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर वेगवेगळ्या संकटांना सामोरे जात अखेरीस शुभांगीला तिच्या आयुष्यातील सर्वांत सुखद अनुभव मिळाला आहे. स्वतःची खानावळ चालवीत आणि आता आपल्या मुलीचे एकटीने संगोपन करणाऱ्या शुभांगी गलांडेच्या या निर्णयाचे कौतुक करावे तेवढे थोडेच!

shubhangi galande bold decision of pregnancy
शुभांगी गलांडेने शेअर केलेली फेसबुक पोस्ट

शुभांगी गलांडेची फेसबुक पोस्ट.