आजच्या स्मार्ट युगात अपडेट राहण्यासाठी बातमी हा मूळ दुवा आहे. जगात कुठे काय घडामोडी चालू आहेत हे आपल्याला बातम्यांमधूनच कळते. त्यासाठी वर्तमानपत्रे आहेत, इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, ऑनलाईन वेबसाईट्स आहेत. या झाल्या सर्वसामान्यांसाठीच्या गोष्टी. पण दृष्टीहीनांना आजपर्यंत आजवर बातम्यांसाठी इलेक्ट्रॉनिक मीडिया मधील ऑडिओ किंवा एफएम रेडिओवरच अवलंबून राहावे लागत असे, पण आज ते त्यांचं हक्काचं व्यासपीठ तयार झालं आहे त्याचं नाव आहे ‘व्हाईटप्रिंट’. उपासना मकातींच्या सहजच सुचलेल्या कल्पनेतून साकार झालं देशातील पहिलं वहिलं ब्रेल मासिक.

उपासना यांचा जन्म मुंबईमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबातला. जय हिंद कॉलेजमधून मास मीडियाची पदवी मिळविल्यानंतर त्यांनी कॅनडामधून त्यांनी कॉर्पोरेट कम्युनिकेशन पब्लिक रिलेशनशिपची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी पुन्हा भारतात येऊन एका नवीन स्टार्ट अप कंपनीमध्ये साधारण एक दीड वर्ष नोकरी केली. नोकरी करत असताना एक दिवस सहजच त्यांच्या मनात विचार आला की आपण तर वर्तमानपत्र वाचतो तसं अंध लोक बातम्या जाणून घेण्यासाठी काय करत असतील? उपासना यांना वृत्तपत्र वाचनाची आधीपासूनच आवड होती त्यामुळे हा प्रश्न त्यांचा पिच्छा सोडत नव्हता आणि इथूनच पुढे त्यांच्यातील संशोधक – उद्योजक जागा झाला.

हेही वाचा… कॅन्सरशी लढत; ६२ वर्षीय महिलेने कर्करोगाच्या अभ्यासासाठी पोहण्यातून उभारला फंड! पाहा…

त्यांच्या मनातला हा विचार त्यांनी सर्वात आधी आपल्या मित्रांसोबत शेअर केला. नंतर त्यांनी पुढच्याच आठवड्यात नॅब (National Association For The Blind) मुंबई या संस्थेत जाऊन त्यांनी याबाबत सर्वप्रकारे माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आणि काही करायचं असेल तर तुमचं सहकार्य मिळेल का वगैरे. परंतु एखादा नवीन व्यवसाय सुरू करायचा असल्यास सहजासहजी कोणी विश्वास ठेवत नाही. उपासना यांच्याबाबतीतही तेच झालं. नॅबच्या अधिकाऱ्यांनी होकार दर्शविला तरी त्यांनी तिला फंडिंगसाठी स्वत:च पाहा काय ते आणि या आपण पाहू पुढे काय ते अशीच भूमिका घेतली. परंतु उपासना यांनी हे चॅलेंज स्वीकारलं व दृष्टीहीन व्यक्तींचा शोध घेऊ लागल्या. काही दिवसांतच त्यांना दृष्टीहीनव्यक्ती भेटल्या. त्यांच्याकडून त्यांना उत्तम प्रतिसाद मिळाला आणि तुमची कल्पना स्तुत्य असून या मासिकावर काम सुरू करा. आम्हालासुद्धा इतरांप्रमाणे वर्तमानपत्र, मासिक वाचायची आहेत. पण मार्केटमध्ये आमच्यासाठी एकही असे वर्तमानपत्र, साप्ताहिक किंवा मासिक नाही. यामुळे उपासना यांचा आत्मविश्वास वाढला व त्या जोमाने कामाला लागल्या आणि काही दिवसांतच त्यांनी आपली नोकरी सोडून या ड्रीम प्रोजेक्टवर काम करायला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांना सरकार दरबारी प्रेस नोंदणी करतानासुद्धा खूप अडचणी आल्या. दोन – तीन वेळा त्यांचे टायटल रिजेक्ट झाले. कारण प्रेस नोंदणी करताना त्याचे नाव सध्या चालू असलेल्या कोणत्याही प्रेस कंपनीशी मिळते जुळते नसायला हवे हा नियम होता. नंतर एक दिवस त्यांच्या एका मैत्रिणीने ‘व्हाईट प्रिंट’ हे नाव सुचवलं. कारण ब्रेल लिपी ही पांढऱ्या डॉटमध्ये असते आणि पांढऱ्या रंगामध्येच प्रिंट होतात असं त्यांच्या मैत्रीणीच त्याबद्दलचं मत होतं. मैत्रीणीची ही कल्पना आणि नाव उपासना यांना आवडलं व त्यांनी अखेर आठ महिन्यांच्या संघर्षानंतर ‘व्हाईट प्रिंट’ या नावाने नोंदणी करून मे २०१३ मध्ये भारतातील पहिलं वहिले ब्रेल मासिक छापले व बाजारात आणले.

पहिलं मासिक बाजारात आलं, पण उपासना यांचा संघर्ष इथे संपणार नव्हता. कारण एखादा व्यवसाय पुढे चालवायचा असेल तर फंडिंग तर लागतेच. पण उपासना यांच्या व्हाईट प्रिंटला कधी फंडिंग मिळालं नाही. त्यांनी तो फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन सिस्टीम मध्ये चालू ठेवला आहे. म्हणजे फंडिंग न घेता मासिकाला येणाऱ्या जाहिरातींच्या माध्यमातून येणाऱ्या पैशांतूनच पुढे व्यवसाय वाढवायचा. कारण सुरुवातीला त्यांना काही दृष्टीहीनांकडून असेही ऐकण्यास मिळाले की त्यांना चॅरिटी, फंडिंग या गोष्टी सहसा आवडत नाहीत. कारण आमच्यासाठी या गोष्टी करणारे बहुतेकजण आम्हाला सहानुभूती दाखवून आमच्यावर काहीतरी उपकार केल्यासारखं वागतात. आणि आम्हाला कोणाचीही सहानुभूती किंवा उपकार नकोत. भले आम्हाला दृष्टी नसेल, पण आम्हालादेखील इतरांप्रमाणे आमचा स्वत:चा स्वाभिमान जपायचा आहे. त्यामुळे उपासना यांनी हा व्यवसाय फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनच ठेवायचा हे ठरवलं. पण जाहिरातींसाठी त्यांना संघर्ष करावाच लागायचा. वेगवेगळ्या वेबसाईटवरून कंपन्यांचे इमेल, नंबर शोधून त्यांना आपली कन्सेप्ट, प्रोजेक्ट समजावून सांगावा लागायचा. अखेर एक दिवस त्यांना रेमंड ग्रुपकडून पहिली जाहिरात मिळाली. त्यानंतर कोकाकोला ब्रँडकडून त्यांना एक चांगली जाहिरात मिळाली. कोकाकोला ब्रँडने त्यांच्या मासिकात एक साऊंड चिप लावून एक ऑडिओ जाहिरात बनवली. अशा प्रकारे त्यांना हळूहळू जाहिराती मिळत गेल्या.

हेही वाचा… बलात्कारात पीडितेस अपत्य जन्माची सक्ती करता येणार नाही…

नंतर त्यांच्या लक्षात आलं की, दृष्टीहीन लहान मुलांनासुद्धा ब्रेल अल्फाबेट वाचण्यासाठी पुस्तकं उपलब्ध नाहीत. म्हणून त्यांनी त्यांच्यासाठीसुद्धा एक ब्रेल टॅक्टाईल अल्फाबेट म्हणजे ‘टॅक्टा बॅट’ नावाचं पुस्तक काढलं. हळूहळू त्यांनी इतर बालसाहित्य देखील ब्रेलमध्ये देण्यास सुरुवात केली. त्यामागचा उद्देश फक्त एकच होता की लहान मुलांमधील भेदभावाची भावना कमी व्हावी. प्रत्येकामध्ये काही ना काही वेगवेगळं टॅलेंट असतंच. त्यासाठी त्यांनी ‘लुक आऊट लूक विदिन’ हे पुस्तक प्रकाशित केलं. हे ब्रेल भाषेत, यूट्यूब आणि ऑडिओ बुक मध्येसुद्धा उपलब्ध आहे. दृष्टीहीन मुलं मॅरेथॉन स्पर्धेत गाईड रनर्ससोबत कसे धावतात याविषयावर २०२२ मध्ये उपासना यांनी स्वत: ‘रन सबा रन’ हे पुस्तक लिहिलं. हळूहळू उपासना यांनी शाळांमध्ये सेंसेटायझेशन वर्कशॉप चालू केलं. कोविडमध्ये सुद्धा हे वर्कशॉप ऑनलाईन चालू होतं. रांचीमधील एका शाळेतील जवळपास ५०० विद्यार्थ्यांचे एकत्रित वर्कशॉप घेतलं आहे.

ब्रेल प्रिंटिंग महाग असली तरी त्या माफक दरात मासिक लोकांना देतो. कंपनीचा जो काही नफा तोटा आहे तो जाहिरातींच्या माध्यमातूनच होत आहे. पण व्हाईट प्रिंटमुळे आज दृष्टीहीन लोकांना वाचनानंद मिळतो आहे त्याला तोड नाही. स्वतंत्रपणे त्यांना वाचता येत आहे. सतत कानात हेडफोन लावून ऑडिओ स्वरुपात ऐकायची गरज पडत नाही. सर्वसामान्य लोकांप्रमाणे आम्हीदेखील मासिक हातात घेऊन वाचू शकताे, हा वाचकांचा अभिप्राय आमच्यासाठी प्रेरणास्थान आहे असे उपासना म्हणतात. अशाप्रकारे ‘व्हाईट प्रिंट’ला आता या मे महिन्यात अकरा वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांच्या वाचकांची संख्या १० हजारपर्यंत पोचली आहे.

दृष्टीहीन व्यक्तींना वाचनासाठी स्वत:चं हक्काचं व्यासपीठ मिळवून दिल्याबद्दल आणि पत्रकारिता क्षेत्रात नवीन पर्व सुरू केल्याबद्दल उपासना यांना भारत सरकारतर्फे पुरस्कार मिळाला आहे. तसेच त्यांच्या कर्तृत्वाची दखल घेऊन २०१६ साली फोर्ब्सच्या अंडर ३० च्या यादीत स्थान मिळाले आहे. ‘व्हाईट प्रिंट’च्या सस्थापिका – प्रकाशक होण्यासोबतच त्या एक मोटिव्हेशनल स्पीकर तसेच कॉर्पोरेट क्षेत्रात ट्रेनिंग सेशनसुद्धा घेतात.

उपासना मकाती यांना आतापर्यंत मिळालेले पुरस्कार…

१) रायझिंग टॅलेंट २०१९ – इकॉनॉमी अँड सोसायटीसाठी महिला मंच, पॅरिस.
२) फॉर्च्यून इंडिया – ४० वर्षांखालील – व्यवसायाच्या जगात सर्वोत्कृष्ट आणि तेजस्वी २०१८
३) फर्स्ट लेडी पुरस्कार – भारताचे राष्ट्रपती, २०१८
४) फोर्ब्स ३० अंडर ३० – २०१६
५) ‘इंडिया इनोव्हेशन’ ग्लोबल एंटरप्रेन्युअरशिप शिखरपरिषदेसाठी २०१७ मध्ये निवड.
६) ‘शोकेस’ आणि ‘महिला उद्योजक’
७) विज्ञान आणि नवकल्पकतेसाठी लोरेल फेमिना पुरस्कार
८) स्मार्ट सीईओ – टॉप ५० स्टार्ट अप मध्ये निवड.

rohit.patil@expressindia.com