डॉ. श्रुती कोटांगळे
गर्भधारणेदरम्यान गर्भपिशवीतील बाळाचा भार मूत्राशयावर येतो. त्यामुळे ओटीपोटाचे स्नायू हळूहळू कमकुवत होतात. प्रसुतीच्या वेळी, विशेषतः सामान्य प्रसुतीदरम्यान, या स्नायूंवर अधिक ताण येतो. त्यामुळे खोकताना, शिंकताना, हसताना किंवा वजन उचलताना लघवी होण्याची समस्या उद्भवते. सी-सेक्शन झालेल्या महिलांमध्येही हार्मोनल बदल आणि गर्भावस्थेतच येणाऱ्या दाबामुळे ही अडचण राहू शकते. इस्ट्रोजेन या हार्मोनची पातळी प्रसुतीनंतर कमी झाल्यामुळे स्नायू शिथिल होतात व त्यांचे नियंत्रण कमी होते.

गर्भधारणेदरम्यान तसेच प्रसुतीनंतर महिलांच्या शरीरात अनेक शारीरिक आणि हार्मोनल बदल घडतात. याबदलांपैकी एक महत्त्वाचा त्रास म्हणजे लघवीवरील नियंत्रण सुटणे. याला युरिनरी इनकॉंटिनन्स असेही म्हणतात. बाळाच्या जन्मानंतर काही आठवड्यांतच ही समस्या सुरू होते. ही एक अशी स्थिती आहे, ज्यामध्ये स्त्रियांचे मूत्राशयावर फारच कमी नियंत्रण असते. त्यामुळे दिवसातून अनेक वेळा लघवीवरील नियंत्रणाची समस्या निर्माण होते. ही समस्या सर्वच महिलांना आढळून येईल असे नाही, परंतु याबाबत संकोच बाळगल्याने याबाबत फारशी चर्चा केली जात नाही.

गर्भधारणेदरम्यान गर्भपिशवीतील बाळाचा भार मूत्राशयावर येतो. त्यामुळे ओटीपोटाचे स्नायू हळूहळू कमकुवत होतात. प्रसुतीच्या वेळी, विशेषतः सामान्य प्रसुतीदरम्यान, या स्नायूंवर अधिक ताण येतो. त्यामुळे खोकताना, शिंकताना, हसताना किंवा वजन उचलताना लघवी होण्याची समस्या उद्भवते. सी-सेक्शन झालेल्या महिलांमध्येही हार्मोनल बदल आणि गर्भावस्थेतच येणाऱ्या दाबामुळे ही अडचण राहू शकते. इस्ट्रोजेन या हार्मोनची पातळी प्रसुतीनंतर कमी झाल्यामुळे स्नायू शिथिल होतात व त्यांचे नियंत्रण कमी होते.

लक्षणं…

वारंवार लघवीची इच्छा होणे, अचानक लघवी आल्यावर ती रोखता न येणे, रात्री लघवीसाठी वारंवार उठावे लागणे आणि लघवीवर संयम न राहणे. यामुळे महिलांना मानसिक ताण, आत्मविश्वास खालावणे यासारख्या समस्या उद्भवतात.

उपाय…

सर्वप्रथम ओटीपोटाचे स्नायु मजबूत करण्यासाठी केगल व्यायाम करणे गरजेचे आहे. याशिवाय वजन नियंत्रणात ठेवणे, योग्य प्रमाणात पाणी पिणे, कॉफी, चहा किंवा सॉफ्ट ड्रिंक्सचे सेवन टाळणे योग्य राहिल. गरज पडल्यास फिजिओथेरपी, औषधे किंवा वैद्यकीय उपचारांची मदत घेता येते. योग्य वेळी तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यास ही समस्या सहज नियंत्रित करता येते.

गर्भधारणा, प्रसुतीनंतर लघवीवरील नियंत्रण सुटणे ही एक तात्पुरती समस्या असते. योग्य माहिती, उपचार आणि जीवनशैलीत बदल करून अनेक महिला या त्रासातून मुक्त होऊ शकतात. त्यामुळे या विषयावर मोकळेपणाने चर्चा करणे आणि आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे.

(स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ)