‘फ्यूचर ॲाफ सायन्स ॲंड ह्यूमन लाईफ कॉन्फरन्स’मध्ये ‘कृत्रिम गर्भाशय’ (Artificial Uterus) हे नवं तंत्रज्ञान पूर्ण विकसित झालं आहे आणि मानवनिर्मितीसाठी येत्या काळात याचा वापर होऊ शकतो या ग्राउंडब्रेकिंग बातमीमुळे साक्षी एक्सायटेड झाली होती. आता कधी एकदा नीरजाला याबद्दल सांगते, असं झालं होतं तिला. साक्षी ही बायोलॉजीची तर नीरजा ही समाजशास्त्राची प्राध्यापिका, घट्ट मैत्रिणी. मुख्य म्हणजे विचारांची देवाणघेवाण करण्याचं हक्काचं माणूस, आपापल्या विषयानुरूप दोघी आपापले विचार मांडायच्या. कधी पटायचे, कधी नाही; पण तरीही चर्चा तर व्हायचीच. आजही दोघींनी कॉलेज सुटल्यावर शेजारच्या कॉफी शॉपमध्ये बैठक मांडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साक्षी सांगू लागली. कालच्या कॉन्फरन्समध्ये बायोलॉजिस्ट आणि सायन्स कम्युनिकेटर हाशेल अल गयाली यांच्या कृत्रिम गर्भाशयाच्या ‘वॅाम्ब पॅाड’ या संशोधनावर चर्चा झाली. ‘ॲक्टोलाईफ’ कंपनीने असा दावा केला आहे की ‘कृत्रिम गर्भाशय फॅसिलिटी’द्वारे मूल आईच्या गर्भाशयाबाहेरच तयार करता येऊ शकतं, किंबहुना येणाऱ्या काळात ते अगदीच शक्य आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार कृत्रिम गर्भाशय म्हणजे ग्रोथ पॉड्समध्ये मूल नऊ महिने वाढवलं जातं. महत्त्वाचं म्हणजे त्याच्या डीएनएमध्ये नियंत्रण करून बुद्धिमत्ता, त्वचा- केस- डोळे यांचे रंग यांत आपल्याला हवे तसे बदल करून ‘आवडीचं मूल’ तयार करता येतं. एवढंच नाही तर बाळाची नाडी, श्वासाची गती, हृदय, मेंदू, मूत्रपिंड, यकृत यांच्या वाढीवर लक्ष ठेवण्यासाठी सेन्सर बसवले जाऊ शकतात. या सेन्सरद्वारे मुलासंबंधीची सर्व माहिती मिळू शकते तसेच ॲपद्वारे मुलाच्या वाढीशी संबंधित सर्व हालचाली पालक पाहू शकतात.

नीरजालाही याच फार अप्रूप होतं. सोशल मीडियावर तिला याबद्दल कल्पना होतीच. “आपल्या समाजात मूल न झालेल्या बाईला किती टोचून बोलतात, पण आता या तंत्रज्ञानामुळे प्रत्येक स्त्रीचं मातृत्वाचं स्वप्न पूर्ण होईल. मूल होण्यावरून चाललेलं स्त्रियांचं शोषण तरी थांबेल,” नीरजा म्हणाली.

“या तंत्रज्ञानामुळे संसर्गजन्य आजार दूर ठेवता येतात. जन्माला येणारं बाळ हे सुदृढच जन्माला येतं. कॅन्सरमुळे किंवा अन्य काही आजारांमुळे ज्या स्रियांचं गर्भाशय काढून टाकलेलं आहे त्यांनासुद्धा आता आई होता येईल. शिवाय जपानसारख्या लोकसंख्या कमी असलेल्या देशांमध्ये या तंत्रज्ञानाने लोकसंख्या वाढवता येईल,” साक्षीनेही दुजोरा दिला.

“पण साक्षी, या तंत्रज्ञानाचा उपयोग नकारात्मकही होऊच शकतो ना? म्हणजे बघ ना, ज्यांना खरोखर गरज आहे अशा स्त्रिया या तंत्रज्ञानाचा लाभ घेणार, ज्या स्त्रियांना आई व्हायचं आहे पण त्या नऊ महिने मूल पोटात वाढवायला तयार नाहीत, ज्यांना करिअरच्या स्पर्धेत मातृत्वामुळे कुठे मागे पडू की काय, अशी भीती असते त्या स्त्रिया, ज्यांना आई होण्यासाठी स्वतःच्या लाईफस्टाईलमध्ये, खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये नऊ महिनेसुद्धा बदल करायचा नसतो त्या स्त्रिया किंवा ज्यांना प्रसूतीवेदना आणि प्रसूतीनंतरचा त्रास सोसायचा नसतो अशा सर्व स्त्रिया या सुविधेचा लाभ घेतील. पण फक्त मुलगाच हवा, फक्त आपलाच धर्म वाढावा, फक्त एकाच रंगाची मुलं हवी म्हणून या सुविधेचा गैरवापरही होऊ शकतो.” नीरजाचा हा मुद्दा रास्त होता.

ती पुढे म्हणाली, “या तंत्रज्ञानामुळे अनाथ मुलांचा प्रश्न अजूनच बिकट होणार. यापूर्वी मूल होत नसलेली जोडपी सगळे उपाय करून संपले की, मूल दत्तक घेत असत. आता स्वतःला मूल होणारच हा विश्वास त्यांना मूल दत्तक घेण्यापासून परावृत्त करणार. अशी कितीतरी मुलं अनाथच राहणार. हल्लीची पिढी किती आत्मकेंद्री झाली आहे याचं उत्तम उदाहरण म्हणजे कृत्रिम गर्भाशयाची सुविधा.”

यावर साक्षी म्हणाली, “पण कृत्रिम गर्भाशयातून आपल्या आवडीचं मूल तयार करता येतं. आपल्याला हवा तसा त्याच्या केसांचा, त्वचेचा आणि डोळ्यांचा रंग ठरवता येतो. एवढंच काय, त्याच्या डीएनएत बदल करून त्याची बुद्धिमत्तासुद्धा ठरवता येते मग तडजोडी स्वीकारून अनाथाश्रमातील मूल कोण दत्तक घेईल?”

आणखी वाचा- “पहिल्यांदाच बोल्ड भूमिका करतेय…” – श्रद्धा कपूर

नीरजा, ‘आपल्या आवडीचं मूल’ या शब्दांनी व्यथित झाली. आपलं मूल हे आपल्या आवडीचंच असतं. त्याचे डोळे निळे झाले आणि रंग गुलाबी झाला म्हणून माया जास्त होणार का? मग या बदलांची गरज काय? आपलं मूल आहे तसं स्वीकारणं आई-वडिलांना का जड जावं? मुलाच्या बुद्धिमत्तेत बदल करायचे ठरवले की, आई वडिलांचं कामच वाचलं. मूल जन्मजात हुशार. त्याच्यावर मेहनत घ्यायला नको. ग्रोथ पॉडला आधीच आपल्याला कसं मूल हवं ते सांगितलं की झालं. मग आयुष्यभर त्याच्या अभ्यासाकडे नाही लक्ष दिलं, धम्मकलाडू आणि चापटपोळ्या नाही दिल्या, गणितं सोडवून नाही घेतली, पाढे पाठ करून- कविता म्हणून नाही घेतल्या तरी चालेल, दहावी-बारावीच्या परीक्षेच्या वेळी सुट्ट्या नाही घेतल्या, तरी मूल मेरिटमध्ये येणार. पण त्याच्या जडणघडणीमध्ये आई-वडिलांचा सहभाग नसणार. हळूहळू मुलांच्या आयुष्यातली पालकांची गरज संपून जाणार.”

आणखी वाचा- नातेसंबंध: लहान भाऊ वयात येतोय?

साक्षीला वाटलं, खरंच की, आपल्याकडे टिपिकल मध्यमवर्गीय आई-वडील मुलांना वाढवायला किती मेहनत घेतात. तिला स्वतःचेच लहानपणीचे दिवस आठवले. बाबांनी छडी मारून शिकवलेली चक्रवाढव्याजाची गणितं आठवली. आईने निबंध लिहायला कसं शिकवलं ते आठवलं. अभ्यासाची शिस्त लावणारी आज्जी आठवली. आजारपणात रात्री जागून औषधं देणारे आजोबा आठवले. गरम गरम पेज, हळद घातलेलं दूध… आजही आजारी पडल्यावर आईच्या हातची पेज तिला आठवते. इथे तोही प्रश्न नाही. सुदृढ मुलंच जन्माला येणार म्हणजे- ‘पडू आजारी मौज हीच वाटे भारी’ नाहीच… तो आई-वडिलांशी ‘कनेक्ट’च संपून जाणार.

आणखी वाचा- Women’s Day 2023 : आकाशाला गवसणी घालणारी कॅप्टन कृतज्ञा

नीरजा म्हणाली, “आता आलीस मुद्द्यावर तू. आपल्याला ‘आवडीचं मूल’ जन्माला घालायच्या अट्टहासापायी मुलांच्या जडणघडणीतला आई-वडिलांचा सहभागच संपून जाईल. कारण मूल एवढं प्रगत असेल की, त्याला आई-वडिलांच्या मार्गदर्शनाची आणि अनुभवाची मदत लागणारच नाही आणि त्यामुळे त्यांच्यात कदाचित काही मायेचे बंध निर्माणच होणार नाहीत. मुलांचा बुद्ध्यांक वाढेल कदाचित, पण भावनिकदृष्ट्या मात्र ती कोरडी बनतील. संवेदनाशून्यता हेच येणाऱ्या काळातील मोठं संकट आहे.”

साक्षी म्हणाली, “खरंच,तशीच गरज असेल तरच या कृत्रिम गर्भाशयाचा वापर व्हायला हवा. आवडीच्या मुलाचा अट्टहास मात्र नको. पूर्वीपासून जी समाजव्यवस्था आहे… आई-वडिलांनी मुलांसाठी खस्ता खायच्या आणि नंतर मुलांनी आई-वडिलांच्या कष्टाला स्मरून आयुष्यभर त्यांचं ऋणी राहायचं हेच योग्य आहे.”

tanmayibehere@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is artificial uterus know about how this technology works mrj
First published on: 12-03-2023 at 16:54 IST