प्रश्न – दोन महिन्यापूर्वी आमचं लग्न झालं. लग्नानंतर किमान वर्षभर मूल होऊ देऊ नका, असा सल्ला आमच्या फॅमिली डॉक्टरांनी आम्हाला दिला आहे. हा सल्ला योग्य आहे का? वर्षभर मूल होऊ देणं टाळायचं असल्यास त्यासाठी काय उपाययोजना करावी याबद्दल माहिती द्यावी.
उत्तर – लग्नानंतरच्या सुरुवातीच्याकाळाला एक वेगळंच महत्त्व असतं. अनेकदा लग्न झालं असलं तरी दोघांना अजून एकमेकांबद्दल खूप गोष्टी समजून घ्यायच्या असतात. सासरचे लोक, घर, वातावरण यांत रुळायलाही काही काळ जाणार असतो. माहेरच्या आठवणीही अजून ताज्या असतात. मुख्य म्हणजे नवरा बायको म्हणून एकमेकांचे स्वभाव समजून घेण्यासाठी काही काळ द्यावा लागतो. त्यानुसार आयुष्याला नव्याने सुरुवात करायची असते. एकमेकांबरोबर काही वेळा ॲडजस्ट करावं लागतं. तर काही वेळा दोघांमधल्या पूरक गोष्टी शोधाव्या लागतात.
आणखी वाचा : लैंगिक समस्या प्रश्नोत्तरे – परस्त्रीचं आकर्षण ?
महत्वाचं म्हणजे लैंगिक संबंधांचा नवीन जीवनात नुकताच प्रवेश झालेला असतो. त्याचा अनुभव व्यवस्थित घेण्याआधी अचानक गर्भधारणा झाली, तर नवविवाहित दांपत्य गर्भगळीतच होऊन जातं. मातृत्व व पितृत्व या मोठ्या जबाबदाऱ्या आहेत. त्या जबाबदारीने पार पाडणं आवश्यक असतात. त्या पार पाडण्याची मानसिक व शारीरिक तयारी नसताना गर्भधारणा होणं टाळायचं असेल, तर त्याचा एकमेव मार्ग म्हणजे गर्भप्रतिबंधक उपायांची माहिती असणं.
आणखी वाचा : लैंगिक समस्या प्रश्नोत्तरे – गर्भनिरोधक गोळ्या घेताय? काळजी घ्या
समागमाचं सुख घेता यावं, पण गर्भधारणा मात्र होऊ नये; यासाठी विज्ञानाने अनेक उपाय शोधून काढले. यांनाच गर्भप्रतिबंधक (Contraception) किंवा संततीनियमन (birth control methods) असं म्हणतात. नवदांपत्यांनी वापरावेत असे तीन प्रकार आहेत. एक म्हणजे पुरुषांनी वापरायचा कंडोम, दुसरा म्हणजे स्त्रीने पोटात घ्यायच्या गर्भनिरोधक गोळ्या व तिसरा प्रकार म्हणजे संभोगाच्या वेळेस योनीमार्गात ठेवायच्या शुक्रजंतूनाशक गोळ्या.
यातला कशाचा वापर करायचा याचा तुम्ही तारतम्याने विचार करायला हवा किंवा डॉक्टरांचा सल्ला घेणे जास्त योग्य असते.