अर्चना मुळे

“ हाय, झाला का माझा वनपीस?” नीताने ड्रेस डिझायनर कृतिकाकडे वनपीस शिवायला टाकला होता, खास पार्टींमध्ये वापरण्यासाठीचा. “हो, कधीच तयार झालाय. ट्रायल करून बघा म्हणजे मी लगेच फिटिंग करून देते.” कृतिका म्हणाली.

loksatta ulta chasma
उलटा चष्मा: होऊ द्या ध्वनिप्रदूषण!
Can zero soda or soda water be good for you?
गरम होतंय म्हणून गारेगार सोडा पिताय? सावधान! आरोग्यावर होतील दुष्परिणाम
Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र

“अरे व्वा! किती मस्त! तू माझ्या अपेक्षेपेक्षा लवकर शिवलास. दाखव लवकर.” “हो दाखवते. किती गडबड कराल. तुमची उत्सुकता बघून मलाही तुम्हाला या ड्रेसमध्ये कधी एकदा बघेन असं झालंय. हा घ्या. तिकडे ट्रायल रूम आहे.” “सुपरडुपर झालाय हां अगदी. माझ्यासाठी व्हेरी स्पेशल.” “एक सुचवू का… या बाहीला ना थोडं आतून आवळून घेते. त्यामुळे ना हाताचा शेप आणखी परफेक्ट होईल. करू का?” “चालेल काय, आवडेल. हा ड्रेस मला इतका आवडलाय ना. काय सांगू? हे घे पटकन करून दे. मी आत्ता बरोबर घेऊनच जाणार आहे.” “ओके चालेल. लगेच देते.”

पाच मिनिटांनी… “हा घ्या… फायनली युवर ड्रेस इज रेडी. हा तुमचा वनपीस.” “मी परत एकदा घालून बघते.” “खूपच सुंदर दिसतोय तुम्हाला.” “नुसतं सुंदर काय म्हणतेस. चार-पाच फोटो काढ ना… आज मैत्रिणींना जरा चिडवते.” “हे बघा फोटो…” “फोटोही सुंदरच आलेत. थांब हं… यातले हे दोन फोटो लग्गेच आमच्या मैत्रिणींच्या ग्रुपवर टाकते. आज मला खूप भाव मिळणार आहे, मला माहीत आहे ना एकेकीचा स्वभाव.”

त्या सुंदरशा वनपीसची फॅशन डिझायनर कृतिकाने छानशी घडी घातली. एका सुंदर डिझायनर बॅगमध्ये तो ठेवला आणि नीताला म्हणाली, “ नीता, हा तुमचा ड्रेस आणि हे माझं बिल.” “व्हाॅट? ३००० रुपये? एका ड्रेसचे? इतकं कुठं बिल असतं का? असं काय वेगळं शिवलंस तू. तू खूप जास्त घेते आहेस बिल. एवढे मी देणार नाही. फार फार तर २००० रुपये देईन.”

“अहो ताई, आत्ता तर म्हणालात ना… भारी झालाय. स्पेशल झालाय. सगळे खूप भाव देतील. मग बिल दिल्यावर लगेच त्यातील वेगळेपण गेलं का?” “तसं नाही, पण शिलाई एवढी कुठं असते?” “शिलाई जिथं कमी असते तिथून पुढच्या वेळी तुम्ही शिवून घ्या. आत्ता माझे पैसे द्या.”

“तुझी नेहमीची क्लायंट आहे ना मुग्धा, तिने मला तुझा रेफरन्स दिला. ती माझी खूप चांगली मैत्रीण आहे. तिने सांगितलं म्हणून मी तुझ्याकडे आले आणि म्हणून शिलाई किती घेणार हे विचारलंच नाही. मला वाटलं, तू फार फार तर दीड हजार रुपये घेशील. मी वाटलं तर दोनशे रुपये वाढवते त्यापेक्षा जास्त नाही देणार.”

“अहो ताई, हा काय भाजीबाजार आहे का बार्गेनिंग करायला. मी फॅशन डिझायनर आहे. कपडे तर चांगले, युनिक हवेत; पण त्यासाठी पैसे द्यायची तयारी नाही असं कसं चालेल? या तुमच्या वनपीसच्या युनिकनेससाठी मी रात्र रात्र जागून डिझाइन ठरवलंय. परफेक्ट फिटिंगसाठी माझं कौशल्य पणाला लावलंय. मनापासून शिवलाय म्हणून हा एवढा स्पेशल झालाय. सो प्लीज. नो बार्गेनिंग.”

नीता एकदम विचारात पडली. चूक तिचीच होती. फॅशन डिझायनरकडे कपडे शिवायला टाकणं आणि गल्लीतल्या टेलरकडे देणं यात खूप फरक आहेच ना. आपल्याला छान ड्रेस हवाय तर किंमत मोजावीच लागणार. योग्य मापात न शिवल्याने टेलरकडे नेहमी होणारा घिसापिटा वाद टाळायचा असेल तर त्याची वेगळी किंमत मोजावी लागणारच. शिवाय सर्वसामान्य टेलर सरसकट इतरांसारखा ड्रेस शिवणार, तर ड्रेस डिझायनर युनिक ड्रेस शिवणार, एस्क्लुझिव्ह. त्याची किंमत मोजावीच लागणार. कृतिकाची त्यामागची मेहनत, विचार, चांगला ड्रेस शिवण्याची कळकळ या सगळ्याचे ते पैसे आहेत. ते तिला द्यायला हवेतच.

नीताला ते मनोमन पटलं आणि तिने कृतिकाचा हात हातात घेऊन सांगितलं, “सॉरी, माझीच चूक आहे. मी सुरुवातीला शिलाईची किंमत विचारली नाही आणि डिझायनर ड्रेसची किंमत तेवढी असणार ते माझ्या लक्षात आलं नाही. असो. तुझ्या मेहनतीचं फळ तुला मिळालं पाहिजेच. हे घे ३ हजार रुपये. छान शिवला आहेस हं!”

नीताच्या या अकस्मात बदललेल्या पवित्र्याने कृतिकाही शांत झाली. म्हणाली, “ठीक आहे. तू मुग्धाची मैत्रीण आहेस आणि माझ्याकडे पहिल्यांदा आलीस, त्यामुळे ५०० रुपये कन्सेशन देते या वेळी. पुढच्या वेळी मात्र पूर्ण पैसे घेईन हं!”

दोघी हसल्या. नीता मजेत निघाली. आपला ड्रेस बघून कोण कोण जळणार याचं कल्पनाचित्र रंगवू लागली.

लेखिका सांगली येथे समुपदेशक आहेत.

archanamulay5@gmail.com