स्त्री किंवा महिला मग ती कोणत्याही समाजातील असो वा देशातील; तिच्या तिच्या पदरी कोणती कामे असावी हे पूर्वीच्या काळात तिच्या जन्माच्या वेळेसच निश्चित होत होते. मात्र आज काळ बदलला, तरी तिच्या या भूमिकेकडे एका विशिष्ट चष्म्यातूनच पाहिले जाते. मग ती स्त्री ही आपली आद्य आजी का असेना, संशोधकांनी तिलाही त्याच भूमिकेत पाहिले. गेल्या अनेक दशकांपासून इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये मानवी उत्क्रांतीच्या इतिहासात हजारो वर्षांपूर्वी पुरुषच प्राण्यांची शिकार करायचे तर स्त्रिया फळे आणि सरपण गोळा करायच्या तसेच मुलांचे पालनपोषणही स्त्रियांकडे असायचे असे नमूद करण्यात येते. या संकल्पनेचे वर्णन ‘मॅन, द हंटर’ असे करण्यात येते. परंतु गेल्या काही दशकांमध्ये अनेक अभ्यासकांनी या संकल्पनेला आव्हान दिले आहे. मूलतः ‘मॅन, द हंटर’ या संकल्पनेमागे जैविक वैशिष्टयांनुसार पुरुष आणि स्त्रिया यांच्या कामाची श्रमविभागणी केली जाते असा युक्तिवाद केला जातो. त्यामुळे विशिष्ट व्यवसाय, भूमिका लिंगाच्या भिन्नतेनुसार ठरते असा तर्क केला जातो. अलीकडेच दोन नव्या संशोधकांनी पुरुषांप्रमाणेच मोठ्या प्राण्यांच्या शिकारीत स्त्रियाही सहभाग घेत होत्या आणि त्यांच्या नैसर्गिक जैविक वैशिष्ट्यांचा फायदा करून घेत होत्या असे गृहितक मांडले आहे, त्याविषयी…

‘मॅन, द हंटर’

मानववंशशास्त्रज्ञ रिचर्ड बोर्शे ली आणि इर्व्हन डेव्होर यांच्या संशोधनावर आधारित, १९६० च्या दशकात ‘मॅन, द हंटर’ या सिद्धांताला महत्त्व प्राप्त झाले. या सिद्धांतानुसार प्राण्यांच्या शिकारीमुळे मानवी समाजात अनेक उत्क्रांतीशी संबंधित घडामोडी घडल्या. २००७ मधील ‘नॅशनल जिओग्राफिक’ च्या लेखात स्पष्ट केल्याप्रमाणे “मॅन-द-हंटर सिद्धांतानुसार, आपल्या शरीरशास्त्राचा बराचसा भाग शिकारीसाठी अनुकूल होता. शिकारीसाठी आवश्यक ती शरीररचना आणि मानसशास्त्र अनुकूल होते, शिकार हेरण्यासाठी उंच ठिकाणी उभे राहावे लागेल, शस्त्रे तयार करावी लागतील याच अनुषंगाने मानवी शरीराने आकार घेतला. परंतु त्यानंतरच्या संशोधनात या सिद्धांताला आव्हान देण्यात आले. यापूर्वीच्या संशोधनात महिलांच्या भूमिकेकडे दुर्लक्ष केले गेले, यामागील कारण म्हणजे महिलांना शिकारी म्हणून गणलेच गेले नाही, असे मत नवीन संशोधनात मांडण्यात आले आहे. अलीकडेच अमेरिकन संशोधकांनी केलेल्या अभ्यासात जगभरातील ६३ चराऊ समाजांचे विश्लेषण करण्यात आले. त्यात ७९ टक्के महिला शिकारी असल्याची नोंद करण्यात आली आहे. जीवशास्त्रानुसार गर्भधारणा आणि मासिक पाळी यावेळी मात्र स्त्रिया शिकारीत सहभागी होण्याचे प्रमाण अल्प होते.

अधिक वाचा: स्त्रियांचे अश्रू पुरुषांमधील आक्रमकता खरंच कमी करतात? काय सांगते नवीन वैज्ञानिक संशोधन… 

शिकारीमध्ये महिलांच्या भूमिकेबद्दल नवीन संशोधन काय सांगते?

डेलावर विद्यापीठातील जैविक मानववंशशास्त्रज्ञ सारा लेसी आणि नोट्रडॅम विद्यापीठातील जीवशास्त्रज्ञ कारा ओकोबॉक यांनी महिला शिकारींच्या भूमिकेवर प्रकाश टाकणारे दोन शोधनिबंध सप्टेंबरमध्ये अमेरिकन मानववंशशास्त्रज्ञांच्या जर्नलमध्ये प्रकाशित केले. त्यांनी या लेखांमध्ये पॅलेओलिथिक युगाविषयी (२.५ ते १०,०० दशलक्ष वर्षांपूर्वी) चर्चा केली आहे. या काळात मानवाने शेती करण्यापूर्वीच झोपडीत राहण्यास सुरुवात केली, त्यामुळे याच कालखंडात मानव स्थिर समाजरचनेकडे वळला, असे त्यांनी शोधनिबंधात म्हटले आहे. संशोधकांनी ‘वुमन, द हंटर’ या सिद्धांताच्या पडताळणीसाठी साठी फिजियोलॉजिकल आणि पुरातत्वशास्त्रीय दृष्टीकोनातून संशोधन केले आहे.

शरीरक्रियाविज्ञान (फिजियोलॉजिकल) संशोधन

नवीन संशोधनात केलेल्या युक्तिवादाप्रमाणे सरासरी, स्त्रीच्या शारीरिक क्षमतांबद्दल इस्ट्रोजेन हार्मोनची भूमिका विचारात घेतली जात नाही. परंतु अभ्यास असे दर्शवितो की स्त्रियांचे चयापचय त्यांना चपळता देते, जे त्यांना उत्तम धावण्यासारख्या प्रक्रियांमध्ये फायदेशीर ठरते, त्यांच्या याच वैशिष्ट्यांचा उपयोग भूतकाळातील त्यांची भूमिका समजून घेण्यासाठी होऊ शकतो. संशोधकांनी बायोलॉजिकल दृष्टिकोनातून, मादी आणि नर यांच्यात फरक आहे हे मान्य करून आपला सिद्धांत मांडला आहे, १ नोव्हेंबर रोजी ‘सायंटिफिक अमेरिकन’मधील शोधनिबंधात, त्यांनी म्हटल्याप्रमाणे, “स्त्रिया चयापचयदृष्ट्या सहनशक्तीच्या कार्यांमध्ये (वेगाने चालणे किंवा जॉगिंग करणे, अंगणातील काम, नृत्य, पोहणे, दुचाकी चालवणे, पायऱ्या किंवा टेकड्या चढणे, टेनिस किंवा बास्केटबॉल खेळणे) अधिक अनुकूल असतात, तर पुरुष लहान, शक्तिशाली बर्स्ट- प्रकारच्या कार्यांमध्ये उत्कृष्ट असतात. हा फरक बहुतेक इस्ट्रोजेन संप्रेरकांच्या शक्तींमुळे असतो असे दिसते.

इस्ट्रोजेन पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त तयार होते. तर, पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन अधिक असते, हे स्नायूंच्या वाढीशी संबंधित आहे. प्रजनन प्रणालीचे नियमन करण्यास मदत करण्याव्यतिरिक्त, इस्ट्रोजेन सूक्ष्म- मोटर नियंत्रण आणि स्मरणशक्तीवर प्रभाव पाडते, न्यूरॉन्सची वाढ आणि विकास दर्शवते आणि रक्तवाहिन्या कडक होण्यास प्रतिबंध करण्यास मदत करते, असेही या संशोधतात म्हटले आहे. ते चयापचय देखील सुधारते. म्हणून, व्यायामादरम्यान, इस्ट्रोजेन शरीराला कर्बोदकांच्या आधी संचयित चरबी वापरण्यास प्रोत्साहित करते. चरबीमध्ये कर्बोदकांपेक्षा प्रति ग्रॅम जास्त कॅलरीज असतात, त्यामुळे त्या हळूहळू कमी होतात, ज्यामुळे सहनशक्तीच्या कार्यादरम्यान थकवा उशिरा येऊ शकतो.” उदाहरण म्हणून, संशोधकांनी अभ्यास उद्धृत केला, ज्यात असे दिसून येते की पुरुषांच्या तुलनेत व्यायामानंतर स्त्रियांचे स्नायू तुटण्याचे प्रमाण कमी असते.

अधिक वाचा: Indira Gandhi:इंदिरा गांधी गुंगी गुडिया ते दुर्गा: अटलजी खरंच म्हणाले होते का दुर्गा? नेमका वाद काय आहे?

पुरातत्वशास्त्रीय दृष्टिकोन

पुरूष आणि मादी यांचे दफन अवशेष आणि ते करण्याचे तंत्र देखील त्या काळातील समाजावर प्रकाश टाकते. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, आपले जवळचे पूर्वज निअँडर्थलं त्यांच्या जखमा व दुखापती लैंगिकतेतील भिन्नता दर्शवत नाहीत. इतकेच नाही तर स्त्री-पुरुष दोघेही मोठ्या प्राण्यांवर हल्ला करण्यापासून ते चामडं कमावण्यापर्यंत दोन्ही कामे करत होते. ४५,००० ते १०,००० वर्षांपूर्वी, नराच्या उजव्या हाताच्या कोपऱ्याच्या भागात मोठ्या प्रमाणात जखमा आढळतात, या जखमा भाले फेकण्याच्या क्रियेची वारंवारता दर्शवतात. “परंतु याचा अर्थ असा नाही की, स्त्रिया शिकार करत नव्हत्या, कारण हा काळ असा आहे, मनुष्याने धनुष्य आणि बाण, शिकारीची जाळी आणि मासेमारीचे हूक शोधले,” असे त्यांनी नमूद केले, त्यामुळे शिकारीसाठी वेगवेगळ्या पद्धती वापरल्या गेल्या असाव्यात. पुढे, ३५,००० ते १०,००० वर्षांपूर्वी स्त्रिया आणि पुरुषांना त्याच प्रकारे दफन केले गेले आणि त्याच प्रकारच्या कलाकृतींसह दफन केले गेले, हे देखील भिन्नतेचा अभाव सूचित करते.

काय बदलले?

“सुमारे १०,००० वर्षांपूर्वी शेतीचा शोध लागला, ज्यामध्ये जमिनीतील सखोल गुंतवणूक, लोकसंख्या वाढ आणि परिणामी त्यात गुंतलेली संसाधने समाविष्ट होती, ज्यामुळे लैंगिक भूमिका घेण्यास सुरुवात झाली असावी आणि त्याचवेळेस आर्थिक असमानता निर्माण झाली असावी.” परंतु १९६० पासून, झालेल्या संशोधनात असे आढळून आले आहे की, हजारो वर्षांपूर्वीची शिकारीची साधने, हत्यारे स्त्री दफन संचांमध्ये सापडली आहेत. कॅलिफोर्निया विद्यापीठातील, डेव्हिस यांच्या २०२० सालच्या अभ्यासात असे आढळून आले की अमेरिकेतील दफन नोंदींचे विश्लेषण करताना ३० टक्के ते ५० टक्के शिकारी महिला होत्या. त्यानंतर नवीन अभ्यासांनी वाढत्या पुराव्यांमध्ये भर घातली आहे, ज्याचा मूळ उद्देश आधुनिक काळातील पूर्वग्रह सुधारणे हा आहे.