महिला आज प्रत्येक क्षेत्रात आपल्या ठसा उमटवित आहेत. विविध क्षेत्रात उच्च पदावर महिलांनी आपली मोहोर उमटवली आहे. करिअरमध्ये प्रगती साधल्याने महिला आता बऱ्यापैकी अर्थसाक्षर झाल्या आहेत. जागतिक श्रीमंत उद्योजकांच्या यादीत अनेक महिलांचा समावेश आहे. तर, स्लिंगोने केलेल्या एका सर्वेक्षणातून २०२४ पर्यंत जगभरातील महिला व्यावसायिकांची यादी जाहीर केली आहे. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
सर्वाधिक श्रीमंत महिलांच्या यादीत पहिल्या तीन महिला कोण?
८०.५ अब्ज डॉलर संपत्तीसह फ्रँकोइस बेटेनकोर्ट मेयर्स (आणि कुटुंब) या यादीत अग्रस्थानी आहेत. फ्रँकोइस बेटेनकोर्ट मेयर्स या L’Oréal च्या संस्थापकाच्या नातू आहेत. त्यांना कंपनीची संपत्ती वारसाहक्काने मिळाली, त्यामुळे त्या जगातील सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीत आहेत.
५९ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह ज्युलिया कोच (आणि कुटुंब)दुसऱ्या क्रमांकावर आहेत. कोच इंडस्ट्रीजच्या बोर्ड सदस्या असून त्या समूहाच्या कामकाजात प्रामुख्याने लक्ष ठेवतात. कोच इंडस्ट्रीजचे कागद निर्मितीपासून तेल शुद्धीकरण कारखाने असून ज्युलिया कोच यांनी या सर्व उद्योगात लक्षणीय कामगिरी केली आहे.
वॉलमार्टच्या अॅलिस वॉल्टन या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती ५६.७ अब्ज डॉलर्स एवढी आहे.
कोणत्या क्षेत्रात महिलांचा दबदबा?
पहिल्या तीन श्रीमंत महिलांपैकी दोन महिला या फॅशन आणि किरकोळ व्यवसायाशी संबंधित आहेत. या यादीतील काही श्रीमंत महिलांमध्ये व्यावसायिक महिला सँड्रा ओर्टेगा मेरा आणि लव्हच्या ट्रॅव्हल स्टॉप्स अँड कंट्री स्टोअर्सच्या सह-संस्थापक, जुडी लव्ह यांचाही समावेश आहे.
महिला अब्जाधीशांसाठी दुसऱ्या क्रमांकाची सर्वात लक्षणीय निव्वळ संपत्ती असलेला उद्योग म्हणजे कॅसिनो. या क्षेत्रातून महिलांची सरासरी २०.८ बिलिअन डॉलर संपत्ती आहे. या उद्योगातील दोन महिला म्हणजे मिरियम एडेलसन आणि डेनिस कोट्स आहेत.
टॉप ५० श्रीमंत महिलांच्या यादीत फक्त दोन महिला लॉजिस्टिक क्षेत्राशी संबंधित आहेत. या क्षेत्रात चांगला नफा असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे लॉजिस्टिक क्षेत्र या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
कोणत्या देशात सर्वाधिक श्रीमंत महिला?
सर्वाधिक श्रीमंत महिला कोणत्या देशात आहेत याचा विचार केल्यास २३ अब्ज डॉलर संपत्तीसह फ्रान्स आघाडीवर आहे. म्हणजेच, फ्रान्समध्ये सर्वाधिक श्रीमंत महिला आहेत. मेरी बेस्नियर ब्युवालोटसारख्या महिला फ्रान्सच्या आर्थिक क्षेत्रात योगदान देतात.
दुसऱ्या स्थानावर युनायटेड स्टेट्स आहे. या देशाची सरासरी निव्वळ १६ अब्ज डॉलर इतकी आहे. ज्युलिया कोच आणि ॲलिस वॉल्टनसारख्या आघाडीच्या महिलांचा देशाच्या आर्थिक प्रगतीत हातभार आहे. तर, तिसरा क्रमांक भारताचा आहे. भारतातील श्रीमंत महिलांकडे १२.३ अब्ज डॉलर इतकी संपत्ती आहे. सावित्री जिंदालसारख्या महिला भारताच्या वाढत्या आर्थिक प्रगतीचं प्रतिनिधित्व करतात.