जुलै महिना स्त्रियांशी संबंधित अनेक घटनांमुळे चर्चेत राहिला. मणिपूरची घटना असो, ज्योती मौर्य, सीमा हैदर, अंजू असो. एकीकडे महिला पुरुषांच्या वासनांच्या बळी ठरत आहेत, तर दुसरीकडे त्या स्वतःचे वेगळे विश्व निर्माण करू पाहत आहेत. सर्व बंधने झुगारून परदेशातील प्रियकराकडे जात आहेत. परंतु, अशी काय परिस्थिती निर्माण होते किंवा अशी कोणती वेळ येते की त्या आपला संसार सोडून थेट परदेशातील प्रियकराकडे जातात. आपली अपत्येही सोबत घेऊन जातात आणि त्यांच्या या कृतीबद्दल घरच्यांना काही माहीतही नसते. या घटनांमागे कोणती कारणे असण्याच्या शक्यता आहेत, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

भारतीय स्त्री ही सुसंस्कृत, कर्तबगार, बुद्धिमान आणि अष्टपैलू असते, असे चित्र प्राचीन काळापासून दिसून येते. विवाहित स्त्रीला तर गृहलक्ष्मीचे स्थान दिलेले आहे. एकूणच घरातील महत्त्वाची व्यक्ती ही घरातील स्त्री असते. संसार सुरू असताना, पोटी अपत्ये असताना, जबाबदारी असताना देशाच्या सीमा ओलांडून, घरच्यांना न सांगता काही स्त्रिया प्रियकराकडे जातात. अर्थातच अभिव्यक्तिस्वातंत्र्य प्रत्येकालाच आहे. या स्त्रिया थेट परदेशात गेल्या, म्हणून चर्चेत आल्या. जून महिन्यात दिल्ली उच्च न्यायालयाने एका खटल्याची सुनावणी करताना त्या स्त्रीला नवऱ्यासह नव्हे, तर प्रियकरासह राहण्याची परवानगी दिली. देशांतर्गतही विवाहानंतर नवीन नाते निर्माण करण्याच्या भावना महिलांमध्ये असल्याचे दिसते. केवळ महिलाच नव्हे, तर पुरुषही विवाहानंतर चौकटीबाहेरील संबंध निर्माण करत असतात. विवाह या संस्थेच्या सीमा ओलांडणाऱ्या या घटना का निर्माण होतात ?

हेही वाचा : मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न धिंड; समाजात अशी विकृती येते कुठून ? प्रत्येक वेळी शिक्षा महिलांनाच का ?

सीमा, अंजू : काय असू शकतात कारणे ?
सीमा, अंजू यांच्या घटना बघताना असे दिसते की, त्यांची ओळख ही ऑनलाईन स्वरूपात झाली आहे. ऑनलाईन गेम्स असो किंवा समाजमाध्यमे असो. यातून ओळख होऊन, संवाद होऊन, त्याचे रूपांतर प्रेमामध्ये झालेले दिसते. याच प्रेमाखातर या स्त्रिया देशाच्या सीमा ओलांडून गेल्या. ऑनलाईन डेटिंग, समाज माध्यमांमधून होणाऱ्या मैत्रीचे मुख्य कारण म्हणजे हातात आलेले तंत्रज्ञान, माहीत नसलेल्या गोष्टींचे असणारे कुतूहल, नवीन गोष्टींकडे वाटणारे आकर्षण आणि आताच्या स्थितीपेक्षा पुढील काळ प्रेमाचा, सुखाचा असेल अशी आशा…
मोबाईल, इंटरनेट यामुळे सगळे जग हातात आले आहे. तंत्रज्ञान हा दुधारी शस्त्र आहे. तंत्रज्ञानाचे फायदेही आहेत. एका जागी बसून आपण परदेशातील व्यक्तींशी सहज संवाद साधू शकतो. फोटो शेअर करू शकतो. व्हिडीओ कॉलवर संवाद साधू शकतो. पण, याच तंत्रज्ञानाचा गैरवापर आयुष्य बदलवू शकतो. हा गैरवापर इन्स्टाग्राम, फेसबुकवरील प्रेमप्रकरणे, या माध्यमांवरील मैत्रीतून झालेले लैंगिक अत्याचार, आत्महत्या, क्षुल्लक कारणांवरून झालेले खून या घटनांमध्ये परावर्तित होतात. श्रद्धा वालकर हीसुद्धा एका डेटिंग ऍपद्वारे पुनावालाला भेटली होती, पुढे त्या तथाकथित प्रेमाचे ३६ तुकडे झाले. इन्स्टाग्राम, फेसबुक ही अलिबाबाची अद्भुत गुहा आहे, असे समजून अनेक त्याच्यामध्ये प्रवेश करतात. प्रत्येक गोष्टींचे स्नॅप , रिल्स बनवले जातात. खरा चेहरा लपवून फिल्टर्स लावलेले सुंदर सुंदर फोटो अपलोड केले जातात. या फोटोंवर स्तुतिसुमनांचा वर्षाव होतो. मग, ‘घरच्यांना आपली किंमतच नाही, बाहेरचे सगळे माझे कौतुक करतात’ अशी एक भावना निर्माण होते. ती ‘फिल्टर्स’मुळे मिळालेल्या कमेंट्स, समोरच्या व्यक्तीने दाखवलेली काहीशी सहानुभूती, प्रेमाचे काही शब्द मनाला दिलासा देतात. वास्तवात जगत असणाऱ्या जीवनमानापेक्षा समोरच्या व्यक्तीकडे अधिक चांगले जीवन आहे, जीवनावश्यक गरजा भागू शकतात, अशी भावना निर्माण होते. विवाहानंतर निर्माण होणाऱ्या अन्य नात्यांमध्ये ज्याला समाज विवाहबाह्य संबंध म्हणतो, त्यामध्ये सहानुभूती, प्रेमाचे चार शब्द, प्रेमाच्या आणाभाका, आमिषे, दाखवलेली स्वप्ने या सर्वांवर भावनिकदृष्ट्या विश्वास ठेवला जातो. हाती आलेले तंत्रज्ञान, सर्व माहितीची उपलब्धता याचा वापर केला जातो. सीमा हैदरला पाकिस्तानातून थेट भारतात येऊ शकत नाही, हे माहीत होते. पण, ती नेपाळमार्गे भारतात आलीच.

हेही वाचा : राजकीय नेते ‘बडव्यां’चा उल्लेख करतात, हे ‘बडवे’ म्हणजे कोण ? काय आहे बडव्यांचा इतिहास


सीमा हैदर आणि राजस्थानमधील अंजू यांना घरातून मानसिक त्रास होत होता. अंजूने सांगितल्यानुसार, तिचे तिच्या पतीसह चांगले संबंध नव्हते आणि ती पतीपासून विभक्त होणार आहे. या घटनांमध्ये घरी समाधानी वातावरण नव्हते, असेच दिसते. ऑनलाईन गेम, समाज माध्यमे यांचा वापर विरंगुळा म्हणून केला जाऊ लागला. त्यातून वाढलेले संपर्क, निर्माण होणाऱ्या नवीन ओळखी, ‘शेअरिंग’, नवीन व्यक्तीशी बोलताना वाटणारे कुतूहल या सगळ्यातून ओळख मैत्रीत रूपांतरित होते. पुढे ती ज्याला हे लोक प्रेम म्हणतात त्या प्रेमात रूपांतरित होते. प्रेम हा फारच सामान्य शब्द झालेला आहे. ती शाश्वत, निर्मळ भावना आहे, या गोष्टीलाच तडा जाऊन चार-पाच वेळा, काहींना एकावेळी अनेकांविषयी प्रेम वाटू लागले आहे. संसाराचे किंवा वास्तवाचे चटके बसू लागले की, हे प्रेमाचे रंग फिके पडू लागतात. अंतिमतः आहे त्या दुःखापासून दूर जाणे हे एक कारण आहे. दुसरे म्हणजे हातात आलेले तंत्रज्ञान, नावीन्याचे कुतूहल, नवीन संधी, भावनिक गुंतागुंत.

हेही वाचा : गटारी अमावस्येला कोकणाने पाहिलेले ‘ते’ २ अपघात; करुण अंताची कहाणी…

अपत्यांसह जाण्याचे काय कारण असू शकते ?

सीमा हैदर आणि अंजू यांनी आपल्या मुलांना घेऊन देशाच्या सीमा ओलांडल्या. काही घटनांमध्ये स्त्रिया आपल्या मुलांसह प्रियकराकडे जातात. यामागे दोन कारणे असू शकतात. एक म्हणजे, मुलांशी असणारी जवळीक, भावनिक जोड, आईपणाची जाणीव आणि जबाबदारी, मुलांची काळजी. दुसरे म्हणजे नकारात्मक कारण म्हणजे लहान मूल सोबत असल्यावर मिळणारी सहानुभूती. एवढ्या लांबच्या प्रवासात लहान मुलांना घेऊन जाणे सोपे नाही. लहान मूल आहे म्हटल्यावर माणुसकीच्या नात्याने लोक सभ्य वागतात, मदत करतात, राहण्यास-खाण्यास देतात. मुलांचा अशाही प्रकारे वापर केला जाऊ शकतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अभिव्यक्तिस्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. आपले जीवन कसे जगावे, हे प्रत्येक व्यक्ती ठरवू शकते. पण, समाजाला एक साचेबंद स्वरूप दिलेले असताना त्या चौकटीच्या बाहेर जाणाऱ्या व्यक्ती चर्चेचा भाग ठरतात. तशाच या सीमा आणि अंजूची चर्चा झाली. एखादी घटना घडली की, तिची पुनरावृत्ती समाजात घडू लागते. त्यामुळे सीमा आणि अंजूने केलेले धाडस बघून अजून सीमा तर तयार होणार नाही ना, अशी शंका वाटते…