सामान्यतः ट्रक ड्रायव्हरचे काम फक्त पुरुषच करतात. त्यांचे जीवन अनेक अडचणींनी भरलेले असते. अनेक दिवस कुटुंबापासून दूर राहावे लागते. त्यामुळे अशा कामापासून महिला चार हात लांबच असतात. पण, अशीही एका महिला आहे जी या क्षेत्रातही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करते. विविध क्षेत्रांत महिला आता उत्तरोत्तर प्रगती करताना दिसत आहेत. अगदी देशसेवेपासून ते हवाई दलापर्यंत सर्वच क्षेत्रात त्यांनी उत्तम प्रगती करत आपले अव्वल स्थान पटकावले आहे. आतापर्यंत महिलांच्या हाती रिक्षा आणि एसटीचे स्टिअरिंग आल्याचे आपण पाहिले. आता त्यापाठोपाठ महिलेच्या हाती ट्रकचे स्टिअरिंग आल्याचे समोर आले आहे. कोलकात्यामधील ४० वर्षीय महिला अन्नपूर्णाणी राजकुमार ही तमिळनाडू ते बांगलादेश असं सुमारे १००० किमीचं अंतर कापत बॉर्डरवर पोहचली. बांगलादेशापर्यंत ट्रक चालवत पोहचणारी ही पहिली महिला ट्रकचालक ठरलीय. तमिळनाडूतून १० दिवस ड्रायव्हिंग करून ती बांगलादेशपर्यंत पोहचली आहे.
लॅण्ड पोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाचे व्यवस्थापक कमलेश सैन सांगतात, अन्नपूर्णाणी शनिवारी रात्री विशाखापट्टणममधून कापसाने भरलेला ट्रक घेऊन पेट्रापोलला पोहोचल्या. हा दहा दिवसांचा प्रवास अन्नपूर्णाणी यांच्यासाठी सोपा नव्हता. राष्ट्रीय महामार्गावरून गाडी चालवताना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. एक तर महिलांसाठी स्वच्छतागृहे नाहीत. रस्त्याच्या कडेला असलेल्या ढाब्यांमध्ये खोली मिळणे तिच्यासाठी अवघड होते, कारण तिथे मोठ्या प्रमाणात पुरुष असतात. अशाच एखाद्या महिलेला खोली देणे हे त्यांच्यासाठी अवघड होते. तसेच ज्या ठिकाणी ड्रायव्हर्स साधारणपणे राहतात आणि विश्रांती घेतात अशा ठिकाणी तिला प्रवेश करण्याची परवानगी नव्हती, असे सैनी यांनी सांगितले.
हेही वाचा >> मुकेश अंबानींच्या १५ हजार कोटींच्या अँटिलियापेक्षा मोठ्या निवासस्थानात राहते ‘ही’ महिला; तर नवरा आहे…
ते पुढे म्हणाले की अन्नपूर्णाणी यांना महिलांसाठी असलेल्या एलपीएआय मानदंडांचे पालन करून सीमा ओलांडण्यासाठी परवानगी देण्यात आली. “आम्ही बांगलादेश अधिकाऱ्यांना तिच्या ट्रकमधून कापूस उतरवण्याची त्वरित व्यवस्था करण्याची विनंती केली होती. बांगलादेशनेही तिला विशेष वागणूक दिली आणि जिथे ट्रक अनेकदा रांगेत उभे असतात, तिथे अन्नपूर्णाणी यांच्या ट्रकमधून कापूस उतरवण्याची त्वरित व्यवस्था करण्यात आली. दरम्यान, कमलेश सैन सांगतात की, “आम्ही आता महिलांसाठी सुविधा सुधारत आहोत, कारण आम्हाला लिंगभेद दूर करायचा आहे, जेणेकरून महिला या क्षेत्रात सामील होऊ शकतील. “