26 May 2020

News Flash

पंचषक!

विश्वचषकावर अखेर ऑस्ट्रेलियाच्याच संघाने मोहोर उमटवत ‘आमच्यासारखे आम्हीच’ असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले व क्रिकेट जगताने या विश्वविजेत्यांना कुर्निसात केला.

| March 30, 2015 12:45 pm

विश्वचषकावर अखेर ऑस्ट्रेलियाच्याच संघाने मोहोर उमटवत ‘आमच्यासारखे आम्हीच’ असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले व क्रिकेट जगताने या विश्वविजेत्यांना कुर्निसात केला. आयसीसीच्या संदेशाला साजेशीच कामगिरी करत ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला सात विकेट्स राखून सहजपणे नमवले आणि पाचव्यांदा विश्वचषक जिंकण्याची किमया साधली.
अंतिम फेरीत कोणतेही आश्चर्याचे धक्के बसले नाहीत, कारण ऑस्ट्रेलियाच्या संघाने पूर्णपणे व्यावसायिक खेळ करत आम्हीच जगज्जेतेपदाचे वारसदार असल्याचे दाखवून दिले. पहिल्याच षटकापासून आक्रमकपणा, जिद्द आणि विजिगीषूवृत्तीचा उत्तम वस्तुपाठ पेश करत स्टीव्हन स्मिथच्या चौकारानिशी ऑस्ट्रेलियाने विश्वचषकाला गवसणी घातली. समोर कुठलाही संघ असो, कुठलाही सामना असो आम्ही जिंकण्यासाठीच खेळणार या ईष्र्येने, तडफेने लढाऊ वृत्तीच्या जोरावर सरस खेळ करत ऑस्ट्रेलियाने पारंपरिक प्रतिस्पर्धी न्यूझीलंडचे आव्हान पूर्णपणे भुईसपाट केले. कोणताही विजय हा आकडेवारी, दैव किंवा अंधश्रद्धेवर अवलंबून नसतो, तो तुमच्यातील गुणवत्ता, मनगटातील धमक, लढाऊ वृत्ती, दडपण झुगारून केलेल्या चोख कामगिरीवर अवलंबून असतो, हे ऑस्ट्रेलियाच्या संघाने पुन्हा एकदा दाखवून दिले. कर्णधार मायकेल क्लार्कने क्रिकेटला अलविदा करताना पुन्हा एकदा देशवासीयांना आपणच जगज्जेते आहोत हे दाखवून दिले. नाणेफेकीचा कौल ऑस्ट्रेलियाच्या बाजूने लागला नसला तरी प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडला त्यांनी १८३ या माफक धावसंख्येवर रोखले. हे आव्हान फक्त तीन फलंदाज गमावत पूर्ण केले.
नाणेफेकीचा कौल न्यूझीलंडच्या बाजूने लागला खरा, पण ऑस्ट्रेलियाने पहिल्याच षटकांत कर्णधार ब्रेंडन मॅक्क्युलमचा शून्यावर त्रिफळा उडवत आपले इरादे स्पष्ट केले. त्यानंतर मार्टिन गप्तील (१५) आणि केन विल्यमसन (१२) या दोन्ही फॉर्मात असलेल्या फलंदाजांना त्यांनी तंबूचा रस्ता दाखवत न्यूझीलंडची ३ बाद ३९ अशी अवस्था केली. आता ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडचा खुर्दा उडवणार असे वाटत असतानाच न्यूझीलंडला उपांत्य फेरी जिंकवून देणाऱ्या ग्रँट एलियटने संघाला सावरले, त्याला रॉस टेलरची (४०) चांगली साथ मिळाली. सारे काही आलबेल सुरू असतानाचा तिसऱ्या ‘पॉवर प्ले’च्या पहिल्याच चेंडूवर जेम्स फॉकनरने टेलरचा काटा काढला, त्याच षटकात त्याने धडाकेबाज फलंदाज कोरे अँडरसनलाही भोपळा फोडू न देता त्रिफळाचीत केले, त्यानंतरच्या षटकात फॉकनरने न्यूझीलंडचा आधारस्तंभ एलिटलाही बाद करत ऑस्ट्रेलियाच्या पारडय़ात सामना झुकवला. एलियटने या वेळी ७ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ८३ धावांची खेळी साकारली. ३ बाद १५० वरून न्यूझीलंडने एका धावेत तीन खंदे फलंदाज गमावले. या वेळी ऑस्ट्रेलियाने सामन्यात दमदार पुनरागमन करत एकूण ३३ धावांमध्ये सात फलंदाजांना बाद करत न्यूझीलंडचे आव्हान मोडीत काढले. चांगल्या भागीदारीनंतरही न्यूझीलंडचा डाव १८३ धावांवर आटोपला.
ऑस्ट्रेलिया धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरण्यापूर्वी १९८३ सालच्या विश्वचषकाचा दाखला द्यायला काही जणांनी सुरुवात केली होती. कारण या विश्वचषकात भारताचा डावही १८३ धावांवर आटोपला असला तरी त्यांनी वेस्ट इंडिजला नमवत विश्वचषक पटकावला होता. पण या वेळी ऑस्ट्रेलियाचा व्यावसायिक संघ वेस्ट इंडिजसारखा गाफील राहिला नाही. ऑस्ट्रेलियाला दुसऱ्याच षटकात धक्का बसला. डेव्हिड वॉर्नरने सात चौकारांसह ४५ धावा फटकावल्या खऱ्या, संघाने अर्धशतकाची वेस ओलांडल्यावर तोही बाद झाला. स्पर्धेत धावांचा डोंगर उभारणारा स्टीव्हन स्मिथ या वेळी जास्त आक्रमक न होता संयतपणे फलंदाजी करत होता. क्लार्क आतापर्यंत फॉर्मात नसला तरी या वेळी त्याने अप्रतिम फलंदाजीचा नमुना पेश केला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ११२ धावांची भागीदारी रचत संघाला विजय दृष्टिपथात आणून दिला. क्लार्क आपली अखेरची खेळी नाबाद राहून पूर्ण करेल, असे वाटत असताना तो त्रिफळाचीत झाला. बाद झाल्यावर मैदान सोडताना क्लार्क भावुक झाला, डोळ्यांत अश्रू दाटले आणि लाडका मित्र फिल ह्य़ूजची त्याला आठवण आल्यावाचून राहिली नाही. प्रेक्षकांचे आभार मानत साश्रू नयनांनी तो मैदानातून अखेरचा बाहेर पडला. क्लार्कने १० चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ७४ धावांची अप्रतिम कर्णधाराला साजेशी खेळी साकारली. क्लार्क बाद झाल्यावरही ७१ चेंडूंमध्येच स्मिथने (नाबाद ५६) अंगावर आलेला चेंडू ‘पूल’ करत चौकार लगावला आणि आनंदाला एकच उधाण आले. वॉटसनच्या कडेवर बसून त्याने संघ सहकाऱ्यांच्या दिशेने विजयाची आरोळी ठोकली. क्षणार्धात सारे खेळाडू मैदानात धावत आले. एकमेकांना मिठय़ा मारत, शुभेच्छा देत आनंद व्यक्त केला. गेल्या दीड महिन्याच्या अथक परिश्रमाला मिळालेल्या मधुर फळाची चव चाखली आणि अवर्णनीय क्षणांनी त्यांचे क्षितिज व्यापून गेले.

धावफलक
न्यूझीलंड : मार्टिन गप्तील त्रि. गो. मॅक्सवेल १५, ब्रेंडन मॅक्क्युलम त्रि. गो. स्टार्क ०, केन विल्यमसन झे. व गो. जॉन्सन १२, रॉस टेलर झे. हॅडिन गो. फॉकनर ४०, ग्रँट एलियट झे. हॅडिन गो. फॉकनर ८३, कोरे अँडरसन त्रि. गो. फॉकनर ०, ल्यूक राँकी झे. क्लार्क गो. स्टार्क ०, डॅनियल व्हेटोरी त्रि. गो. जॉन्सन ९, टीम साऊदी धावचीत (मॅक्सवेल) ११, मॅट हेन्री झे. स्टार्क गो. जॉन्सन ०, ट्रेंट बोल्ट नाबाद ०, अवांतर (लेग बाइज ७, वाइड ६) १३, एकूण ४५ षटकांत सर्वबाद १८३.
बादक्रम : १-१, २-३३, ३-३९, ४-१५०, ५-१५०, ६-१५१, ७-१६७, ८-१७१, ९-१८२, १०-१८३.
गोलंदाजी : मिचेल स्टार्क ८-०-२०-२, जोश हॅझेलवूड ८-२-३०-०, मिचेल जॉन्सन ९-०-३०-३, ग्लेन मॅक्सवेल ७-०-३७-१, जेम्स फॉकनर ९-१-३६-३, शेन वॉटसन ४-०-२३-०.
ऑस्ट्रेलिया : डेव्हिड वॉर्नर झे. एलियट गो. हेन्री ४५, आरोन फिंच झे. व गो. बोल्ट ०, स्टिव्हन स्मिथ नाबाद ५६, मायकेल क्लार्क त्रि. गो. हेन्री ७४, शेन वॉटसन नाबाद २, अवांतर (लेग बाइज ३, वाइड ६) ९,  एकूण ३३.१ षटकांत ३ बाद १८६.
बाद क्रम : १-२, २-६३, ३-१७५.
गोलंदाजी : टीम साऊदी ८-०-६५-०, ट्रेंट बोल्ट १०-०-४०-१, डॅनियल व्हेटोरी ५-०-२५-०, मॅट हेन्री ९.१-०-४६-२, कोरे अँडरसन १-०-७-०.

सामनावीर : जेम्स फॉकनर.

५४७ न्यूझीलंडच्या मार्टिन गप्तिलने केलेल्या धावांची संख्या. स्पर्धेत सर्वाधिक धावांचा विक्रम गप्तिलच्या नावावर. एका विश्वचषकात ५०० पेक्षा अधिक धावा करणारा न्यूझीलंडचा एकमेव फलंदाज. २००७ विश्वचषकात स्कॉट स्टायरिसने ४९९ धावा केल्या होत्या.

ब्रेंडन मॅक्क्युलमने अंतिम लढतीत केलेल्या धावांची संख्या. विश्वचषकाच्या अंतिम लढतीत कर्णधाराने केलेल्या धावांचा नीचांक. विश्वचषकाच्या अंतिम लढतीत कोणत्याही संघाचा कर्णधार शून्यावर बाद झालेला नाही.

४०० विश्वचषकातला ४००वा सामना. आतापर्यंत ३,६४६ एकदिवसीय सामने झाले आहेत.

३७ ब्रॅड हॅडिनचे वय. विश्वचषकाच्या अंतिम लढतीत ऑस्ट्रेलियातर्फे खेळणारा सर्वात वयस्कर खेळाडू. याआधीचा विक्रम ग्लेन मॅकग्राच्या नावावर. २००७च्या विश्वचषकात ३७ वर्षीय मॅकग्रा ऑस्ट्रेलियाचा सर्वात वयस्कर खेळाडू होता.

उपांत्य आणि अंतिम लढतीत अर्धशतकी खेळी करणाऱ्या फलंदाजांची संख्या. यामध्ये ग्रँट एलियट, माइक ब्रेअर्ली , डेव्हिड बून, जावेद मियाँदाद  आणि अरविंदा डिसिल्व्हा यांचा समावेश आहे

विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्ध शून्यावर बाद झालेले न्यूझीलंडचे फलंदाज. अंतिम लढतीत चार फलंदाज तर साखळी सामन्यात तीन फलंदाज शून्यावर बाद झाले होते.

अव्वल फलंदाज
१. मार्टिन गप्तिल (न्यूझीलंड) ५४७ धावा
२. कुमार संगकारा (श्रीलंका) ५४१ धावा
३. ए बी डी’व्हिलियर्स (दक्षिण आफ्रिका) ४८२ धावा

अव्वल गोलंदाज
१. ट्रेंट बोल्ट (न्यूझीलंड),  मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया) २२ बळी
२. उमेश यादव (भारत) १८ बळी
३. मोहम्मद शमी, मॉर्ने मॉर्केल, जेरॉम टेलर १७ बळी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 30, 2015 12:45 pm

Web Title: australia beat new zealand
Next Stories
1 एमसीजीवर सचिनचा जयघोष
2 स्टार्क विश्वचषकातील सर्वोत्तम क्रिकेटपटू
3 विजय ह्य़ुजला समर्पित..
Just Now!
X