(चंपक गंभीर चेहऱ्याने तॅत्ससमोर बसला आहे. तॅत्सच्या डिव्हाइसवर कर्सर गरगरतो आणि स्क्रीनवर मेलबर्नचे भव्य मैदान प्रकटते.)
wc04तॅत्स : भारत-पाकिस्तान म्हटलं की जो माहोल तयार होतो तेच वातावरण ट्रान्सटास्मान मुकाबल्याला असते.  खूप वेळा झिडकारले गेल्यावर हवं ते मिळवण्याची ऊर्मी कडवी होते. त्यात भावनिकता ओथंबलेली असते. या भावनांना कट्टर व्यावसायिकतेची जोड मिळाली तरच न्यूझीलंडला जिंकता येईल. मोठय़ा मेहनतीच्या बळावर न्यूझीलंडने एक चित्र जोडत आणलंय, एक विजय आणि अख्खा कॅनव्हास त्यांचा होईल. पण ऑस्ट्रेलियाचे फटकारे तीव्र असतात. त्यांची जिंकण्याची भूक कधीच भागत नाही. आणि वर्ल्डकप फायनलला त्यांच्या खेळांडूमध्ये काही तरी संचारतं. सहाणेवर गंध घोटावं तसं त्यांनी बेसिक्स घोटलंय आणि भावनांना स्थान नाही त्यांच्या खेळात. ‘विन अ‍ॅट एनी कॉस्ट’ हे कठोर सूत्र त्यांचं. पण सख्ख्या शेजाऱ्यांना ते घाबरून असतात. कारण न्यूझीलंड संघ भव्य दिव्यपेक्षा लहान गोष्टींनी सतवतो. ऊर्जा, फॉर्म आणि अचंबित करणारी सकारात्मकता न्यूझीलंडची ताकद आहे. मर्यादांची स्पष्ट जाणीव असलेली व्यावसायिकता ऑस्ट्रेलियाची जमेची बाजू आहे. ऑस्ट्रेलिया संघाने एक मित्र गमावलाय चार महिन्यांपूर्वी- त्याच्यासाठी एक ट्रॉफी तो बनती है!