जर तुम्हाला सचिन तेंडुलकरसोबत रात्रीच्या भोजनाचा आनंद लुटायचा असेल, तर त्याची मोठी किंमत मोजायला तयार राहा. सिडनीमधील एका नामांकित हॉटेलने सचिनसोबत भोजनासाठी दीड ते तीन हजार ऑस्ट्रेलियन डॉलर्स अशी किंमत जाहीर केली आहे आणि काहीच जागा शिल्लक हेसुद्धा सांगायला ते मुळीच विसरलेले नाहीत.
भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात रविवारी होणाऱ्या सामन्यानंतर २६ फेब्रुवारीला जवळपास ६० अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी खास मेजवानीचे आयोजन करण्यात आले आहे. सचिनच्या विश्वचषक सफरीचे औचित्य साधून एका संयोजकाने हे भोजन आयोजित केले आहे. ‘तुम्हाला स्वत: मास्टरसोबत खास रात्रीच्या भोजनाची अनुभूती घेण्यासाठी अतिमहत्त्वाची व्यक्ती म्हणून आमंत्रित करण्यात येत आहे -सचिन तेंडुलकर’, असे या आमंत्रण पत्रिकेत नमूद करण्यात आले आहे.
सचिनच्या टेबलावर ज्या एक डझन व्यक्तींना भोजन घेता येणार आहे, त्यांना तीन हजार ऑस्ट्रेलियन डॉलर्स किंमत मोजावी लागणार आहे. या वेळी सचिन सर्व मंडळींशी चर्चा करणार आहे. तसेच सचिनच्या स्वाक्षरीसह आत्मचरित्राची विक्री आणि त्याच्या काही साहित्याचा लिलाव या कार्यक्रमात करण्यात येणार आहे. या कार्यक्रमातून जमा होणारा पैसा सचिनच्या सामाजिक कार्यासाठी देण्यात येणार आहे.