ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघाची कामगिरी चांगली झालेली नाही. ही कामगिरी प्रमाण मानून विश्वचषकात भारतीय संघाला कमी लेखणे चूक ठरेल, असे मत संघाचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांनी व्यक्त केले.
विश्वचषक कोणता संघ जिंकणार, याविषयी विचारले असता चॅपेल म्हणाले, ‘‘मी ऑस्ट्रेलियाला झुकते माप देईन. ऑस्ट्रेलियाच जेतेपदाचे प्रबळ दावेदार आहे. त्यांची तयारी चांगली झाली आहे. अन्य संघांमध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ शिस्तबद्ध आहे. त्यांची गोलंदाजी मजबूत आहे. घरच्या मैदानांवरच खेळण्याचा फायदा न्यूझीलंडला मिळणार आहे आणि गेल्या वर्षभरात त्यांचे प्रदर्शन अफलातून आहे. वेस्ट इंडिजच्या संघाकडे सातत्य नाही मात्र ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमधील खेळपट्टय़ांचा फायदा उठवू शकतील असे गोलंदाज त्यांच्यांकडे आहेत.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘उपांत्य फेरीपासून चांगल्या संघांचाही कस लागणार आहे. चांगल्या खेळण्याबरोबरच संघांना नशिबाची साथ मिळणे आवश्यक आहे. ट्वेन्टी-२०च्या आक्रमणानंतर खेळाचे परिमाणच बदलले आहे.’’