सलामीवीर मोईन अलीच्या फलंदाजीचा जबरदस्त तडाखा स्कॉटिश संघाला सोमवारी बसला. त्यामुळे ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडकडून सपाटून मार खाणाऱ्या इंग्लंड संघाला अखेर पहिल्या विजयाचे दर्शन घडले. विश्वचषकातील ‘अ’ गटात इंग्लंडने दुबळ्या स्कॉटलंडचा ११९ धावांनी पराभव केला.
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडने ८ बाद ३०३ धावांचा डोंगर रचला. यात अलीचे १२८ धावांचे (१०७ चेंडू, १२ चौकार, ५ षटकार) महत्त्वपूर्ण योगदान होते. त्याने इयान बेल (५४) सोबत १७२ धावांची सलामी नोंदवली. त्यानंतर इंग्लिश गोलंदाजांनी स्कॉटलंडचा डाव ४२.२ षटकांत १८४ धावांत गुंडाळला आणि आपले विश्वचषकातील खाते उघडले. यातही अलीने ४७ धावांत २ बळी घेत आपली भूमिका चोख बजावली. स्टीव्हन फिन (३/२६), जेम्स अँडरसन (२/३०) आणि ख्रिस वोक्स (२/२५) या इंग्लंडच्या गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी केली.
३०४ धावांचे आव्हान स्वीकारलेल्या इंग्लंडच्या संघाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. १२ व्या षटकात स्कॉटलंडची ३ बाद ५४ अशी स्थिती होती; परंतु त्यानंतर ठरावीक अंतराने त्यांचे फलंदाज बाद होत गेले आणि कोणताही प्रतिकार न करता सामनाही हातातून गेला. स्कॉटलंडने न्यूझीलंड संघाविरुद्धच्या लढतीत चांगली लढत दिल्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा उंचावल्या होत्या. परंतु विश्वचषकातील सलग दुसरा पराभव त्यांच्या वाटय़ाला आला.
सलामीवीर कायले कोएत्झरने स्कॉटलंड संघाकडून एकाकी झुंज दिली. त्याने ८४ चेंडूंत ११ चौकारांसह ७१ धावांची खेळी साकारली. याशिवाय कर्णधार प्रेस्टन मॉमसेन (२६), रिची बेरिंग्टन (२३) आणि माजिद हक (१५) यांनाच फक्त दोन आकडय़ांमध्ये धावा काढता आल्या.
त्याआधी, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्ध अपयशी ठरलेल्या अलीने इंग्लंडच्या डावाला द्विशतकापलीकडे नेल्यावर हकने त्याला तंबूची वाट दाखवली. त्यानंतर गॅरी बॅलन्स (१०) आणि जो रूट (१) फार काळ टिकाव धरला नाही. त्यामुळे फक्त १० चेंडूंत १ बाद २०१ अशा सुस्थितीतल्या इंग्लंडची ४ बाद २०३ अशी अवस्था झाली. त्यानंतर अखेरच्या दहा षटकांत इंग्लंड संघाने ७८ धावा काढल्या, यापैकी ४८ धावा शेवटच्या पाच षटकांत काढल्या. कर्णधार ईऑन मॉर्गनने ४२ चेंडूंत ४६ धावा काढल्या आणि जेम्स टेलर (१७) सोबत पाचव्या विकेटसाठी ४९ धावांची भागीदारी रचली. तळाच्या फलंदाजांपैकी जोस बटलरने २४ धावांची छोटेखानी खेळी साकारली. स्कॉटलंडकडून जोश डेव्हीने ६८ धावांत ४ बळी घेण्याची किमया साधली.

संक्षिप्त धावफलक
इंग्लंड : ५० षटकांत ८ बाद ३०३ (मोईन अली १२८, इयान बेल ५४; जोश डेव्ही ४/६८) विजयी वि. स्कॉटलंड : ४२.२ षटकांत सर्व बाद १८४ (कायले कोएत्झर ७१; स्टीव्हन फिन ३/२६, जेम्स अँडरसन २/३०, मोईन अली २/४७)
सामनावीर : मोईन अली.