सध्याच्या काळातील क्रिकेटपटूंच्या तंदुरुस्तीबाबत मला खूप आश्चर्य वाटते. ते जेव्हा भारतासाठी खेळतात तेव्हा त्यांना दुखापती होतात, तंदुरुस्तीच्या समस्या जाणवतात. मात्र हेच खेळाडू जेव्हा आयपीएल स्पर्धेत एखाद्या फ्रँचाईजीकडून खेळतात, त्या वेळी त्यांना दुखापतीच्या समस्या जाणवत नाही.
ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडमधील खेळपट्टय़ा व वातावरणाशी अनुरूप होण्यासाठी गेले अनेक दिवस भारतीय संघ ऑस्ट्रेलियात खेळत आहे. तेथील कसोटी मालिकेत व  त्यानंतरच्या तिरंगी मालिकेत दोन सामन्यांमध्ये भरपूर विश्रांती आपल्या खेळाडूंना मिळत होती, असे असूनही त्यांना दुखापतीच्या समस्या कशा जाणवतात याचेच मला आश्चर्य वाटते. हेच खेळाडू आयपीएल स्पर्धेत केवळ एक दिवसाच्या विश्रांतीनंतर लगेचच सामना खेळतात. त्या वेळी त्यांना प्रवासाचा शीण जाणवत नाही व लागोपाठच्या सामन्यांचा थकवाही जाणवत नाही. त्यामुळे मला खेळाडूंच्या दुखापतींबाबत कमालीची चीड येते. आम्ही १९८३ मध्ये आपल्या देशाला पहिल्यांदा विश्वविजेतेपद मिळवून दिले, त्या वेळी संघातील काही खेळाडूंना अंतिम सामन्यापूर्वी दुखापतीच्या समस्या होत्या, मात्र आम्ही देशासाठी कधीही दुखापतींचा बाऊ केला नाही. कोणत्याही स्थितीत विश्वचषक जिंकायचा हीच खूणगाठ ठेवीत आम्ही खेळलो होतो.
गोलंदाजांची सध्याची प्रभावहीन कामगिरी व फलंदाजीत सातत्यपूर्ण खेळाचा अभाव हे लक्षात यंदा भारतीय खेळाडूंना नशिबाची साथ लाभली, तरच आपला संघ विश्वविजेता होईल असे मला वाटते. बाद फेरीत स्थान मिळविले, तरी खूप चांगली कामगिरी असेल. सर्वच आघाडय़ांवर खात्री देता येईल अशी आपली कामगिरी होत नाही.
ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका हे दोन संघ माझ्यासाठी विजेतेपदाचे मुख्य दावेदार आहेत. सर्वच आघाडय़ांवर दोन्ही संघांमधील खेळाडूंची कामगिरी अव्वल दर्जाची होत आहे. आफ्रिकेचा संघ यंदा ‘चोकर्स’ ही प्रतिमा पुसून काढण्याचा प्रयत्न करील, असा मला आत्मविश्वास आहे. ऑस्ट्रेलियन संघातील खेळाडूंमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करण्याची क्षमता आहे. न्यूझीलंडच्या संघाची बांधणी चांगली झाली आहे. त्यांना घरच्या वातावरणात खेळण्याचा निश्चित फायदा होईल. इंग्लंड व श्रीलंका यांच्याकडे अव्वल दर्जाची कामगिरी करण्याची क्षमता असलेले खेळाडू आहेत, मात्र त्यांनी मिळालेल्या संधींचे सोने करण्याची आवश्यकता आहे. वेस्ट इंडिजकडेही गुणवान खेळाडू आहेत. अन्य संघांना दुय्यम मानणे चुकीचे ठरेल, कारण धक्कादायक निकाल नोंदविण्याची क्षमता प्रत्येक संघात आहे. म्हणूनच विश्वचषक स्पर्धा चाहत्यांना निखळ आनंद देणारी स्पर्धा असते.
कीर्ती आझाद, माजी क्रिकेटपटू
शब्दांकन : मिलिंद ढमढेरे