ए बी डी’व्हिलियर्सच्या अष्टपैलूत्वाची वेलिंग्टनच्या वेस्टपॅक स्टेडियमवर क्रिकेटरसिकांनी गुरुवारी अनुभूती घेतली. आघाडीवर राहून नेतृत्व कसे करतात, याचा आदर्श वस्तुपाठच डी’व्हिलियर्सने विश्वचषकात घडवला. त्यामुळेच दक्षिण आफ्रिकेने ‘ब’ गटातील आपल्या अखेरच्या साखळी लढतीत दुबळ्या संयुक्त अरब अमिरातीवर १४६ धावांनी दणदणीत विजय मिळवला.
डी’व्हिलियर्सने ९९ धावांची घणाघाती खेळी साकारली आणि त्यानंतर आपल्या मध्यमगती गोलंदाजीच्याwc05 बळावर दोन बळी घेतले. पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत धक्कादायकरीत्या पराभूत पत्करणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघाला डी’व्हिलियर्सने पुन्हा विजयपथावर आणले. त्यामुळे गुणतालिकेत दक्षिण आफ्रिकेचा संघ आता भारतापाठोपाठ दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. मात्र गटातील अंतिम चित्र मात्र पाकिस्तान-आर्यलड आणि वेस्ट इंडिज-संयुक्त अरब अमिराती यांच्यातील लढतीनंतर रविवारी स्पष्ट होईल.
डी’व्हिलियर्सने विश्वचषकातील दुसरे अर्धशतक साकारल्यानंतर तो शतकाकडे कूच करीत होता. खुर्रम खानला मिडविकेटला षटकार खेचून डी’व्हिलियर्स ९९ धावांवर पोहोचला. विश्वचषकातील तो दुसरे शतक साकारणार, अशी चिन्हे होती. परंतु कामरान शेहझादच्या गोलंदाजीवर त्याचा ड्राइव्हचा फटका फसला आणि शॉर्ट थर्ड मॅनला उभ्या अमजद जावेदने त्याचा सुरेख झेल टिपला. त्यामुळे फक्त एका धावेने त्याचे शतक हुकले. डी’व्हिलियर्सने ८२ चेंडूंत ६ चौकार आणि ६ षटकारांसह आपली खेळी साकारली. आता विश्वचषकातील सर्वाधिक धावा काढणाऱ्यांच्या पंक्तीमध्ये तो कुमार संगकाराच्या पाठोपाठ दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याआधी डेव्हिड मिलरचे अर्धशतक एका धावेने हुकले. डी’व्हिलियर्स आणि मिलर यांनी चौथ्या विकेटसाठी १०८ धावांची भागीदारी केली.
मग सातव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या फरहान बेहरादिनने नाबाद ६४ (३१ चेंडू, ५ चौकार, ३ षटकार) धावांची वेगवान खेळी उभारत व्हरनॉन फिलॅण्डर (नाबाद १०) सोबत सातव्या विकेटसाठी ४९ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला ५० षटकांत ६ बाद ३४१ धावांचे अवघड आव्हान उभारता आले.
त्यानंतर मॉर्ने मॉर्केल, फिलँडर आणि डी’व्हिलियर्स यांनी प्रत्येकी दोन बळी घेत संयुक्त अरब अमिरातीचा डाव ४७.३ षटकांत १९५ धावांत गुंडाळला. त्यांचा ११व्या क्रमांकावरील फलंदाज फहाद अलहाश्मी दुखापतीमुळे फलंदाजीला उतरू शकला नाही.
दक्षिण आफ्रिकेच्या डोंगरएवढय़ा लक्ष्याचा अमिरातीचा संघ आत्मविश्वासाने पाठलाग करताना दिसलाच नाही. कारण ठरावीक अंतराने त्यांचे फलंदाज बाद होत गेले. अमिरातीकडून फक्त यष्टीरक्षक-फलंदाज स्वप्निल पाटील (नाबाद ५७) आणि शैमन अन्वर (३९) यांनी झुंजार फलंदाजी केली.

संक्षिप्त धावफलक
दक्षिण आफ्रिका : ५० षटकांत ६ बाद ३४१ (ए बी डी’व्हिलियर्स ९९, डेव्हिड मिलर ४९, फरहान बेहरादिन नाबाद ६४; मोहम्मद नावेद ३/६३) विजयी वि. संयुक्त अरब अमिराती : ४७.३ षटकांत १९५ (स्वप्निल पाटील नाबाद ५७; ए बी डी’व्हिलियर्स २/१५)
सामनावीर : ए बी डी’व्हिलियर्स.
३०९ अमिरातीच्या शैमान अन्वरने विश्वचषकात केलेल्या धावा. कसोटी न खेळणाऱ्या देशांच्या फलंदाजाने एका विश्वचषकात केलेल्या सर्वाधिक धावा. अन्वरने नेदरलँड्सच्या रायन टेन डुस्काटाचा २०११च्या विश्वचषकात ३०७ धावांचा विक्रम मोडला.

३६ विश्वचषकात ए बी डी’व्हिलियर्सने लगावलेल्या षटकारांची संख्या. विश्वचषकात सर्वाधिक षटकारांचा विक्रम आता ए बीच्या नावावर. त्याने रिकी पॉन्टिंगचा ३१ षटकारांचा विक्रम मोडला.
२० यंदाच्या विश्वचषकात ए बी डी’व्हिलियर्सने लगावलेल्या षटकारांची संख्या. एका विश्वचषकात सर्वाधिक षटकारांचा मॅथ्यू हेडनचा २००७च्या विश्वचषकात नोंदवलेला १८ षटकारांचा विक्रम मोडला.

३४१ दक्षिण आफ्रिकेने अमिरातीविरुद्ध केलेल्या धावा. विश्वचषकात चौथ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने तीनशेचा टप्पा ओलांडला.

हा परिश्रमपूर्वक विजय आहे. अमिरातीच्या गोलंदाजांनी शिस्तबद्ध मारा करत आम्हाला अडचणीत टाकले. पण आम्ही संघर्ष करत मोठी धावसंख्या उभारली आहे. मी मूलभूत तंत्रकौशल्याचे पालन केले, म्हणूनच धावा करता आल्या. संघाच्या विजयात योगदान देता आले याचा आनंद आहे.
– ए बी डी‘व्हिलियर्स, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार

अव्वल फलंदाज
१. कुमार संगकारा (श्रीलंका) ४९६ धावा
२. ए बी डी’व्हिलियर्स (दक्षिण आफ्रिका) ४१७ धावा
३. तिलकरत्ने दिलशान (श्रीलंका) ३९५ धावा

अव्वल गोलंदाज
१. जोश डॅव्हे (स्कॉटलंड) १४ बळी
२. ट्रेंट बोल्ट, टिम साऊदी, मॉर्ने मॉर्केल १३ बळी
३. मिचेल स्टार्क, डॅनियल व्हेटोरी, मोहम्मद शमी १२ बळी