दिल्लीमध्ये अरविंद केजरीवालांनी गाजवलेल्या पराक्रमानंतर या विषयावर भाष्य करणारी व्यंगचित्रे, विनोदी किस्से यांची बरसात सुरू झाली आहे. राज ठाकरे यांनी या विषयावर काढलेले एक व्यंगचित्र पाहण्यात आले असता ‘जैसे दूर देश के टावर में घूस जाए रे एरोप्लेन’ हे गाणे मनात तरळून गेले. लगेच wc01आणखी एक विचार मनात आला.. आपल्या धोनीचा हेलिकॉप्टर शॉट आणि केजरीवालांनी दिल्लीत भाजपला दिलेली ‘एरोप्लेन धडक’ सारखीच म्हणायला पाहिजे. दुश्मनाला धूळ चारावी तर अशी एका फटक्यात चारीमुंडय़ा चीत. नकळतपणे मन धोनी आणि केजरीवाल यांच्यातील साम्य शोधू लागले.
सुरुवातीचे दिवस आठवले तर काय जाणवते? आक्रमक फलंदाज म्हणून धोनी नावारूपाला आला. त्याचे भवितव्य उज्ज्वल आहे, हे तेव्हाच कळत होते. हळूहळू पठ्ठय़ाने कर्णधारपद खिशात घातले. भारतीय क्रिकेटचा काटेरी मुकुट असलेले कर्णधारपद धोनी अतिशय शांतचित्ताने सांभाळू लागला. खरेच कमाल आहे बुवा! ..आणि आता तर ‘कॅप्टन कुल’ म्हणून जगभरात नाव झाले त्याचे. केजरीवाल त्यांचा सुरुवातीचा काळ पाहिला तर?.. असे म्हणतात विपश्यनेचा अभ्यास केलाय त्यांनी. अतिशय शांतचित्ताने हा माणूस राजकारणातल्या जायण्ट लोकांशी भिडत होता. सुरुवातीला अण्णांच्या ताफ्यातल्या या माणसाने पुढे स्वत:चा पक्ष स्थापन केला.
भारतीय राजकारणात कुणाला स्थान मिळवायचे असेल तर इथे पारंपरिक प्रतिस्पर्धक काँग्रेसशी दोन हात करावे लागतात. दिल्लीत केजरीवालांनी काँग्रेसशी मुकाबला करीत विजय मिळविला आणि सत्ता स्थापन केली तर धोनीने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला हरवत ट्वेण्टी-२०च्या वर्ल्डकपवर नाव कोरले. केजरीवाल यांनीही निवडणुकीचा जिंकलेला सामना पुढे ट्वेंटी-२०चाच ठरला. अवघ्या ४९ दिवसांत त्यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले.
केजरीवाल यांनी दिलेला राजीनामा चर्चेचा विषय झाला तर ऐन भरात असताना धोनीने कसोटी सामन्यांतून जाहीर केलेली निवृत्ती हा सर्वाना आश्चर्याचा धक्का होता. धोनी आणि केजरीवालांचे हे राजीनामा देण्याचे साम्य केवळ इथेच जुळत नाही, तर सुरुवातीला पूर्ण वेळ राजकारणात उतरण्यासाठी केजरीवालांनी आयकर विभागातील आपल्या नोकरीचा राजीनामा दिला होता. तर खरगपूर रेल्वे स्टेशनवर रेल्वे तिकीट तपासनीस असलेल्या धोनीने नोकरीचा राजीनामा देत पूर्ण वेळ क्रिकेटमध्ये झोकून दिले होते. धोनीवरसुद्धा फिक्सिंग, हितसंबंध आदी आरोप झाले होते. केजरीवालांवरसुद्धा भ्रष्टाचाराचे आरोप केले गेले. दोघेही यातून सहीसलामत बाहेर आले. दोघेही आपआपल्या नोकरीत प्रामाणिक होते, असे त्यांचे त्या वेळचे सहकारी सांगतात हे विशेष. दोघेही आपली ‘क्लीन इमेज’ राखून आहेत.
धोनीला जगातील सवरेत्कृष्ट फिनिशरपैकी एक मानले जाते. कालचा दिल्लीतील निवडणुकीचा निकाल काँग्रेस शून्य, भाजप तीन, आप ६७ पाहता केजरीवाल यांनासुद्धा ‘ग्रेट फिनिशर’ मानायला हवे. गांगुलीच्या मते धोनी हा भारताचा सार्वकालिन सर्वोत्तम कर्णधार आहे, तर ‘टाइम’ मॅगझिन २०१४नुसार विश्वातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये केजरीवालांची गणना केली गेली.
धोनीने भारतीय टीमचा ताबा घेतला तेव्हा ती वर्ल्ड कपमधील कमकुवत टीम मानली जात होती, पण आपल्या बेधडक निर्णयक्षमतेच्या जोरावर आधी पाकिस्तानला हरवत ट्वेंटी-२०चा वर्ल्ड कप आणि नंतर श्रीलंकेला पराभूत करीत भारताने २०११चा वर्ल्ड कप जिंकला. काँग्रेसला हरवून ४९ दिवसांच्या अल्पजीवी सरकार स्थापनेच्या फियास्कोनंतर पुढच्या निवडणुकीत बलाढय़ भाजपला धूळ चारीत एकहाती सत्ता मिळविण्याचा भीमपराक्रम केजरीवाल करतील, असे कुणाला स्वप्नातदेखील वाटले नव्हते. आपआपल्या जागी धोनी आणि केजरीवाल हे अ‍ॅक्शन, ड्रामा, इमोशन, सस्पेन्सचे संपूर्ण पॅकेज आहेत, असेच म्हणावे लागेल.
दिल्लीत अल्प जागा मिळविलेल्या भाजपला केजरीवाल विरोधी पक्ष स्थापना करण्यात आडकाठी करणार नाहीत. कारण त्यांच्यात स्पोर्टस्मन स्पिरिट आहे, असे जाणकारांचे म्हणणे आहे, तर क्रिकेटविश्वात धोनीला खिलाडूवृत्तीचे परफेक्ट उदाहरण मानले जाते. इतके पराक्रम करूनसुद्धा धोनी लो प्रोफाइल असतो, तर अविश्वसनीय विजयानंतरही केजरीवालही ‘लो प्रोफाइल’ राहत आहेत. धोनीने भारतीय टीममधील प्रत्येकाला हाताशी धरीत त्यांचा आत्मविश्वास वाढवला, तर भूतकाळ आणि भविष्याचा विचार न करता वर्तमानात राहा. प्रत्येक क्षण एन्जॉय करीत प्रोसेसमध्ये विश्वास ठेवा हे धोनी त्याच्या सहकाऱ्यांच्या मनात बिंबवत असतो. ‘हरलो तर हरलो, आपण राजकारणात नवेच आहोत. हळूहळू सर्व बदलण्यावर माझा विश्वास आहे. ही एक मोठी प्रक्रिया आहे,’ असे केजरीवाल बिनदिक्कत बोलत असतात.
धोनी आणि केजरीवाल हे स्टाइल आयकॉन आहेत आणि याबाबतीतसुद्धा दोघांत साम्य आहे. याअगोदर कोणी केस वाढवले नव्हते का? कुणी मफलर, गांधी टोपी घालून फिरत नव्हते का? पण धोनी आणि केजरीवाल यांनी हे केले आणि त्यांनी केलेली फॅशन चर्चेचा विषय बनली. शेवटी सांगायचे तर आज कुणाच्याही ध्यानीमनी नसताना केजरीवालांनी बलाढय़ विजय मिळवीत दिल्लीला स्थिर सरकार दिले आहे.
धोनी आणि केजरीवाल यामधील ही सारी साम्ये लक्षात येत असतानाच मनात आता दुसरे एक गीत रुंजी घालू लागले.. ‘सिकंदरने पोरस से की थी लढाई जो की थी लढाई तो मै क्या करू.’ इतिहासात पोरसकडून सिकंदर हरला नाही, पण अवघा देश जिंकण्याची किमया साधणाऱ्या सिकंदराला वर्तमानात एका केजरीवाल नावाच्या पोरसने हरवले. पाहू या क्रिकेट वर्ल्ड कप २०१५ मध्ये उतरलेल्या भारतीय संघाकडूनही कुणालाच अपेक्षा नाहीत. अशा वेळी केजरीवालांशी साम्य साधत कमकुवत टीमकडून धोनी विजयाचा चमत्कार घडवणार का? माय फिंगर्स आर क्रॉस्ड!!!