विश्वचषकाच्या तोंडावर भारताचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांनी सचिन तेंडुलकरशी असलेल्या वादग्रस्त संबंधांना नवी फोडणी दिली आहे. २००७ च्या विश्वचषक स्पध्रेत सचिनला मधल्या फळीत फलंदाजीला उतरण्याची मी सूचना केल्यापासून आमच्यातील संबंध बिघडले, असा खुलासा चॅपेल यांनी केला.
काही महिन्यांपूर्वी सचिनने आपल्या ‘प्लेइंग इट माय वे’ या आत्मचरित्रात चॅपेल यांना ‘रिंगमास्टर’ असे संबोधले होते. त्या वेळी सचिन-चॅपेल वादावर मसालेदार चर्चा क्रिकेटविश्वात रंगली होती. आता एका वाहिनीवरील ‘क्रिकेट लिजेंड्स’ कार्यक्रमात चॅपेल यांनी सचिनशी संबंध कशामुळे बिघडले याचे स्पष्टीकरण दिले.
‘‘संघासाठी काय योग्य आहे, ते सचिनने करावे अशी माझी अपेक्षा होती; परंतु त्याला मात्र स्वत:ला हव्या त्या क्रमांकावर फलंदाजी करण्यात रस होता. आमच्यातील दुराव्याचे हेच प्रमुख कारण होते,’’ असे चॅपेल यांनी सांगितले. २००७ च्या विश्वचषकात भारताचे आव्हान पहिल्या फेरीत संपुष्टात आले होते.
‘‘सलामीला फलंदाजी करण्यास सचिन प्राधान्य द्यायचा; परंतु कॅरेबियन बेटांवरील विश्वचषकात त्याने मधल्या फळीत फलंदाजीला जावे, असे आम्हाला वाटत होते. आमच्याकडे आघाडीला फलंदाजी करू शकणारे अन्य खेळाडू होते. आधी त्याने हे मान्य केले होते. परंतु नंतर मात्र त्याने तसे करण्यास इन्कार केला. मी त्याच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. तेव्हापासून आमच्यात बिनसले,’’ असा दावा चॅपेल यांनी केला.
२००७ च्या विश्वचषकाआधी राहुल द्रविडच्या जागी कर्णधारपद स्वीकारावे, असा प्रस्ताव चॅपेल यांनी आपल्यापुढे ठेवल्याचा दावा सचिनने पुस्तक प्रकाशनाच्या वेळी केला होता.