वेगाचा बादशाह डेल स्टेन आणि चौकार-षटकारांची आतषबाजी करणारा ख्रिस गेल हे शुक्रवारी एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. झिम्बाब्वेच्या संघावर आक्रमण करून फॉर्मात आलेल्या वेस्ट इंडिजच्या गेल या वादळाला रोखण्याचे आव्हान दक्षिण आफ्रिकेच्या संघातील स्टेन गनला पेलावे लागणार आहे. यात कोण बाजी मारणार, याची क्रिकेटविश्वात उत्सुकता निर्माण झाली आहे.
सध्या खराब फॉर्मशी झगडत असलेल्या स्टेनला विश्वचषकात सध्या तरी छाप पाडता आलेली नाही. दोन सामन्यांत त्याने ११९ धावा देत दोनच बळी घेतले आहेत. सुरुवातीच्या सामन्यात चाचपडणाऱ्या गेलने  पहिल्या दोन सामन्यांत ४० धावाच केल्या होत्या, परंतु झिम्बाब्वेविरुद्धच्या २१५ धावांच्या खेळीने त्याचे मनोबल चांगलेच उंचावले आह़े  त्यामुळे सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर शुक्रवारी होणाऱ्या दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज या लढतीकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
स्टेनला एकदिवसीय कारकीर्दीत एकदाच गेलला बाद करण्यात यश मिळाले आहे. दरबान येथे झालेल्या या सामन्यात गेलने ४१ धावांची खेळी केली होती. त्यात त्याने स्टेनच्या पहिल्याच षटकात दोन खणखणीत चौकार ठोकले होते. या लढतीत गेलने स्टेनच्या २४ चेडूंचा सामना करीत दोन षटकार आणि पाच चौकार चोपले होते. त्यामुळे सिडनीवर होणाऱ्या लढतीत स्टेनवर पुन्हा प्रहार करण्यासाठी गेल सज्ज झाला आहे.