आंतरराष्ट्रीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धा सुरू होण्याआधी आघाडीच्या संघांची जी स्थिती सट्टाबाजारात होती, त्यात आता बऱ्यापैकी बदल झाला आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेला नमवणे, न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाला wc11आणि श्रीलंकेने इंग्लंडला नमवल्यामुळे आता समीकरणांमध्ये आणि पर्यायाने या संघांना देऊ करण्यात आलेल्या भावामध्ये बदल होत आहे. सट्टेबाजारात आजही ऑस्ट्रेलियाला पहिले स्थान असले तरी त्यांचे ते शेवटपर्यंत कायम राहण्याची आता शक्यता नाही. पहिल्या पाचांमधून आता इंग्लंडची गच्छंती झाली असून त्याजागी श्रीलंकेला सट्टेबाजांनी पसंती दिली आहे. भारताचा चौथा क्रमांक अद्याप कायम आहे. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये कमालीची चुरस आहे. यामध्ये भारताचे स्थान आता भक्कम होत आहे. भारत अंतिम फेरीत पोहोचेल, असा सट्टेबाजांचा होरा आजही कायम आहे. आंतरराष्ट्रीय सट्टेबाजाराने अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडलाच पसंती दिली आहे. ए बी डि’व्हिलियर्स (द. आफ्रिका), कुमार संगकारा (श्रीलंका), केन विल्यमसन (न्यूझीलंड), स्टीव्हन स्मिथ (ऑस्ट्रेलिया) आणि मार्लन सॅम्युअल्स (वेस्ट इंडिज) हे फलंदाज तर मिचेल जॉन्सन (ऑस्ट्रेलिया), डेल स्टेन (दक्षिण आफ्रिका), लसिथ मलिंगा (श्रीलंका), टिम साऊदी (न्यूझीलंड), जेम्स अँडरसन (इंग्लंड) हे गोलंदाज सध्या सट्टेबाजारातील पहिल्या पाचांत स्थान टिकवून आहेत. भारताचे फलंदाज विराट कोहली, शिखर धवन तसेच गोलंदाजांपैकी मोहित शर्मा सध्या सट्टेबाजारात स्थान टिकवून आहेत. वेस्ट इंडिज, आर्यलड आणि झिम्बाब्वेसमवेत भारताचे सामने शिल्लक आहेत. त्यानंतरच त्यांचा सट्टेबाजारातील खरा भाव स्पष्ट होणार आहे.
निषाद अंधेरीवाला