एका बुजूर्ग क्रीडा पत्रकाराला पुन:पुन्हा अर्वाच्य शिव्या जाहीर हासडल्या होत्या, विराट कोहलीनं. त्याला आता पाच-सहा दिवस झाले असावेत. या कालावधीत त्याला भेटून झाल्या प्रकाराबद्दल सखेद माफी मागण्याचा प्रांजळपणा, वा सौजन्य वा सुसंस्कृतपणा दाखविण्याची सुबुद्धी झालेली नाही विराटला. दुसऱ्या एका क्रीडा पत्रकारामार्फत माफीचा निरोप पाठवण्याची पळवाट त्याने शोधली. ही माफी पुरेशी नाही, असे त्या क्रीडा wclogoपत्रकाराने त्याच्या लेखात स्पष्ट केले होते, पण तिकडे साफ दुर्लक्ष करतोय विराट आणि त्याला काही प्रमाणात पाठबळ देणारं व्यवस्थापन व भारतीय क्रिकेट नियामक मंडळ!
या प्रकरणी झालेला दिसतोय समजुतीचा घोटाळा. ‘हिंदुस्थान टाइम्स’ दैनिकाचे प्रतिनिधी जसविंदर सिधू आणि ‘इंडियन एक्स्प्रेस’ दैनिकाचे राष्ट्रीय क्रीडा संपादक संदीप द्विवेदी हे दोघे एकमेकांसारखे दिसतात. गतसाली द्विवेदी हे भारतीय संघाच्या इंग्लिश दौऱ्याच्या समीक्षणास गेले होते. त्यांचा एक वृत्तांत विराटच्या जिव्हारी लागला होता. त्यानं आपला राग द्विवेदींकडे बोलून दाखवलाही होता. तो राग अजूनही तापट विराटच्या मनात खोलवर घर करून बसलेला आहे. पर्थमध्ये सिधू यांना हिंदी-पंजाबी-इंग्लिशमध्ये शिवीगाळ करताना विराट असंही म्हणाला होता, ‘‘आता तू इथे ऑस्ट्रेलियातही पोहोचला आहेस की!’’ त्याच्या या बोलण्यानं सिधू अधिकच बुचकळ्यात पडले होते. कारण त्यांचा आजवर विराटशी फारसा संबंधच आलेला नव्हता!
विराटनं सिधू यांना शिवीगाळ करण्याचं कोणतंही सबळ कारण नव्हतं, पण द्विवेदींविषयीही त्यानं आगपाखड करण्यास तरी काही कारण होतं का? द्विवेदीजींनी त्याच्याविषयी काही निराधार माहिती दिली होती का? त्याच्या खासगी आयुष्यात बेजबाबदार घुसखोरी केली होती का? त्याच्या चारित्र्यावर कुठे शिंतोडे उडविले होते का?
द्विवेदींनी काय लिहिलं?
संदीप द्विवेदींनी १९ जुलै २०१४च्या अंकात एक छोटंसं वार्तापत्र लिहिलं होतं. दौऱ्यावरचं भारतीय पथक अमाप फुगत ‘जंबो टुरिंग पार्टी’ बनलंय, त्यात खेळाडूंच्या पत्नींसह प्रथमच एक अविवाहित मैत्रीणपण आहे, असा होता त्या वृत्तांताचा मथळा. ‘इन इंडियाज जंबो टुरिंग पार्टी, द ‘जी’ इन व्ॉग्स्’. इथे ‘जी’ म्हणजे गर्ल फ्रेंड, मैत्रीण आणि व्ॉग्ज म्हणजे पत्नी व मैत्रिणी. तो वृत्तांतच असा-
‘‘अलीकडच्या काळातील प्रदीर्घ अशा, रस्त्यावरील (बस) प्रवासाच्या अडीच महिन्यांच्या दौऱ्यासाठी इंग्लंडमध्ये उतरलंय ‘जंबो’ भारतीय प्रवासी पथक. जरा जास्तीच फुगवलेलं ‘जंबो’ भारतीय पथक. पहिली कसोटी होती नॉटिंगहॅमला. तिथे या जंबो पथकातील बिगर खेळाडूंनी २१ खोल्यांत तळ ठोकला होता. भारतीय संघ १८ क्रिकेटपटूंचा. त्यांसह कधी नाही इतका मोठा लवाजमा. बऱ्याच साऱ्या प्रशिक्षकांचा, व्यवस्थापनाचा, पोराबाळांचा आणि प्रथमच खेळाडूंच्या सौभाग्यवतींसह एका मैत्रिणीचाही. इंग्लिश दौरा ४२ दिवसांचा. त्यात भराभर उरकले जाणार आहेत पाच कसोटी सामने. दमछाक घडवणाऱ्या या दौऱ्यातील थकल्या-भागल्या खेळाडूंची शरीरं तंदुरुस्त ठेवण्यासाठी आणला आहे १५ मदतनीसांचा ताफा. मसाजतज्ज्ञ रमेश माने, क्रीडा मॅस्युअर अमीर शहा व फिजिओथेरपिस्ट इवान स्पीचली या मंडळाच्या अधिकृत मदतनीसांवरील बोजा हलका करण्यासाठी इंग्लंडमधील स्थानिक तज्ज्ञांचे साहाय्य घेतले जाणार ते वेगळेच.
गॅरी कर्स्टन प्रशिक्षकपदापासून दूर गेल्यानंतरही, खेळाडूंवर चेंडूचा मारा केंद्रित करणारे राघविंद्र आता (डंकन फ्लेचरसह) आहेतच. त्याशिवाय आहेत ट्रेनर्स, साहाय्यक प्रशिक्षक, संगणक विश्लेषक, संघाचे फलंदाजी सल्लागार राहुल द्रविड, शिवाय बस ड्रायव्हर, सामान व्यवस्थापक आणि सुरक्षा अधिकारी.
संघासोबत आहेत काही क्रिकेटपटूंच्या पत्नी व पोरंबाळं. सलामीवीर मुरली विजयच्या पत्नी निकिजा व त्यांचा छोकरा नवीन. भारतीय संघाच्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षकांच्या पत्नी, त्यांचा मुलगा व मुलगी हे चौघेही संघाच्या हॉटेलातच होते. श्री. व्र सौ. चेतेश्वर पुजारा, श्री. व सौ. गौतम गंभीर आणि गौतमची तीन महिन्यांची चिमुकली हेही या पथकाचे सदस्य.
पूर्वापारच्या पद्धतीतील एक बदल म्हणजे अनुष्का शर्मा या विराट कोहलीच्या मैत्रिणीला संघासह राहण्याची परवानगी. त्यासाठी विराटने बीसीसीआयची संमती मिळवली, असं समजतं. बॉलीवूड नटीसह क्रिकेटपटू अनेक कॅमेऱ्यांना अन् स्वाक्षऱ्यांचा छंद बाळगणाऱ्या शौकिनांना आकर्षित करणारच. या भारतीय संघाभोवती गर्दी जमावी यात नवल ते काय?’’
बस्स, हाच व एवढाच वृत्तांत (सिधूंचा नव्हे!) द्विवेदी यांचा. त्या वृत्तांतात त्यांनी वाचकांचं लक्ष वेधलंय बिगर खेळाडूंनी संघाच्या हॉटेलात व्यापलेल्या २१ खोल्यांकडे. त्यांनी विराटला लक्ष्य केलेलं नाही, पण खेळाडूंच्या पत्नींप्रमाणे मैत्रिणीला संघासह राहण्याचा नवा पायंडा बीसीसीआय पाडत आहे म्हणून अभिनेत्री अनुष्काचा खास स्वतंत्र उल्लेख. तोही या पायंडय़ाविषयी कोणतेही टीकात्मक मतप्रदर्शन न करता.
या वृत्तांतात विराटवर अन्यायकारक असं काय आहे? द्विवेदीजींची माहिती अचूक आहे ना? त्यांनी विराटच्या चारित्र्यावर कुठे शिंतोडे उडवलेले नाहीत ना? त्यांनी विराट-अनुष्का यांच्या खासगी संबंधात डोकावण्याची घुसखोरी केलेली नाही ना? तरी विराटला एवढा प्रचंड, अनावर राग यावा हे अतीच झालं!
डेव्हिड वॉर्नर प्रकरण
विश्वचषकातील विराट हा भारतीय संघाचा सर्वात अव्वल व आक्रमक फलंदाज. हाच विचार करून बीसीसीआय त्याला तूर्त समज देऊन, तात्पुरतं मोकळं सोडत असेल, तर ते योग्यच  आहे; पण डेव्हिड वॉर्नर हा कांगारू फलंदाजीचा एक एक्का. त्याचे प्रकरण क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कसे हाताळले, तेही मंडळाने अभ्यासावे.
जसे द्विवेदी व सिधू हे भारतातील इंग्लिश दैनिकातले बुजुर्ग पत्रकार, तसेच रॉबर्ट क्रॅडॉक व माल्कम कॉन हे ऑस्ट्रेलियातील जाणकार क्रिकेट पत्रकार. २०१३च्या आयपीएल सामन्यातील एका वादग्रस्त प्रसंगावरून वॉर्नरनं या दोघांना असभ्य, बेताल ‘ट्विट’ केले. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्याची दखल लगेच घेतली. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले. वॉर्नरचा हा पहिलाच गुन्हा. त्यासाठी त्याला पावणे सहा हजार ऑस्ट्रेलियन डॉलर्स म्हणजे पावणेतीन लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. मुख्य म्हणजे हा दंड भरणाऱ्या वॉर्नरला कर्णधार मायकल क्लार्कने चार गोष्टी सुनावल्या आणि त्या दोघा पत्रकारांची जातीनं माफी मागायला लावली. आज-उद्या नव्हे, पण विश्वचषक स्पर्धा संपल्यावर दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर बीसीसीआयनं अशी काही कारवाई केलीच पाहिजे!