आपल्यावर लागलेला शिक्का हा पुसायलाच हवा. कारण शिक्का पडल्यावर एका चौकटीमध्ये आपण लोकांच्या नजरेत राहतो आणि एकदा का शिक्का बसला की तुम्हाला त्या चौकटीबाहेर कुणी पडायला देत नाही आणि पडलात तरी त्याची जास्त दखल घेतली जाते असेही नाही. ‘चोकर्स’ हा शिक्का दक्षिण आफ्रिकेच्या संघावर बसलेला आहे. हा शिक्का ते यावेळी पुसतील, असे बऱ्याच जणांना वाटत असले तरी त्यांच्या संघामध्ये काही कच्चे दुवे आहेत. जोपर्यंत या कच्च्या दुव्यांवर मात केली जात नाही, तोपर्यंत त्यांना विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचता येणार नाही.
कागदावर जर आफ्रिकेचा संघ पाहिला तर त्यांच्यासारखा बलाढय़ संघ कुठेच दिसत नाही. सलामीला हशिम अमलासारखा विश्वासू फलंदाज आहे. ए बी डी’व्हिलियर्स चौफेर फटकेबाजीसाठी माहीर. फॅफ डय़ू प्लेसिस, डेव्हिड मिलर, रिली रोसू एकामागून एक दणकट फलंदाज. गोलंदाजीमध्ये डेल स्टेन, मॉर्नी मॉर्केल, व्हरनॉन फिलँडर, वेन पार्नेल ही चौकडी. क्षेत्ररक्षणातसुद्धा हा संघ पटाईत. पण तरीही हा संघ अंतिम फेरीत पोहोचेल, याची शाश्वती वाटत नाही. सध्या क्विंटन डी कॉक सोडल्यास सारेच फलंदाज फॉर्मात आले आहेत. आफ्रिकेच्या फलंदाजांनी ज्या धावा केल्या आहेत, त्या प्रथम फलंदाजी करतानाच. भारताविरुद्ध त्यांची दुसऱ्यांदा फलंदाजी करताना काय अवस्था झाली होती, हे साऱ्यांनीच पाहिले आहे. संथ खेळपट्टी, दवाचे प्रमाण कमी, दर्जेदार गोलंदाज यांच्यापुढे दुसऱ्या डावात फलंदाजी करताना आफ्रिकेचा संघ दडपणाखाली येतो. धावांचा पाठलाग करण्याचे तंत्र त्यांना अवगत असले, तरी कागदावरील हा बलवान संघ मैदानावर त्या रुबाबाला न्याय देण्यात असमर्थ ठरतो आहे. धावांचा पाठलाग करताना अमला आणि फॅफ लवकर बाद झाले, तर सारे दडपण डी’व्हिलियर्सवर येते. तो जर चांगला खेळला तर विजय मिळू शकतो, कारण तोच संघाचा फलंदाजीमध्ये आधारस्तंभ आहे. तो जर लवकर बाद झाला तर मात्र त्यांना आव्हानाचा पाठलाग करणे जमत नाही. मिलर, रोसू हे धडाकेबाज फलंदाजी करतातही, पण दडपणाखाली नाही. अगदी यूएईविरुद्धच्या सामन्यात सारे काही स्थिरस्थावर होते, पण अखेरच्या दहा षटकांमध्ये (अखेरच्या २-३ षटकांचा अपवाद वगळता) त्यांना मोठे फटके मारता आले नाहीत, जर त्यांनी धडाकेबाज फलंदाजी केली असती, तर आफ्रिकेला साडेचारशे धावा सहज उभारता आल्या असत्या, पण तसे झाले नाही.
गोलंदाजीमध्ये स्टेन आणि मॉर्केल यांना लय सापडलेली दिसत नाही. यूएईविरुद्ध कायले अ‍ॅबॉट ८ षटकांत २१ धावा देऊन ४ बळी मिळवतो, तिथे स्टेनला ८ षटकांत ३९ धावा मोजल्या जातात. स्टेन हा विश्वचषकात दमलेला दिसतो. तो जेव्हा यष्टींजवळ चेंडू टाकायला येतो, तेव्हा त्याची देहबोली बारकाईने पाहिल्यास त्याच्यामध्ये तेवढी लय, शक्ती दिसत नाही. त्याच्या चेंडूच्या टप्प्यांमध्ये सातत्य नाही. मुळात कुठे तरी तो शारीरिक आणि त्यामुळे अपेक्षेनुरूप कामगिरी करता येत नसल्यामुळे मानसिकरीत्याही खचलेला वाटतो. डी’व्हिलियर्सने त्याच्यावर तरीही विश्वास दर्शवला आहे, ते त्याचे कामच आहे. पण स्टेनला त्याने काही सामन्यांसाठी विश्रांती देऊन पूर्ण तंदुरुस्त व्हायला द्यावे, नाही तर मोठय़ा सामन्यांमध्ये तो तंदुरुस्त नसेल. मॉर्केलसारख्या गोलंदाजाला झिम्बाब्वेच्या फलंदाजांनी झोडपावे, याला काय म्हणणार. त्यालाही आत्मचिंतन करायला विश्रांती द्यायली हवी. फिलँडर जायबंदी झाला आहे आणि पार्नेल कच खाणारा वाटू लागला आहे.
आफ्रिका हा दोन-तीन देशांच्या स्पर्धेमध्ये अव्वल येणारा संघ, पण विश्वचषकासारख्या मोठय़ा स्पर्धेचे दडपण त्यांना हाताळता आलेले नाही, मग तो केपलर वेसल्स असो हॅन्सी क्रोनिए, शॉन पोलॉक किंवा ग्रॅमी स्मिथ. हे सारे नावाजलेले क्रिकेटपटू, कर्णधार, पण मोठय़ा स्पर्धेचे दडपण त्यांना यशस्वीरीत्या हाताळता आलेले नाही. संघाच्या सहयोगींमध्ये माइक हसी, गॅरी कस्र्टन, अ‍ॅलन डोनाल्डसारखे दिग्गज आहेत. डी’व्हिलियर्ससारखा धडाकेबाज कर्णधार आहे. हसी धावांची मशीन म्हणून ओळखला जायचा, डोनाल्ड भेदक वेगवान गोलंदाज, तर कर्स्टनने भारताला विश्वचषक जिंकवून दिला होता. हीच किमया त्याला या सर्व दिग्गजांना घेऊन त्याच्या देशासाठी करायला हवी, तरच ते ‘चोकर्स’ या चक्रव्ह्य़ूहातून बाहेर पडतील, त्यांच्यासाठी हा प्रत्येक विश्वचषकाप्रमाणे सुवर्णसंधी आहे.                
प्रसाद लाड     

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व विश्वचषक २०१५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article about south africa cricket team
First published on: 05-03-2015 at 03:25 IST