ऑस्ट्रेलियाच्या नावावर चार विश्वविजेतेपदे आहेत. विश्वचषकात खेळलेल्या उपांत्य फेरीच्या सातही लढतींमध्ये त्यांनी विजय मिळवला आहे. घरच्या मैदानावर विशेषत: सिडनीच्या मैदानावर तेच वर्चस्व गाजवतात. बोलक्या आकडेवारीला प्रमाण मानत सट्टेबाजांनी मंगळवापर्यंत भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाला पसंती दिली होती. मात्र २४ तासांतच चक्र वेगाने फिरली आहेत. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील बहुचर्चित उपांत्य लढतीत सट्टेबाजांनी दोन्ही संघांना जवळपास समान पसंती दिली आहे. आतापर्यंत जेतेपदासाठी न्यूझीलंडलाच सर्वाधिक पसंती होती. मात्र आता अचानक भारत जगज्जेतेपद आपल्याकडेच कायम राखेल, असा विश्वास सट्टेबाजांनी व्यक्त केला आहे.
ऑस्ट्रेलियाला एक रुपया देऊ करणाऱ्या सट्टेबाजांनी भारतीय संघाला ९० पैसे भाव दिला आहे. विश्वचषकात नेहमीच वर्चस्व गाजवत जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाचे गर्वाचे घर भारतीय संघ खाली आणू शकेल असा सट्टेबाजांनी संघाकरिता देऊ केलेल्या भावामागचा अर्थ आहे. विश्वचषकात सातपैकी सातही लढतींत विजय, फलंदाजी-गोलंदाजी व क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाडय़ांवर दिमाखदार प्रदर्शन आणि ऑस्ट्रेलियातही प्रतिभारत वातावरणाची निर्मिती करणारे जल्लोषी चाहते ही चक्र फिरण्यामागची प्रमुख कारणे आहेत.
या सामन्यावर कोटय़वधी रुपयांचा सट्टा लावण्यात आला असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ‘लगायी’ आणि ‘खायी’ असे शब्द सट्टाबाजारात चर्चेत आहेत. ज्या संघावर भाव लावला जातो त्याला ‘लगायी’ असे म्हणतात. सध्या भारतच सट्टेबाजांचे आशास्थान बनले आहे. दोन्ही संघांना जवळपास समान भाव असल्यामुळे नुकसान कोणाचेच नाही. पण त्यामुळे प्रत्येक षटकागणीक चुरस वाढेल असा अंदाज आहे. प्रत्यक्ष सामना सुरू होईल, तेव्हा भावांत आणखी बदल होऊ शकतो.
सामन्याचा भाव
भारत    ऑस्ट्रेलिया
९० पैसे    एक रुपया

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठीतील सर्व विश्वचषक २०१५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Australia vs india betting
First published on: 26-03-2015 at 07:14 IST