‘जी’ म्हणजेच ‘एमसीजी’ हे क्रीडाजगताच्या केंद्रस्थानी आहे. क्रिकेट आणि ऑस्ट्रेलियन नियमांच्या रग्बीसाठी यापेक्षा जगात दुसरी उत्तम जागा नाही. नव्वद हजारांची क्षमता असलेले ‘जी’ रविवारी होणाऱ्या विश्वचषक स्पध्रेच्या अंतिम फेरीसाठी सज्ज झाले आहे. एवढी प्रचंड क्षमता असूनसुद्धा अंतिम सामन्याची तिकिटे उपलब्ध नाहीत. भारतीय क्रिकेट समर्थकांनी भारताच्या निराशाजनक ‘घरवापसी’नंतर आपली अंतिम सामन्याची तिकिटे विकली आहेत. एवढे करूनसुद्धा कुठेही तिकिटे उपलब्ध नाहीत. आयसीसीच्या संकेतस्थळावरसुद्धा एकही तिकीट उपलब्ध नाही. एक दिवस बाकी असताना मेलबर्नमध्ये प्रवास करणे महागडे झाले आहे. सिडनी ते मेलबर्न एकतर्फी विमानप्रवास ३५०-५५० डॉलर्सच्या घरात आहे आणि मेलबर्नमध्ये एक रात्र राहण्याकरिता ५५०-८५० डॉलर्स मोजावे लागत आहेत. त्यामुळे हा सामना बघण्यासाठी क्रिकेटरसिकास सुमारे दोन हजार डॉलर (सुमारे एक लाख रुपये) खर्च करावे लागतील. पण ‘जी’मध्ये ऑस्ट्रेलियन समर्थकांचे वर्चस्व असणार आहे.
न्यूझीलंडला पाठिंबा देण्यासाठी काही हजार समर्थक त्यांच्या मेलबर्नला रवाना झाले आहेत. यारा नदीच्या काठी वसलेले हे सुंदर शहर ऑस्ट्रेलियाची सांस्कृतिक राजधानीदेखील आहे. या शहरात येतच जुन्या युरोपियन कलाकृती आणि इमारती, मोकळी मदाने, ट्राम आणि कॅफे पाहताच मन प्रसन्न होते. िफ्लडर्स स्ट्रीट नावाचे रेल्वे स्थानक बघताच मुंबईतील सीएसटी (छत्रपती शिवाजी टर्मिनस)ची आठवण येते. या दोन रेल्वेस्थानकांची एक गमतशीर दंतकथा सांगितली जाते. कथा अशी आहे की, सीएसटी स्थानकाची आरेखन खरे तर मेलबर्नमध्ये होणाऱ्या िफ्लडर्स स्ट्रीट स्थानकासाठी निवडले गेले होते, पण गडबडीमध्ये ही दोन्ही आरेखनांची अदलाबदली झाली आणि मेलबर्नमध्ये बांधल्या जाण्याऐवजी ती इमारत मुंबईमध्ये बांधली गेली आणि आज आपण त्याला सीएसटी नावाने ओळखतो.
मेलबर्नमध्ये वातावरण बरेच क्रीडात्मक झाले आहे. उन्हाळा संपला असून क्रिकेटचा ऋतू संपत आला असून ऑस्ट्रेलियन नियमाचा फुटी (रग्बी) हंगाम सुरू झाला असून लोक आता अन्य खेळांकडे लक्ष केंद्रित करत आहेत. वातावरण थंड असून तापमान २० अंशांच्या खाली गेले आहे. मेलबर्नमध्ये पिवळ्या आणि हिरवा रंगांची वृद्धी होताना दिसत आहे. बऱ्याच पब आणि बारमध्ये मोठे एलसीडी लागलेले आहेत. शनिवारी बरेच पब गच्च भरलेले होते सोनेरी आणि हिरव्या जर्सी घालून बरेच ऑसी पबमध्ये बीयर आणि टीव्हीवर सुरू असलेल्या क्रिकेट आणि फुटीचा आनंद घेताना दिसत होते. ऑसींना खात्री आहे की, विश्वचषक देशाबाहेर जाणार नाही. तसमान सागरांनी दुराविलेल्या भावंडांमध्ये होणारे युद्ध असे या लढतीला जागतिक महत्त्व प्राप्त झाले आहे. याचे महत्त्व भारत-पाकिस्तान सामन्याप्रमाणेच परंपरागत आहे. बऱ्याच ऑसी समर्थकांनी एमसीजीवर ताबा मिळविलेला दिसून येत होता आणि फार किवी समर्थक रस्त्यावर दिसत नव्हते. क्लार्कचा शेवटचा सामना असल्यामुळे क्रिकेटरसिक हा सामना बघण्याकरिता गर्दी करतील. रविवारी एमसीजी सोनेरी रंगाने रंगून जाईल याची खात्री आहे.
ऑसींनी नेहमीच किवी क्रिकेट संघाला कमी लेखले आहे. त्यामुळे इतक्या जवळ असूनसुद्धा ‘बॉिक्सग डे’ कसोटी सामना खेळायला त्यांना आमंत्रण नाही. या दोन देशांमध्ये क्रिकेटच्या बाबतीत जणू शीतयुद्ध सुरू असल्याचे कधी कधी जाणवते. ऑस्ट्रेलियन नागरिक वगळता येथील बहुतेक क्रिकेटरसिकांना न्यूझीलंड जिंकावा असे मनोमनी वाटते आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघात उर्मटपणा किंवा उद्दामपणा आहे आणि तो एखादा न्यूझीलंडसारखा संघच उतरवू शकतो, अशी त्यांची धारणा आहे. ऑस्ट्रेलियाने जर हा विश्वचषक जिंकला तर त्यांचे वर्चस्व मोडणे कठीण ठरेल असेही त्यांना वाटते. काही क्रिकेटरसिकांना न्यूझीलंड पहिल्यावहिल्या विश्वचषक अंतिम फेरीत कशी कामगिरी करेल, याबद्दल शंका आहे. पण यावर काही लोकांनी न्यूझीलंडला बिनधास्त खेळण्याचा सल्ला दिला आहे. कारण त्यांच्यासाठी हे नवीन आहे. एमसीजीनजीकची वस्तुस्थिती लक्षात घेता मदानाबाहेरील आणि मदानावरील वर्चस्व तसेच विश्वचषक अंतिम सामन्यात खेळण्याचा अनुभव ऑस्ट्रेलियाच्या गाठीशी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व विश्वचषक २०१५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Expenses for world cup final
First published on: 29-03-2015 at 06:10 IST